Home > मॅक्स किसान > कात टाकलेली खेडी

कात टाकलेली खेडी

कात टाकलेली खेडी
X

माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं होती. कुंभारवाडा होता. महारवाडा, मांगवाडा होता, बागवान मुलाण्याची घरे होती. टेकावर न्हाव्याची वस्ती होती. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा होता. परटांची अनेक घरे होती. बोळात लव्हाराची बैठी घरेही होती. सोबत गुरवांची चार दोन घरेही होती. अशा अठरापगड जमाती गावात होत्या. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात नव्हत्या. मराठ्यांच्या घरात गणपती बसल्यावर मुलाण्याची नजमा सायंकाळी आरती करायला घरा घरात धावायची. अन गावाबाहेरच्या पिराच्या ऊरसाला ब्राह्मणाच्या वाड्यातून निवद नारळ यायचा. मुसलमानांची अनेक पोरं बैलगाडीतून निघणाऱ्या गणपतीच्या मिरवणुकीपुढे नाचायची. मांगवाड्यातल्या देवीच्या जागराला सारा गाव एकत्र येऊन पहाटेपर्यंत जागायचा. पोतराज झालेल्या नारू तात्याच्या हलगीला, कुंभारवाड्यातला संभा संभळाची साथ द्यायला कधी चुकला नाही. अन बागवानाच्या घरचा आबूलकाका साऱ्या गावाला शिरकुर्मा वाटून मारुतीच्या जत्रेत बेभान होऊन नाचायला कधी विसरलाही नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी कित्येक वर्षे गावाला सावली देणाऱ्या पारावरच्या कडुनिंबाचा पाला खायाला साऱ्या अठरापगड जमाती एकत्र जमायच्या. अन वाडवडिलांनी घालून दिलेले सगळे सण उत्साहाने साजरे करायच्या. दोन पायल्या जुंधळ्यावर सालभर गावाची डोकी करणारा न्हाव्याच्या वस्तीवरचा विठू नाना दिवस उगवायला गावाकडं सरकायचा. पेरणीच्या दिवसात कुरीचा फण, कुळवाचं जू तासायला एका हाकेत वश्या सुतार हजर राहायचा. हातात लाकडी फिरक्या घेऊन मांगवाड्याच्या बाजूला घायपाताच्या वाकाचा दोर बनवत पीळ देत बसलेला पांडू तात्या त्याच्या बायकोसोबत न चुकता दिसायचा. उन्हं वर आली की गुरवाची बाळी बुट्टी घेऊन आळीतनं पीठ गोळा करत सुटायची.

गोठ्यात व्यालेल्या म्हशीचं फेसाळ दूध चरवीत भरून डोक्यावर चुंभळ करून घरामागच्या महारवाड्यात वाटून त्यांच्या चुलीवर कढणारा काळा चहा पांढरा करणारी हौसानानी माझ्याच खेड्यात जन्मली. आणि सुईन बनून साऱ्या गावाच्या पोरांची सुखरूप बाळंतपणे करून त्यांना दुनियेच्या सुरक्षित रंगमंच्यावर सोडून स्वतः आयुष्यभर वांज राहिलेली यशवदा म्हातारीही माझ्याच गावच्या महारवाड्यातली. सगळंच सुखी होतं. आलबेल होतं असं मी कधीच म्हणणार नाही. तिथंही जन्मताच पाचवीला पुजलेली जीवघेणी दुःखं होती, पिढ्यान पिढ्या गावकुसाबाहेचं भकास जगणं होतं, गरिबीनं पिचलेले हाडामासांचे हलणारे उघडे देह होते, आडोशाला सूड धरून बसलेले नासके मेंदू होते. पण ते मला कधीच दिसत नाहीत. फक्त मोठेपणा भरून वाहणारे मेंदूच मला दिसतात. प्रचंड जीवघेण्या दुःखातूनही जीवनाच्या मागं दंडाच्या बेडक्या फुगवून धावण्याची ताकद मला खेड्यानं दिलीय. माझ्या लेखनाला संस्काराचं कुंपण घालण्याचं बळही मला माझ्याच खेड्यानं दिलंय. आजही गावाबाहेरून वाहणारी नदी जेव्हा गावच्या वळणार डोह करून थांबलेली दिसते तेव्हा ती मला अजूनही साद घालत राहते.

आता खेडी बदललीत. बैल जाऊन घराघरात ट्रॅक्टर आलेत. यंत्रांची खडखड आलीय. नव्या तंत्रज्ञानाचे वारे आता खेड्यावरून घोंगावू लागलंय. एकेकाळी खेड्यांचा कणा असलेली बलुतेदारी आता शेवटच्या घटका मोजत उध्वस्त झालीय. मिसरूड फुटलेली पोरं गळ्यात आणि हातात वजनी दागिने घालून, पुढाऱ्यांच्या नादी लागून चौका चौकातल्या पोस्टरवर झळकलेली दिसतात. तुकडे पडलेल्या जमिनीच्या बांधावरून होणारी भांडणे आता कोर्टापर्यंत पोह्चलीत. पुढाऱ्यांनी भावकी भावकीत गट तठ पाडलेत. सध्या खेड्यात दारूचा महापूर आलाय. क्वार्टर, ब्र्यांडी, व्हिस्की, रम असे आधुनिक शब्द आता खेड्यात चांगलेच रुजलेत. आता नदीवरून भल्या पहाटे घागरी भरून पाणी वाहणारी माणसं दिसत नाहीत. एकेकाळी दुधाचा रतीब साऱ्या गावाला लावणारी हौसानानी सुनांच्या राज्यात एक कप बिन दुधाच्या चहालाही महाग होताना दिसतेय. आयुष्यभर उन्हातान्हात राबून एकेकाळी जीवापाड जपून गोठ्यात ठेवलेली लाकडी औजारे आता शेवटच्या घटका मोजत अडगळीत पडून आहेत. नव्या पिढीत नवीन नांदायला आलेल्या सुना पाणी तापवायच्या चुलीत मोडकी औजारे जेव्हा आणून घालतात, तेव्हा जीर्ण झालेल्या देहाची थकलेली माणसं एखांद्या कोपऱ्यात बसून चुलीत जळणारी लाकडी औजारे हताशपणे पहात बसून राहतात. म्हणूनच माणसातला माणूसपणा संपून त्यांच्यातला आक्रमक होत निघालेला पशु आता गावाचं गावपण संपवायला निघालेला स्पष्ट दिसतोय.

Updated : 13 Oct 2017 8:21 AM GMT
Next Story
Share it
Top