Home > मॅक्स किसान > चला कृषी पर्यटनाला

चला कृषी पर्यटनाला

चला कृषी पर्यटनाला
X

चुलीवरची भाकरी, पिठलं, गावरान ठेचा, निसर्गाचं सानिध्य आणि शेतात काम करण्याची मज्जा. मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या शहरी माणसासाठी तसं हे दुर्मिळच. पण कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण आणि त्यातही खास करून शेतकरी संस्कृती अनुभवण्याची संधी शहरी माणसाला मिळते. जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या निमित्तानं याच नव्या पर्यटनाचा घेतलला हा धांडोळा.

मनिष शिरोळे यांनी मलठण ता. शिरुर जि. पुणे येथे मलठण कृषी पर्यटन केंद्र २००८ साली सुरु केलं. पुण्यापासून जवळच असलेल्या या केंद्रात अस्सल ग्रामिण जीवन पहायला आणि अनुभवायला मिळतं. त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या पुणेकरांचा उन्हाळा सोडला तर बाकी वर्षभर मलठणमध्ये राबता असतो.

शिरोळे वर्षभरात वेगवेगळ्या मोसमात निरनिराळे महोत्सव भरावतात. जानेवारी-फेब्रूवारीमध्ये हुरडा महोत्सव, संक्रांतीला पतंग महोत्सव, पावसाळ्यात मयूर दर्शन, होळीच्या निमित्ताने पुरणपोळी महोत्सव. या सर्व महोत्सवांना पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. सकाळी पर्यटक मलठणमध्ये आल्यानंतर नाश्ता करुन ते भटकायला निघतात. जवळच्या पर्यटनस्थळांना भेटी देतात. सर्व पर्यटकांची शिवार फेरी काढली जाते. त्यात त्यांना शेतात फिरवून शेतात चाललेल्या वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी केलं जातं. बैलगाडी, ट्रॅक्टरमधून फेरफटका मारला जातो. विहीरींमध्ये पोहायची संधी मिळते. सायकल खेळली जाते. शिवाय गावाकडचे खेळ जसे दोरीवरच्या उड्या, गोट्या, लिंगोरच्या आदी खेळण्यात येतात.

गावगाडा कसा चालतो, गावातले बारा बलुतेदार, सरपंच, तलाठी यांच्या कामाची तोंड ओळख पर्यटकांना करुन देण्यात येते. Hygiene आणि Safty हा आपला मूलमंत्र असल्याचं शिरोळे सांगतात. त्यामुळे अस्सल चुलीवरचं जेवण, शेतात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या ताज्या भाज्या यांची मेजवानी येथे पर्यटकांना मिळते. म्हणूनच दरवर्षी जवळपास साडेतीन हजार पर्यटक शिरोळे यांच्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात.

सोलापूर जिल्ह्यातल्या सुधीर जाधव यांनी त्यांच्या नैसर्गिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड दिली. जाधव हे प्रगतीशील शेतकरी आहेत. सोलापूर-पुणे रोडवर देगावजवळ त्यांचं कृषी पर्यटन केंद्र आहे. २००९ मध्ये त्यांनी हे केंद्र सुरु केलं. एकाच वेळी १०० पर्यटक आणि रात्री मुक्कामाला २५ पर्यटक अशी त्यांच्या केंद्राची क्षमता आहे. याठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच अगदी विदेशी पर्यटकही त्यांच्या केंद्राला भेट देतात. दिवाळी, जानेवारी-फेब्रूवारी या काळात त्यांचं कृषी पर्यटन केंद्र तुडुंब भरलेलं असतं.

जाधव यांच्या २० एकर शेतात केसर आंबा, चिकू, सिताफळ, लिंबू या फळांच्या बागा आहेत. त्यामुळे पर्यटकांना येथे विसावायला आनंद वाटतो. निसर्गरम्य वातावरणात पर्यटक येथे रमतात. वेगवेगळे ग्रामिण खेळ खेळतात. जाधव यांना आम्ही त्यांच्या मार्केटींगचं गमक विचारलं. तर माऊथ पब्लिसीटी एवढंच उत्तर त्यांनी दिलं. आलेला पर्यटक संतुष्ट होऊन गेला तर तो आणखी लोकांना सांगतो. त्यामुळे वेगळी मार्केटींग करावी लागत नाही.

जाधव यांच्याकडे शेत आणि पर्यटन केंद्र असं दोन्ही मिळून ८ ते १० लोकांना वर्षभरासठी कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. पर्यटक आनंदी होऊन गेला तर त्यातच समाधान असल्याचं जाधव सांगतात. कृषी पर्यटनातील योगदानामुळे त्यांना गेल्यावर्षीचा कृषीभूषण पुरस्कारही मिळाला आहे.

कृषी पर्यटनाच्या निमित्ताने ग्रामिण भागात बऱ्याच प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. महिला बचत गट आणि इतर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. हीच खरी कृषी पर्यटन सुरु करण्यामागची प्रेरणा असल्याचं शिरोळे आणि जाधव यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ला सांगितलं. कृषी पर्यटन हा शेतीला उत्तम जोडधंदा आहे. मात्र, ही सर्व्हीस इंडस्ट्री असल्यानं व्यवसायात असतात तसे धोकेही यात आहेत. त्यामुळे कृषी पर्यटन सुरु करतांना सर्व गोष्टींची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असंही शिरोळे आणि जाधव सांगतात

Updated : 16 May 2017 5:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top