दवंडी

दवंडी
X

जनावरांना लसीकरण, चावडीवरच्या मिटिंगा, करवसुली, सामुदायिक काम, भांडणतंटा, इत्यादींसाठी पूर्वी खेड्यात दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फुलायची. पण माहिती तंत्रज्ञानाचं वारं खेड्यात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दवंडीची आरोळी थांबली.

ऐका हो ऐका ऽऽऽऽ ... ढुम् ढुम् ढुमाक ढुम् ढुम् ढुमाक हो ऽऽऽऽ असा हलगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. गावात त्याची चाहूल लागली की गडी माणसं कान देऊन आणि श्वास रोखून दवंडीचा अंदाज घ्यायची. गावातल्या अरुंद बोळांमधून अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळांत पुढे निघून जायचा. सोबत मागे चिल्लीपिल्ली फिरायची. दवंड्या दवंडी देत देत मध्येच एखांद्या खिंडाराजवळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. गरम झालेली हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका ऽऽऽऽ ... ही आरोळी पुन्हा घुमायची. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई. जनावरांना लसीकरण, चावडीवरच्या मिटिंगा, करवसुली, सामुदायिक काम, भांडणतंटा, इत्यादीसाठी दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फ़ुलायची. चावडीसमोरची दीपमाळ तेल पीत मध्यरात्रीपर्यंत तेवत राहायची. तिच्या उजेडात गावाच्या भल्याबुऱ्याच्या चर्चा व्हायच्या. अडल्या नडल्याला मदत व्हायची...

पण माहिती तंत्रज्ञानाचं वारं खेड्यात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दवंडीची आरोळी थांबली. सोबत हलगीवरची थापही विसावली. दवंडी कायमची विझली. कालबाह्य झाली. गावागावातील दवंडीचा आवाज बंद झाला. चावडीवरच्या गप्पा थांबल्या. गावाच्या भल्याबुऱ्याचे विषय आटले. त्यांना राजकारणाच्या चर्चांचे स्वरूप आले. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगवरल्या आभासी जगातल्या विषयांनी आता ही जागा घेतलीय. आता दवंडी देणे आणि ऐकणे कमीपणाचे मानले जात आहे. चोहीकडे ब्रेकिंग न्यूजचा भडिमार होत असताना आता खेडी दवंडीला सामावून घ्यायला तयार नाही. बदलत्या काळासोबत दवंड्याने दवंडी देण्यात काही बदल घडवून आणले नाहीत. गावानेही त्याला ते करू दिले नाहीत.

दवंडी देत देतच गावातला नाऱ्या वाढला. जगला. थकला. आता त्याची हलगी काळासोबत भिंतीवरच्या खुंटीला अडकून पडलीय. आणि खुंटीखालच्या पोपडे उडालेल्या भुईवर दवंड्या हलगीकडे हताशपणे बघत दिवसभर गरिबीला झेलत, डोळे मिचमिच करत पडून राहतो. अंधार झाला की धरपडत उठावे आणि गावातील पाराकडे तोंड करतऐका हो ऐका...ची आरोळी हलगी बडवीत पुन्हा सोडावी असं त्याला काळजातून वाटत राहतं. पण ती साद ऐकणारी जुनी माणसं कधीच माती होऊन गेलेली असतात. हलगीची आरोळी ऐकणारे कान आता बहिरे झालेले असतात. गावाच्या बोळाबोळात आता डिजिटल पोस्टर लागलेले दिसतात. नवी पिढी त्यांचा आदर्श घेत आता मेंदू वाढवत राहते. आणि दवंडीला विझवून गावही त्यांना पोसत राहतो.

ज्ञानदेव पोळ

[email protected]

Updated : 6 Oct 2017 8:36 AM GMT
Next Story
Share it
Top