Home > मॅक्स किसान > बळीराजा जिंकला

बळीराजा जिंकला

बळीराजा जिंकला
X

शेवटी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. महसूलमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीय. महाराष्ट्रात आतापर्य़ंत 36,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, इतके मोहरे गमावल्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातला शेतकरी पेटून उठला आणि संपावर गेला. त्यामुळे राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं पहिलं श्रेय्य जातं ते आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याचा विचार नक्कीच करायला हवा, महाराष्ट्रातील शेतकरीही त्याचा विचार करतो, पण त्यापेक्षाही शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. आणि हा जीव वाचावा म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेणाऱ्या या सरकारचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानायलाच हवं...

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अल्प भूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, अशी घोषणा केलीय, या शेतकऱ्यांना उद्यापासून नविन पीककर्ज मिळणार आहे, असंही त्यांनी सांगीतलं. तसे आदेश बँकांकडे पोहोचणं गरजेचं आहे. कारण, सर्व राष्ट्रीयकृक बँकांना आदेश देण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारकडे नाही, त्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडे जावून बँकांना तसे आदेश देण्याची विनंती करावी लागणार आहे. कारण राजकारण शब्दांवर आणि भावनेवर चालतं, पण शेतकऱ्यांना नविन कर्ज देताना बँकांना कागद लागणार आहे, त्यामुळे पेरणीची वेळ जाण्याआधी सरकारला कागदी घोड्यांचा खेळ खेळावा लागणार आहे.

राज्यातल्या शेतकरी संपामुळे एक मोठा फायदा झाला, वेगवेगळ्या गटातटात विभागलेले आमचे शेतकरी नेते एकत्र आले. हा शेतकरी संपाचा मोठा विजय आहे. या नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांचा आदेश मिळाला नाही तरी गावा-गावात संप झाला आणि आंदोलनंही झालीत. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातल्या गावातही आंदोलनं झालीत. भविष्य़ात राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना गृहित धरताना आपल्या नेत्यांना आणि सरकारला विचार करावा लागेल.

शेतकऱ्यांचा संप फक्त गावा-गावातच होता असं नाही, तर खेड्यात राहणाऱ्या-शहरांपासून कोसो दूर असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा हा फेसबूक, ट्विटर युट्यूब अशा सोशल माध्यमावरही तेवढ्याच ताकदीनं लढला गेला. पहिल्यांदाच मास लेव्हलला सोशल मीडियावर कर्जमाफीला विरोध आणि शेतकऱ्यांना कमी लेखणाऱ्यांनाही तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिलं गेलं, पहिल्यांदाच बांधावर निसर्गाशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई चोहू बाजूनं लढली गेली. आणि चारंही बाजूनं शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं. ज्या शेतकरीपुत्रांनी आणि शेतकऱ्यांच्या हितचिंतकांनी या लढाईला बळ दिलं, त्यांचीही मोठी मदत झाली. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माध्यमांनीही शेतकरी आंदोलन डोक्यावर घेतलं. कधीकाळी दूर्लक्षित असलेला शेतकरी गेल्या एक तारखेपासून प्रिन्ट आणि टीव्ही माध्यमात हेडलाईचा विषय होता. शेतकऱ्यांच्या या लढ्याच्या या य़शात माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे. जे लोक शेतकरी कर्जमाफीचा विरोध करत आहे, त्यांनी हे काळजीपूर्वक वाचावं... सरकारच्या घोषणेनंतर “शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक एकजूटीचा विजय, जय हो बळीराजा” … असं पोस्ट मी माझ्या फेसबूकवर टाकलं, त्यावर लगेच एक कमेन्ट्स आली.... “ बरं, आता पुढे काय? पुन्हा नविन कर्ज घेणार, पुन्हा नुकसान झालं की पुन्हा कर्जमाफीसाठी आंदोलन करणार” ज्यांनी शेतकरी संपाचं समर्थन केलं, अशा सर्वांना शेतकरी विरोधक अशाप्रकारचे प्रश्न विचारणार आहेत. त्याचं हे उत्तर, नाही आम्हाला भविष्यात कर्जमाफी नको, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावात शेतमाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देण्याचं आश्वासन दिलं होतं, गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं यासाठी कुठलंही पाऊल उचललं नाही, सरकारने हे शब्द पाळलेत, मग भविष्यात आम्हाला कर्जमाफी नको. देशात शेतमालाचे भाव वाढले, की ते भाव पाडण्यासाठी शेतमालाची आयात केली जाते, म्हणजे नाशिकच्या कांद्याला चांगले भाव मिळायला लागले, की पाकीस्तानचा कांदा आयात केला जातो, हे थांबलं तर भविष्यात कर्जमाफीची गरज नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा विरोध करताना विचार करा, कारण देशाला सिमासुरक्षा देणारा जवान, आणि सव्वाशे कोटी जनतेला अन्न सुरक्षा देणारा किसानही तेवढाच महत्त्वाचा आहे.

गजानन उमाटे, ब्युरो चीफ, महाराष्ट्र१, नागपूर

९९२०७८५५२६

Updated : 11 Jun 2017 1:05 PM GMT
Next Story
Share it
Top