Home > मॅक्स किसान > किटकनाशकांना बळी पडलेल्या मजुरांना मिळणार नाही मदत

किटकनाशकांना बळी पडलेल्या मजुरांना मिळणार नाही मदत

किटकनाशकांना बळी पडलेल्या मजुरांना मिळणार नाही मदत
X

विषारी किटकनाशकांनी संपूर्ण विदर्भात कहर केलाय, किटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात 35 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झालाय, मृतकांच्या नातेवाईकांना सरकारने स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाखांची मदत जाहीर केलीय. पण ही मदत केवळ शेतकऱ्यांना मिळणार असून शेतमजुरांना यातून काहीच मदत मिळणार नाही. मॅक्स महाराष्ट्रने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील निकषांची माहिती घेतली असता हे स्पष्ट झाले की ज्यांच्या नावावर शेतीचा सातबारा आहे त्यांनाच या योजनेचा फायदा मिळतो. त्यामुळे ज्यांच्या नावावर शेतीचा सातबारा नाही, अशा शेतमजुरांच्या कुटुंबीयांना या योजनेतून कुठलीही मदत मिळणार नाही. त्यामुळे विदर्भातील फवारणीमुळे मृत्यू झालेल्यांपैकी निम्मे लोक या मदतीपासून वंचित राहणार आहे.

विदर्भात किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृतकांपैकी साधारण 15 पेक्षा जास्त शेतमजूर आहेत. या शेतमजुरांच्या नावावर शेती नाही, त्यामुळे या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून सरकारी मदत मिळणार नाही, म्हणजे किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू झालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतमजुरांना सरकारने वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेत अपघातात कुठलंही अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. पण ही मदत सुद्धा शेतमजुरांना मिळणार नाही.

विदर्भात बीटी कपाशीवर बोंड अळी आणि रस शोषणाऱ्या किडींचं आक्रमण झालंय, या किड रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पुलीस, मोनोस्टार, मोनोक्रोटोफॉस, पोलो यासारख्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली.

अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांच्याकडे 4-5 एकर शेती आहे, असे शेतकरी आपल्या शेतात स्वत: फवारणी करतात, पण ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, असे शेतकरी बऱ्याचदा मजुरांकडून फवारणीची कामं करवून घेतात.

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीमुळे 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय, यात बरेच शेतमजुर आहेत.यवतमाळ जिल्ह्यात फवारणीमुळे मृत्यू झालेले शेतमजूर

1) देवीदास मडावी, पोळ्याचा मारोती, तालुका कळंब- 19-08-17 ला मृत्यू झाला

2) रमेश चिल्लरवार, कुर्ली, ता. घाटांजी- 13-09-17 रोजी मृत्यू झाला

3) वसंत चिडाम, मारेगांव, - 08-09-2017 ला मृत्यू झाला

4) अय्यब शेख, डेहणी कलंगाव, ता. दिग्रस- मृत्यू 04-09-2017

5) बंडू सोनुले, मानोली ता. घाटंजी- मृत्यू- 23-09-2017

6) रवि राठोड, उचेगाव ता. दारव्हा- मृत्यू -26-09-2017

एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सुरुवातीला 18 जणांचे मृत्यू झाले, त्यापैकी सहा शेतमजूर आहेत, म्हणजे या सहा मृतकांच्या नेतावाईकांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून एक रुपयाही मदत मिळणार नाही. दुसऱ्या योजनेची सरकारने अजून तरी मदतीची घोषणा केलेली नाही. म्हणजे हे परिवार मदतीपासूव वंचित राहणार का? की राज्यसरकार दुसऱ्या कुठल्या योजनेतून या शेतमजुरांच्या परिवाराला आर्थिक मदत करणार, हे येणार काळच ठरवेलं, पण सध्यातरी विदर्भातली फवारणीमुळे मृत्यू झालेल्या या शेतमजुरांचे परिवार राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले, अशीच स्थिती आहे.

Updated : 13 Oct 2017 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top