Home > मॅक्स किसान > फडणवीसांनी संधी गमावली

फडणवीसांनी संधी गमावली

फडणवीसांनी संधी गमावली
X

आत्मक्लेश पदयात्रेला दुय्यम लेखत स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिनांक २२ मे २०१७ रोजी महात्मा फुलेवाडा, पुणे येथून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याबद्दल आत्मक्लेश करून घेण्यासाठी पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा सुरु केली. सदर आंदोलनाची घोषणा ४ मे रोजी कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केली होती. मात्र या बाबत राज्य सरकारद्वारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. साधी चर्चा देखील करण्याचं सौजन्य मुख्यमंत्री दाखवू शकले नाहीत.

कडक उन्हात पदयात्रेत अनेक वृद्ध शेतकरी, माता-भगीनी सहभागी झाले होते. पुणे ते मुंबईचा प्रवास १८५ किलोमीटर होता. खोपोलीच्या पुढे वातावरणामध्ये तीव्र आद्रता असल्यानं पदयात्रेतील सहभागी लोकांना सतत घामाच्या धारा लागल्या. मात्र राज्य सरकारद्वारे साधं पाणी पुरविण्याची किमान माणुसकीसुद्धा दाखवण्यात आली नाही. या सरकार करता ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. सरकार स्वत:च्या कर्तुत्वाचा पाढा वाचण्याकरता संवाद यात्रा काढत शेतकऱ्यांच्या शिवारात बांधावर जाण्याचा फार्स करत होतं, मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलण्याची इच्छाशक्तीसुद्धा सरकारकडे नव्हती. सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे बळीराजा व्यथित झाला. मुंबईच्या दिशेने प्रत्येक पाऊल पुढे टाकत असतांना शेतकरी दुःखी होत सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळतळत होता. या तळतळाटाची जबर किंमत सरकारला मोजावी लागेल.

वास्तविक लोणावळा ते पनवेल दरम्यान पदयात्रेत ४००/५०० शेतकरी होते. मा.मुख्यमंत्री शेतकऱ्यांची येथे समक्ष भेट घेत संवाद साधू शकले असते. मात्र, अहंकाराच्या मदात मदमस्त झालेले मुख्यमंत्री येथे सपशेल नापास झाले. हात जोडणारा नेहमी श्रेष्ठ असतो ही आपली संस्कृती आहे. मात्र स्वत:च्या कर्तुत्वाचे (?) ढोल बड़वीणाऱ्या फड़नवीसांना यांच्याशी काय पडले असा सवाल येतो. पुणे ते मुंबई दरम्यानच्या नऊ दिवसात सरकारला त्यांचा एक सुद्धा प्रतिनिधी आत्मक्लेश पदयात्रेच्या सामोरे पाठवता आला नाही. यातून सरळ अर्थ असा होतो की आपण शेतकऱ्यांना निवडणुकीत दिलेली आश्वसनं पूर्ण करु न शकल्याने शरमेमुळे तोंड दाखवायची त्यांना लज्जा वाटत असावी. मात्र इस्लामपूर येथे त्यांच्या मुख़ातून आलेल्या उदगारातून अहंकाराचा दर्प यायला लागतोय. मुंबई येथे तब्बल वीस हजार शेतकरी पदयात्रा सांगतेनिमित्त मिळेल त्या साधनानं, स्वखर्चानं आले होते. येथे धाड़साने मोर्चाला थेट सामोरे जात आपली भूमिका मांडण्याचे धाडस मुख्यमंत्री अथवा त्यांचे " सध्याचे " लाडके मंत्री दाखवू शकले नाही हे मोठे दुर्दैव्य म्हणावे लागेल. यालाच सत्तेचा माज म्हंणावे का? की विरोधात असतांना शेतकऱ्यांच्या हितावह मोठ्या मोठ्या बाता मारणाचे बेगड़ी प्रेम ?

योगेश पांडे

( लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते आहेत )

Updated : 1 Jun 2017 7:16 AM GMT
Next Story
Share it
Top