Home > मॅक्स किसान > काड्या चघळणारी ढोरं, माती हुंगणारी माणसं...

काड्या चघळणारी ढोरं, माती हुंगणारी माणसं...

काड्या चघळणारी ढोरं, माती हुंगणारी माणसं...
X

पायाखाली चिखल, वरून आभाळ भरून आलेलं तरीही इथल्या शेतकऱ्यांच्या पोटात कालवा सुरू आहे. कारण दुष्काळाचं सावट गावाभोवती घिरट्या घालू लागलंय अशी स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तांबेडोन गावची आहे. ढेकळावर बसून 20 एकर शेती असलेला अमोल तांबे चिंताग्रस्त चेहऱ्याने सांगत होता, की "ऑगस्ट महिना उजडलाय तरीही आमच्या शेतात अजून दाणे सुद्धा पेरलेले नाहीत. जून महिन्यापासून आम्ही पावसाची वाट पाहतोय. एक थेंब सुध्दा पाऊस पडलेला नाही. काल पाऊस पडला.पण उपयोय काय, कापसाचा सिझन गेला, सोयाबीन, बाजरी, मका, मूग, उडीद यापैकी आता आम्ही काहीच पेरू शकत नाही. कारण त्याचा आता काहीच उपयोग नाही. राहीली फक्त ज्वारी तीही रब्बीची पण पुन्हा पाऊसच नाही पडला तर काय घेता साहेब..." "मग नाहीच पेरलं तर खाणार काय" असा प्रश्न विचारला तेंव्हा निरुत्तर झालेल्या अमोल तांबेच्या डोळ्यात असंख्य प्रश्नांचं कोडं दिसत होतं...

वडील वारलेला हा अमोल तांबे घरी सहा माणसांचं कुटुंब सांभाळतो.. दोन लहान भाऊ औरंगाबादला शिकायला आहेत. त्याचा लहाना मुलगाही सेमी इंग्लिशला शाळेत जातो. सगळ्यांचा मिळून शिक्षणावर याला वर्षाकाठी अडीच लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यात पुन्हा घर चालवायचं असतं... दरवर्षी शेतीत खर्च जाता दोन अडीच लाखांचं उत्पन्न होतं... त्यात भागतं कसतरी... पण दोन वर्षपूर्वीच्या दुष्काळात बँकेचं घेतलेलं कर्ज आणि यावर्षीचा पुन्हा दुष्काळ हे सगळं ओझं पेलायचं कसं हा प्रश्नः त्याच्या समोर कायम होताच... कर्जमाफीबद्दल मी विचारलं तेंव्हा तो म्हणाला... "माझ्यावर आठ लाखांचं कर्ज आहे साहेब... दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी मला साडेसहा लाख रुपये आधी भरावे लागणार आहेत... तेवढे पैसे माझ्याकडे असते तर मी कर्ज काढलंच कशाला असतं" असा सरळ साधा प्रश्न अमोल तांबे विचारतो... त्याच्या या प्रश्नानंतर भविष्यात याचे दोन भाऊ आणि मुलगा यांची शाळा कायमची थांबते की काय असा प्रश्न मात्र निर्माण होतो...

अमोल तांबे यांचा बांध ओलांडून मी जिजा तांबे या शेतकऱ्याच्या शेतात येतो... हाही 20 एकरचाच शेतकरी, कालच्या पावसाने यांची जमीन पूर्ण भिजलीय पण अख्या शेतात कुठेच पाहायला हिरवं धाट नाही... 20 एकर जमिनिपैकी 2 एकर जमीन जिजा तांबे यांनी विकायला काढलीय... पण त्याला गिऱ्हाईक लागत नाही म्हणून ते हवालदिल आहेत. माझ्यासोबत जमलेल्या माणसांसमोर हे सगळं सांगताना त्यांना अपमानजनक वाटत होतं... पण काही पर्याय नव्हता, "का विकताय जमीन" असं विचारलं तेंव्हा जिजा सांगत होते... "मुलगी लग्नाला आलीय साहेब तीचं लग्न काराचंय यंदा... पिकल वाटलं जरासं म्हणून यावर्षी सरकी तीनदा लावली... 18 बॅग सरकी मातीत घातली पण ती काही बाहेर आलीच नाही... सगळ्या शेतीत लाख दिड लाखाचा खर्च केला... पण सगळा मातीत गेला... उरावर कर्ज झालंय अन घरात पोरगी लग्नाची आहे... शेती नाही विकू तर मग काय करू" असा त्यांचा प्रश्न आहे..जिजावरही बँकेचं 5 लाखांचं कर्ज आहे. "जिजा सांगत होते पोरीच्या लग्नासाठी मी जाडजोड करतोय आणि त्यात सरकार म्हणतं वरचे साडेतीन लाख भरा आणि दीड लाख माफी मिळवा हे कुठून जमवायचं साहेब.." दीड लाखकरता बँक या शेतकऱ्यांची अडवणूक करतेय तर दुसरीकडे घर खर्च भागवण्यासाठी या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यात दावणीची सात ते आठ ढोरं गुरं विकून टाकलेत... मी शेतातून बाहेर निघालो तेंव्हा सहज गुरांवर नजर टाकली तर उरली सुरली ढोरं भर पावसाळ्यात वाळलेल्या काड्यांचा चार चघळत होती... आणि माणसांवर माती हुंगायची वेळ आलीय...

जिजाच्या शेतातून बाहेर पडल्या पडल्या भाऊराव तांबे यांचा आखाडा लागतो... आरट्या बोरट्याचं कुंपण घालून छान शेकरलेल्या गोठ्यात केशव निकाळजे हा त्यांचा सालगडी बैलांना वैरण टाकत होता... मालकापेक्षा जास्त आतुरतेने केशव हाच पावसाची वाट पाहत होता... कारण पावसाची चिन्ह दिसेनाशी झाली तेंव्हा मालकाने केशवला कामावरून घरी बसायला सांगितलं होतं... सारं आयुष्यच सालगडी म्हणून काढलेल्या केशवसाठी हे तसं मोठं संकट होतं... पण गावातही कुठेच मोलमजुरी मिळेना, बसून तरी काय करावं म्हणून हा मालकाच्याच ढोरं गुरांना वैरण पाणी करतोय... नाहीतरी सध्या शेतात याशिवाय दुसरं कामही उरलेलं नाही... "कधी गाव सोडून गेला होतात का मजुरीसाठी" असं विचारलं तेंव्हा केशव सांगत होते, " गेलो होतो साहेब दोन तीन साल पण तेही शेतीत सालगडी म्हणूनच गेलो होतो... शेतीशिवाय दुसरं कोणतं काम नाही जमत साहेब आपल्याला आपले वाडवढीलही हेच करत होते मी पण बचपन पासून हेच करत अलोय... आता म्हातारपण आलं मपलं पार आता कुठं जाणार मी..अलीकडचे दिवस पार वाईट यायला लागले साहेब... दुष्काळ पाठ सोडीना झालाय.. शेतकऱ्यांचे हाल सुरू हायेत... आपण तरी काय तक्रार करावं... मिळालं तसं खावं बघू आता कसं होतंय ते" एवढं सांगून केशव बोलायचे थांबले... शेतीशिवाय जगण्याचं दुसरं कोणतंच स्किल माहिती नसलेला हा माणूस भर दुष्काळात कुठं बरं जाईल..? हा गहन प्रश्न त्या आखाड्यावरून बाहेर पडताना समोर उभा राहिला...

शेतशिवार पाहून मी डोनगावच्या पश्चिमेकडे आलो, गावाच्या पश्चिम भागात दलित शेतमजुराची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याच वस्तीत राधाकिशन तांबे या शेतमजुराचं पडकं घर आहे. दगडाचंच, माती लिपुन उभारलेल, घराबाहेर शेळ्यांचा गोठा, सायंकाळी पाच वाजता मी त्यांच्या घरी पोचलो तेंव्हा राधाकिशन तांबे घरीच बसलेले होते... मी विचारलं "घरी कसकाय ..?" ते म्हणाले "जाऊ कुठं..? काम ना धंदा, तीन महिने झालं घरीच बसून आहे.. सारा पावसाळा सरून गेला गावात पावसाचा थेंब नाही... मी मजूर माणूस साहेब... मिळाला रोजगार तर घर चालतं माझं कुण्या शेतकऱ्याने पेरलंच नाही, वापलंच नाही तर मला कोण कामाला लावील" "मग आता जगता कसं" विचारलं तेंव्हा ते म्हणाले " गाव हाय आता देतं कुणी बी, आणतो उदार पादार, अडन ताडन करीत ढकलतोय दिवस साहेब पण जास्त दिवस नाही निघायचे आता" असं सांगताना या रामकीशनची नजर गहिरी झाली होती... कारण त्याला मजुरीसाठी गाव सोडून जावं लागणार याची चिंता स्पष्ट जाणवत होती... घरी याची पोरगी बाळंतपणासाठी आलीय म्हणून हा थांबलाय नाहीतर एव्हाना याने आपलं बिऱ्हाड बांधलंही असतं... रामकीशनसारखे या गावातले अनेक मजूर आता हवालदिल झालेत... पावसाच्या पाण्यावर फक्त शेतकरीच नाही तर खूप काही अवलंबून असते हे डोनगावात आल्यानंतर कळतं...

अमोल आणि जिजा तांबे यांच्या शेताच्या बांधावरून आणि केशव तथा राधाकिशन यांच्या गल्ल्यातून फिरताना एक मात्र जाणवलं की ही माणसं संकटाच्या अगदी काठावर जगतायेत... यावर ठोस उपाय कुणीच काढायला तयार नाही... नावापुरती कर्जमाफी दिली खरी पण त्या कर्जमाफीने या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं केलंय... धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था निर्माण झालीय... दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी हे सरकार उर्वरित रक्कम आणून भरण्याची सक्ती करू लागलंय... अश्या गंभीर दुष्काळात पाच लाख आठ लाख अश्या मोठ्या रकमेवरचे उर्वरित पैसे कसे भरायचे ही शेतकऱ्यांसमोर चिंता आहे. दीड लाखासाठी उर्वरित रक्कम भरण्याची अट शिथिल करावी एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आणि शेती तथा मजुरांसाठी दूरगामी पायलट प्रोजेक्ट राबवले नाहीत तर अमोल, जिजा, केशव आणि राधाकिशन यांच्यासारख्या असंख्यांची नावं आपल्याला पेपरात नियमित वाचावी लागतील...

दत्ता कानवटे, औरंगाबाद.

Updated : 23 Aug 2017 11:35 AM GMT
Next Story
Share it
Top