Home > मॅक्स किसान > कर्जमुक्तीचे वगनाट्य !

कर्जमुक्तीचे वगनाट्य !

कर्जमुक्तीचे वगनाट्य !
X

अखेर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करत कर्जमुक्ती जाहीर केली. अल्पभूधारकांची कर्जमुक्ती लगेच घोषित करून सरसकट कर्जमुक्तीला तत्वत: व निकषांच्या गोंडस शब्दात गुंडाळून राज्यभर पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर सरकारला शेतकऱ्यांच्यापुढे झुकावे लागलं. प्रारंभी या आंदोलनाला दुर्लक्षित करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्यापुढे गुडघे टेकावे लागले. सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करून बाहेर पडणाऱ्या मंत्रिगटातील मंत्र्याची तोंडं काळी पडलेली दिसत होती. त्यांच्या उतरलेल्या तोंडानं सरकारी मानसिकतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहिला नाही. इतका मोठा निर्णय घेताना जो आनंद असायला हवा तो त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखी मंत्रिगटाची थोबाडं झाली होती.

सरकारने सरसकट कर्जमुक्ती मान्य केली असली तरी तत्वत: व निकष हे शब्द धोकादायक वाटतात. कारण शेतकरी आंदोलनात फूट पाडून संप मोडीत काढणारे सरकार प्रामाणिकपणे शब्द पाळेल याची खात्री वाटत नाही. याबाबत सुकाणू समितीचे सदस्य आमदार बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, ” सरसकट कर्जमुक्तीचा विषय तत्वता व निकषांसह मान्य केला आहे. तो येणाऱ्या दोन-तीन दिवसात सुकाणू समिती व मंत्रिगटाची बैठक होवून संपून जाईल. कर्जमुक्तीसाठी आता आंदोलन करावे लागणार नाही पण जर वेळ आलीच तर आम्ही सरकारला सोडणार नाही. तसंच हमीभावाबाबत मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते पंतप्रधानाच्या भेटीला जाणार आहेत. येणाऱ्या काळात सरकारचे आयात-निर्यात धोरण, स्वामीनाथन आयोग, रेडीरेकनर नुसार कर्ज आदी मुद्द्यावर आंदोलन करणार” असं त्यांनी त्यांनी सांगितले.

सरकारी उदासिनता व अनास्थेमुळे चिडलेला शेतकरी वर्ग अस्वस्थ होता. परिवर्तनाच्या अपेक्षेने त्यानं भाजपाला भरभरून मतदान केलं होतं. त्यांच्या आशा-अपेक्षांनी जणू आभाळाची उंची गाठली होती. पण सरकार सत्तेत आल्यावर त्या आशा-अपेक्षांचा चुराडा होत असल्याच पाहून तो पुन्हा अस्वस्थ झाला. या अस्वस्थ ज्वालामुखीला आमदार बच्चू कडूंनी फुंकर मारली. त्यानंतर राज्यभर धगाटा निर्माण झाला. अखेरच्या टप्प्यात खासदार राजू शेट्टींनाही आत्मक्लेश यात्रा काढून या आंदोलनात उतरावे लागले. भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊनही शेतकऱ्यांची कामं होत नाहीत. अशात सदाभाऊंना हाताशी धरून स्वाभिमानी शेतकरी संघटना खिळखिळी करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काहीतरी करणं त्यांना भाग होतं.

कर्जमुक्तीच्या मुदद्यावर आप-आपल्या परिनं चमकायचा अनेकजण प्रयत्न करत होते. ज्यांचा कधीच सामाजिक किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंध आला नव्हता असेही काहीजण पुढे आले होते. त्यांनी नौटंकी करून यात उजळून घ्यायचे प्रयत्न केले. पण पिचलेला व संतापलेला शेतकरी पेटून उठला होता. तो नेतृत्वाशिवाय लढत होता. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे सैन्य नेतृत्वाशिवाय इरेने लढत होते. त्याप्रमाणेच या आंदोलनात शेतकरी लढले. सुकाणू समितीतली गर्दी पाहताना मनाला असा प्रश्न पडत होता की या राज्यात इतके शेतकऱ्यांचे नेते व प्रतिनिधी असताना शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची व कर्जाची भिक मागण्याची वेळ का आली आणि का येते? आता कर्जमाफीनंतर सगळेच श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. अनेक लुंगे-सुंगे ते लुच्चे-लफंगेही यात मागे नाहीत. कर्जमुक्तीचे बालक एकच आहे पण "मीच बाप" म्हणून अनेकजण छाती बडवून घेत आहेत. पोर दुसऱ्याचेच पण "मीच बाप" म्हणून नाचणाऱ्यांनी राज्याचे मनोरंजन चालवले आहे. ते कितीही नाचले तरी कुणी कुणी योगदान दिलं, कुणी खो घातला, कुणी ढोंगबाजी केली? हे सर्व सामान्य शेतकरी जाणतो आहे.

सध्या राज्यात कर्जमुक्तीचं वगनाट्य चांगलंच रंगले आहे. सामान्य शेतकरी खूष आहे. पण, पदरात पडेपर्यंत तो सांशक असेल. कारण सरकावर त्याचा विश्वास नाही. सरकारनं जयाजी सूर्यवंशी सारखी अनेक प्यादी वापरून शेतकऱ्यांच्या लढ्याला खो घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मध्येच कल्पना इनामदार आल्या त्यांनी राजू शेट्टी व बच्चू कडू यांना सुकाणू समितीत घेण्यास विरोध केला. सरकारच्या प्रयत्नांना यश आले नाही. कारण शेतकरी वर्ग इरेला पेटलेला होता. जयाजी सुर्यवंशीच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटलेले पाहून सरकार हबकले होते. हबकलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रक्षोभापुढे झुकून मंत्रिगटापासून सदाभाऊ खोतांनाही बाजूला ठेवले. तसंच ज्या राजू शेट्टींना कमजोर करायचा प्रयत्न केला ते यात भाव खाऊन गेले. सरकारच्या विश्वासघातकी मानसिकतेमुळे लोकांचा सरकारवर विश्वास नाही. पण शेतकऱ्यांतून झालेल्या उठावापुढे सरकार झुकलेच. सरकारवाल्यांची सरकारी घमंड उतरली गेली. या शेतकऱ्यांच्या शक्तीपुढे सत्तेच्या गुर्मीने गर्विष्ट झालेल्या माना झुकल्या. म्हणूनच असे म्हणावे वाटते की, इथे झुकल्या,वाकल्या गर्विष्ट माना!

दत्तकुमार खंडागळे

संपादक, वज्रधारी

९५६१५५१००६

Updated : 12 Jun 2017 3:59 PM GMT
Next Story
Share it
Top