Home > मॅक्स किसान > गुजरातमध्ये कापसाला अनुदान, तर महाराष्ट्रात का नाही ?

गुजरातमध्ये कापसाला अनुदान, तर महाराष्ट्रात का नाही ?

गुजरातमध्ये कापसाला अनुदान, तर महाराष्ट्रात का नाही ?
X

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर गुजरात सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत ५०० रूपये प्रति क्विंटल अनुदान जाहिर केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वा.मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय .

दरम्यान या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हमीभाव अधिक बोनस असा ४८५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुरीचे विक्रमी उत्पादन केल्यांनतर व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे हमीभावापेक्षा कमीभावात शेतमाल विकल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

यावर्षी विदर्भ व मराठवाड्यातील ४० लाखांवर शेतकऱ्यांनी सुमारे ५० लाख हेक्टरमध्ये कापूस या नगदी पिकाची पेरणी केलेली आहे. सध्या मागील २० दिवसापासून पडत असलेल्या उन्हामुळे कापूस प्रचंड प्रमाणात फुटला असुन पहिला वेचा करून घरात सुद्धा आला आहे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर कापूस विक्रीस सुरूवात होते. मात्र या वर्षी कापूस खरेदीचा भाव शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरणारा आहे. कारण मागील दोन वर्षांपासून सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कापूस या वर्षी जागतिक मंदीच्या नावावर व्यापाऱ्यांनी सरासरी चार हजार रुपये क्विंटल भावात खरेदी करण्यास सुरुवात केला आहे. त्यातच सरकारने सी सी आय आणि फेडरेशनची कापूस खरेदी अद्यापपर्यंत सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागत आहे. त्यामुळे कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

कापसाच्या पेरणीच्या पुर्वी जगात रुईचे भाव प्रती पौंड ८६ सेंट वर होते. सरकीची भावही २४०० रुपये क्विंटल होता व अमेरिकेचा डॉलरही चांगला ६८ रुपयांवर होता. म्हणून भारतात कापसाच्या गाठीचे भाव २५ हजार रुपयाच्या घरात असल्यामुळे येत्या हंगामात कापूस कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल राहतील. या आशेने अख्या महाराष्ट्रात विक्रमी सुमारे ५० लाख हेक्टरमध्ये कापसाची पेरणी केलेली आहे. मात्र आता रुईचे भाव प्रति पौंड ६८ सेंटवर तर सरकीचा भावही १८०० रुपये क्विंटल झाला आहे. तसेचं अमेरिकेच्या डॉलरचा भाव देखील कमी झाला असून तो ६४ रुपयांवर आला आहे. म्हणून भारतात कापसाच्या गाठीचे भाव १८ हजार रुपयांवर आले आहे. याच वेळी स्वस्त दरात लगतच्या पाकिस्तान आणि बांगलादेशवरून कापसाची आवक करण्यास सुरुवात झाल्यामुळे भाव पाडण्यात कापडाच्या मील मालकांना यश आले आहे. अशातच सरकारने केंद्राच्या सी सी आय आणि फेडरेशनची कापूस खरेदी तात्काळ सुरु केली नाहीतर आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आपला कापूस मातीमोल भावात विकतील आणि हाच कापूस व्यापारी सालाबादप्रमाणे सी सी आय, फेडरेशनला विकतील म्हणून हा गोरखधंदा रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती तिवारी यांनी केली आहे.

Updated : 25 Oct 2017 12:06 PM GMT
Next Story
Share it
Top