Home > मॅक्स किसान > खरेदी केंद्रांचा फार्स आणि शेतकऱ्यांना फास

खरेदी केंद्रांचा फार्स आणि शेतकऱ्यांना फास

खरेदी केंद्रांचा फार्स आणि शेतकऱ्यांना फास
X

वाशिममध्ये उभारली काळी गुढी

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामागे शेतमालाला योग्य दर न मिळणे ही मुख्य बाब असून सरकारी अनास्था याला कारणीभूत असल्याचं वारंवार समोर येत आहे. केवळ बारदाना नाही म्हणून राज्यातील निम्मी तूर खेरदी केंद्र सध्या बंद आहेत. सरकारी यंत्रणेच्या या असंवेदनशीलपणाच्या विरोधात वाशिम येथे शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी खरेदी केंद्रे बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नाफेडचे एजंट असणाऱ्या महाफेडने सुरुवातीला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठेवले होते. पण मोठी आवक दिसून आल्यावर हे उद्दिष्ट २५ लाख क्विंटलवर नेण्यात आले. त्यासाठी दीड लाख टन बारदाण्याची नोंदणी एक लाख टनाने वाढविण्यात आली. हा बारदाणा कोलकात्याहून येतो. २८ फेब्रुवारीपर्यंत हा बारदाणा विदर्भात पोहोचणे अपेक्षित होते. त्यामुळे विदर्भात तूर खेरदी केंद्र बंद पडली. जालना, नगर, नांदेड जिल्ह्य़ात जास्तीचा बारदाणा घेऊन ठेवण्यात आल्याने नाफेडची खरेदी सुरू राहली. पण तीही आता बंद होऊ लागलीय. नाफेडची यंत्रणा कोलमडून पडल्याने बाजारात खासगी व्यापार खरेदी जोरात सुरू आहे. प्रति क्विंटल ५०५० रुपये या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास फौजदारी कारवाईची तरतूद आहे. पण ती कागदावरच राहतेय. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याना ३८०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटलने विक्री करण्याचं संकट ओढवलेय. एफ एक्यू दर्जापेक्षा कमी प्रमाणित असल्यास व्यापारी या भावात खरेदी करू शकतो. पण नाफेडच्या खरेदीअभावी शेतकऱ्यांना मिळेल तो भाव आज स्वीकारावा लागत आहे. सर्वाधिक आवक असणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीत नाफेडने नकार दिल्यावर व्यापाऱ्यांच्या घशात तूर ओतावी लागली. तुरीचा दर्जा नसेल तेव्हा नाफेडने नाकारलेल्या मालाची प्रत ठरविण्यासाठी शासनाने कृषी अधिकारी, बाजार समिती सचिव व उपनिबंधक यांची समिती स्थापन केलीय. पण ते वेळच देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीय. राज्यभरातल्या सुमारे एक हजार तूर खरेदी केंद्रावरचा बारदाणा संपला आहे. माल खरेदी करण्यासाठी पोतीच शिल्लक नाहीत. यात प्रामुख्याने अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, वर्धा, जालना, बीड या जिल्ह्यांतील केंद्रांचा समावेश आहे. खरेदी केंद्रावर तुरीचे ढिग लागले आहेत. तूर खरेदी केंद्र सरकारने जाहीर न करताच बंद झाली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे.

राज्यात विविध खरेदी केंद्रांवर झालेली तुर खरेदी ( क्विंटलमध्ये )

लातूर - १ लाख ३० हजार

उस्मानाबाद - १ लाख १३ हजार

यवतमाळ - ४७ हजार

बीड - १ लाख १६ हजार

जालना - ५९ हजार

बुलढाणा - ९८ हजार

अकोला - ६५ हजार

वाशिम - ६४ हजार

अहमदनगर - १ लाख एक हजार

नांदेड - ४३ हजार

धुळे - १० हजार

अमरावती - ६२ हजार

नागपूर - १२ हजार

परभणी - २१ हजार

हिंगोली - १० हजार

सोलापूर - ३२ हजार

सांगली - ४ हजार

नंदूरबार - १३ हजार

पुणे - ४ हजार

सातारा – १८००

औरंगाबाद - ११ हजार

चंद्रपूर - २ हजार

नाशिक - ३ हजार

जळगाव - ३ हजार ७००

वर्धा - २ हजार ४००

एकूण - १० लाख ३८ हजार क्विंटलच्या वर खरेदी झाली आहे.

नांदगाव कांदा मार्केट बंद

विदर्भ, मराठवाड्यात ज्याप्रमाणे तूरीचे पीक भरघोस आले आहे तसे नाशिकमध्ये कांद्याचे पीक जोमात आले आहे. मात्र, त्याचेही लगेच दर पडले. त्याचं कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातून कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वेने रॅक दिले नाहीत. कांदा साठवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जागा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगाव बाजार समितीने कांदा मार्केट बंद केले.

विदर्भात मिरचीच्या शेतावर नांगर

मिरचीला भाव मिळत नसल्यानं नागपूर जिल्ह्यातल्या कुही भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यानं उभ्या पिकात ट्रॅक्टर घातला. मांढळ गावात ही घटना घडली आहे. मिरची पिकवण्यासाठी एकरी 75 हजार खर्च आला. पण, क्लिंटलला 600 रुपये सुद्धा भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदील झाला. त्यानं शेतात ट्रॅक्टर फिरवून उभं पिक पेटवून दिलंय.

https://youtu.be/e111aRVKXcw

एकुणच काय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची योग्य साठवणूक आणि पणन व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसते आहे. सरकार दरवर्षी खरेदी केंद्रांचा केवळ फार्स करीत असल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास मात्र आवळला जातो आहे.

Updated : 28 March 2017 12:48 PM GMT
Next Story
Share it
Top