Home > मॅक्स कल्चर > “थिएटर ऑफ रेलेवंस” मानवतेचा कलात्मक हुंकार!

“थिएटर ऑफ रेलेवंस” मानवतेचा कलात्मक हुंकार!

“थिएटर ऑफ रेलेवंस” मानवतेचा कलात्मक हुंकार!
X

१९९० चे दशक आपला देश, विश्वं आणि मानवतेसाठी अमूलाग्र बदलाचा काळ होता. “औद्योगिक क्रांति” च्या चक्रावर स्वार होऊन मानवतेने सरंजामशाहीच्या दास्यातून बाहेर पाडण्याचे स्वप्न पाहिले. परंतु १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला साम्यवादाचे किल्ले ढासळले आणि “औद्योगिक क्रांती” सर्वहारा वर्गाच्या मुक्तीचा रक्षणकर्ता/तारणहार होण्याऐवजी भांडवलशाहीचा धोकादायक शोषक आणि अमानवी उपक्रम निघाला त्याने केवळ सरंजामी विचाराला बळकट केले असे नव्हे तर विज्ञानाच्या आविष्काराला तंत्रज्ञान देऊन जागतिकीकरणाच्या माध्यमाने जगाला एक शोषित खेडे बनवले. अशा काळात भारत ही या वैश्विक प्रक्रियां पासून अस्पर्शित राहिला नाही .

एकध्रुवीय वैश्विक घटनांनी भारताच्या उत्पादक क्षमता उद्धवस्त करण्यास सुरवात केली. आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या ६६ हजार गिरणी कामगारांना भांडवली षडयंत्रा द्वारे कामावरून काढून टाकले आणि गिरण्यांना कुलूप लावले. मुंबईला सिंगापूर आणि शांघाय बनवण्याचा कारस्थान अमलात आणले गेले आणि त्याच्याच परिणामी आज गिरण्यांच्या जागी मोठे मोठे 'मॉल' आणि 'टॉवर' दिसत आहे.

अशा बिकट आणि मानवी संकट काळात लोकांना एका अशा मंचाची गरज होती जो त्यांना अभिव्यक्तीची संधी देईल, जो त्यांच्या मनातील गोष्टी जनसामान्यात पोहचवेल. त्यातून एका रंग चिंतनाची सुरवात झाली आणि एक नव्या रंग सिद्धांताची निर्मिती झाली . या रंग सिद्धांताने भांडवलशाहीच्या शोषण आणि दडपशाहीच्या ‘कलेसाठी कला’ या कलात्मक भ्रमाचा निरस केला आणि नवे रंग तत्व जगासमोर मांडले

'थिएटर ऑफ रेलेवंस' चे सिद्धांत

  1. 'थिएटर ऑफ रेलेवंस' हे एक असे रंगमंच आहे , ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
  2. कला ही कलेसाठी नसून समाजाप्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
  3. जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.
  4. जे स्वतःचा बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
  5. जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.

१२ ऑगस्ट १९९२ या दिवशी ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस' नाट्यदर्शनाची / तत्वज्ञानाची रचना झाली आणि त्याच्या प्रत्यक्षात येण्याचे आव्हान समोर उभे राहिले. भांडवलशाहीच्या स्वतःच्या अशा शोषण पद्धती आहेत. ती अनेकदा धर्म, अज्ञान, राष्ट्रवाद आणि अन्य रुढ़िवादी परंपरांद्वारे आपले पाय पसरवते. भारतीय संविधानाच्या सर्वात पवित्र आणि भारताच्या अस्तित्वासाठी आधारभूत अशा 'धर्मनिरपेक्षता' या सिद्धांताला सरळ सरळ आव्हान देते गेले आणि धार्मिक कट्टरवादयांच्या झुंडीने बाबरी (मशिद) पाडली आणि देश / मुंबई धार्मिक दंगलीत होरपळून निघाला .

अशा नाजूक काळात ‘थिएटर ऑफ रेलेवंस' च्या संवेदनशील प्रतिबद्ध कलाकारांनी जीवावर उदार होऊन मुंबईच्या कानाकोपऱ्यांत जाऊन ‘दूर से किसी ने आवाज़ दी’ या नाटकाचे प्रयोग केले. मला तो दिवस आठवतो , जेव्हा मी आमच्या कलाकारांना सफेद कुरते देताना सांगितले होते की, 'हे आपले कफन आहे' परंतू सर्वच कलाकारांनी दंगलीतील द्वेष आणि घावांना आपल्या कलेतुन प्रेम व मानवी ऊब दिली. माझ्या मते तो प्रत्येक कलाकार श्वास घेतो जो आपलं कलात्मक उत्तरदायित्व निभावतो. हे शोषण, हिंसा व धार्मिक कट्टरवादा विरुद्ध एका दीर्घ संघर्षातील एक छोटेसे यश होते, परंतु या यशाने आमच्या कलात्मक सिद्धांताला विश्वास दिला आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंग सिद्धांताला जनमान्यता प्राप्त झाली.

भांडवलशाही सरड्याप्रमाणे रंग बदलते. कोणत्याही व्यवस्थेचे शोषणकारी तत्व तिचे वाहक व मित्र असतात. भारतीय परिप्रेक्ष्यात ती जातीयवाद, पितृसत्तात्मक समाज, रुढीवाद आणि धार्मिक कट्टरवादाने भरलेल्या मध्यम वर्गाच्या रुपात आपलयाला दिसते. ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस' ने एका योजनाबद्ध रीतीने या आव्हानांचा सामना केला. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या अधिकारासाठी एक दीर्घ लढा दिला. आजही तो लढा शुरू आहे. 'नाटकातून बदल घडतो’ या विचाराची “थिएटर ऑफ रेलेवंस" ही प्रयोगशाळा आहे. हा बदल आपण स्पर्शातून मोजून मापून पाहू शकतो, ‘मेरा बचपन’ नाटकाचे १२,००० पेक्षा जास्त प्रयोग झाले. या नाटकाच्या माध्यमातून ५०,००० पेक्षा जास्त बालमजुरांचे जीवन बदलले. ते आज शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, काहीजण आज कॉलेजला जाताहेत तर काही आज व्यावसायिक रंगकर्मी बनले आहेत.

“थिएटर ऑफ रेलेवंस" ने जीवनाला नाटकाशी जोडून लोकांच्यात रंग चेतना जागृत केली. नाटक लोकांशी जोडले. आपल्या नाट्य कार्यशाळांतून सहभागी लोकांना (सहभागी) नाटक व जीवनाचा संबंध, नाट्य लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विविध रंगमंचीय पैलू अवगत करण्यासाठी प्रशिक्षण दिले. कलात्मक क्षमतेचे दैवी वरदान हटवून तिला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले. या २४ वर्षांत १६ हजार पेक्षा जास्त रंगकर्मींनी १००० कार्यशाळांमध्ये भाग घेतला. भांडवलदारी कलाकार कधीच आपली कलात्मक जबाबदारी घेत नाहीत. म्हणूनच “कलेसाठी कला” या चक्रव्यूहात अडकतात. भोगवादी कलेच्या चक्रात अडकून संपून जातात. “थिएटर ऑफ रेलेवन्स" ने “कलेसाठी कला” सारख्या उपनिवेशी व भांडवलवादी विचाराचा चक्रव्यूह आपल्या तत्वांनी व सार्थक प्रयोगांनी भेदला आहे. हजारों ‘रंग संकल्पना' जोपासल्या आणि अभिव्यक्त केल्या. आतापर्यंत २८ नाटके १६,००० पेक्षा जास्त वेळा रंगमंचावर आणले आहेत.

“थिएटर ऑफ़ रेलेवन्स" चे सर्व नाटकांनी समाज मूल्यांना आव्हान दिले : कौंटुबिक हिंसेवरील नाटक ‘द्वंद्व’, स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज असलेले नाटक ‘मैं औरत हूँ’ आणि गर्भलिंग चाचणीवरील ‘लाडली’ या नाटकानं राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवली.

खरेतर 'थियेटर ऑफ रेलेवंस'ने भारतीय मानसात रुजलेली औपनिवेशीक समझ हळूहळू बदलली. थिएटर ऑफ रेलेवंस नुसार थिएटर एक चैतन्यदायी अनुभव आहे. या अनुभवाचे कुठेही, कधीही सृजन व पुनःसृजन करता येते. थिएटर काळ व अवकाशाचे (स्पेस) मानवी अनुभवांनी जिवंत केले जाते. म्हणूनच थिएटरमध्ये काळ व अवकाश (स्पेस) हे मौलिक पैलू आहेत. थिएटर एक अनुभव आहे. विशुद्ध रूपात माणसाच्या रूपात, आकारात घटित होणारे कार्य आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी ,प्रत्येक परिस्थितीत हा अनुभव वेगळा असतो, नवा असतो. १०० टक्के एकसारखा नसतो, तो बदलत राहतो. त्यात काळ आणि परिस्थिती हे कारक आहेत. मनःस्थिति ( मनोवैज्ञानिक) कारक असते. त्यामुळे थिएटर स्थिर, जड किंवा कुंठित झालेली कला नाही.

नाटक करण्यासाठी व्यावसायिकतेच्या नावावर मोठमोठी उपनिवेशी संसाधने वा रंग दालनांची गरज नाही. थिएटरची मूलभूत गरज आहे एक सादरकर्ता आणि एक दर्शक. हीच आमची महत्वाची आणि मूलभूत गरज आहे. “थिएटर ऑफ़ रेलेवंस" रंगसिद्धांतानुसार रंगकर्म हे दिग्दर्शक व अभिनेता यांच्याभोवती केन्द्रित होण्याऐवजी “दर्शक आणि लेखक केन्द्रित असावे लागते. कारण दर्शक हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली रंगकर्मी असतो. या सिद्धांताने दर्शकाच्या मुद्द्यांना आपले ध्येय बनवले

जागतिकीकरणाने जगातील जैविक आणि भौगोलिक वैविध्य उध्वस्त केले. आजही करत आहे. या जागतिकीकरणाचा चेहरा अतिशय विद्रूप आहे. याच विद्रूपतेच्या विरोधात आम्ही “बी-७” हे नाटक केले. त्यातून “थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने आपली वैश्विक झेप घेतली आणि २००० साली जर्मनीत त्याचे प्रयोग केले. मानवता आणि निसर्गाच्या नैसर्गिक संसाधनांच्या खाजगीकरणा विरुद्ध २०१३ मध्ये “ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर” हे नाटक यूरोप मध्ये प्रस्तुत केले. हे नाटक भारतातच नव्हे तर विश्वाच्या कोणत्याही भागातील पाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करते. "पाणी हा आपला नैसर्गिक आणि जन्मसिद्ध अधिकार आहे” खाजगीकरणासाठी अंध झालेल्या सरकारी यंत्रणेला हे समजले पाहिजे की, जे सरकार आपल्या नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा देऊ शकत नाही त्या सरकारने संस्कार,संस्कृती चा दावा आणि विकासाची फसवणूक बंद करावी.

उजवे राजकीय पक्ष लोकांची श्रद्धा,धर्म,राष्ट्रीयता,संस्कृति,संस्कार,सांस्कृतिक वारसा अशा भावनात्मक मुद्दयांचा उपयोग स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करतात. त्यांनी तरुणांना बहकवण्याचे यशस्वी षडयंत्र रचले आहे. त्यांचे मन मलीन केले आहे . भावना भडकवून त्यांचा तर्क, विचार करण्याची बौद्धिक क्षमता यांचा ऱ्हास केला आहे. भारतीय संविधानाच्या पवित्र सिद्धांतांच्या विरोधात तरुणांच्या मनात विष पसरवले आहे. आरक्षण हे भारतातील विषमता दूर करण्याच्या दिशेने उचललेले सामाजिक न्याय व समतेसाठी अनिवार्य पाऊल आहे. परंतु अलीकडेच आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात वाद सुरु झाले आहेत. याचा अर्थ सवर्ण जातीतील तरुण आरक्षणाला आपल्या प्रगतीतील अडथळा मानतात. भारतासारख्या देशात मूल कोणत्या जातीत जन्माला येते त्यावर त्याचे भवितव्य ठरते. तिथे आरक्षण हे एक न्यायसंगत संविधानिक धोरण आहे, असा विचार करण्याच्या स्थितीत ते नाही.

अशा आव्हानात्मक काळात “थिएटर ऑफ रेलेवेंस” युवकांची रंगकार्यात सरळ सहभागी करून घेत आहे. आपण समाजात नाटकाच्या प्रभावाचे कौतुक करतो. परंतु थिएटर मध्ये आपली प्रत्यक्ष भागीदारी नगण्य आहे. दर्शक या नात्याने नाटकाचे मंचन वा प्रस्तुतिचा आमच्यावर गहिरा प्रभाव पडतो. परंतु प्रत्यक्ष नाटकातील सहभागाने आपल्या व्यक्तित्व, विचारआणि मूल्यांत परिवर्तन होते. म्हणूनच थिएटर निरंतर परिवर्तित होत असते. ते स्वतःशी, दुसऱ्यांशी, सर्वांशी जोडले जाते. ते अत्यन्त व्यक्तिगत असूनही ते सामूहिक असते. अत्यन्त सामूहिक असूनही ते व्यक्तिगत असते. सामूहिक असूनही सार्वभौमिक असते. हाच थिएटरचा अद्भुत पैलू आहे. व्यक्तिगत अनुभव सामूहिक आणि सार्वभौमिक रूप घेतो व पुन्हा व्यक्तिगत होतो. ही अद्भुत प्रक्रिया आचार, विचार, भाव , मूल्य, मनोविज्ञान यांच्यात बदल घडवत राहाते आणि नवे विचार,भाव, विचार मूल्य यांचे सर्जन करते. सूक्ष्मांतील सूक्ष्मांला मूर्तरूप देऊन पुनः सूक्ष्म होण्याची ती प्रक्रिया आहे. निर्माण होऊन कोसळणे /मोडणे आणि कोसळून / मोडून पुन्हा निर्माण होण्याची ही एक कलात्मक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.

थियेटर ऑफ रेलेवेन्स चुकीच्या धारणा, रूढी तोडते. मानवी गुंतागुंत सोडवते. पारदर्शिता निर्माण करते. भावनात्मक स्तरावर सर्व पडदे पाडून एक भावरूप देते. हाच भाव विचारांना नव्या विचारांसाठी उत्प्रेरित करतो आणि एक नवी दृष्टी, अन्तदृष्टि देतो. माणसाला माणूसच राहू देण्यासाठी 'गर्भ' या नाटकाचे मंचन केले गेले. हे नाटक मानव जातीच्या संघर्षाची जाणीव करून देते ,ते मानवाच्या जीवन जगण्याच्या आव्हानांशी संबंधित आहे. आपल्यातील प्रत्येकाच्या आजूबाजूला राष्ट्रवाद, वर्णभेद, धर्म, जाति, प्रणाली या माध्यमातून एक कोष विणला जातो त्या कोषाच्या अस्तित्वावर ते प्रश्न उपस्थित करते.

धर्म , कला, साहित्य व सांस्कृतिक परंपरा ही सारी माणसामाणसांतील परस्पर संवाद, मिलाफ व संपर्काची साधने होती. दुसऱ्या विश्वयुद्धा नंतर भांडवली व साम्राज्यवादी देशांनी ‘व्यापार हे वैश्विक संपर्काचे मूलभूत सूत्र बनवले व जगात WTO च्या माध्यमातून प्रस्थापित केले. त्याच्या उद्देश्य आहे "नफा". या संकल्पनेच्या मुळाशी मनुष्य, माणुसकी हे श्रेष्ठ नाही, सभ्यता श्रेष्ठ नाही केवळ नफा श्रेष्ठ आहे यातून माणूस केवळ खरेदीविक्रीचे सामान बनला आहे. या नव्या आर्थिक धोरणाचा आधार आहे बोली, बाजार,उपभोग आणि नफा. या तंत्राचा बळी झालेल्या आपल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतीच्या विनाशावर आम्ही 'संघर्ष शेतकऱ्यांचा'! हे नाटक केले .

कलाकारांनी कठपुतळी बनवण्याऱ्या या आर्थिक तंत्रापासून कलाकारांना मुक्त करण्यासाठी आम्ही “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स" हे नाटक रंगमंचावर आणले .हे नाटक एक कलात्मक चिंतन आहे, ते कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा ,कलात्मक मूलभूत प्रक्रिया समजून घेणं आहे. कला उत्पादन नव्हे , आणि कलाकार उत्पादक नव्हेत . जीवन म्हणजे नफा आणि नुकसान ह्याचा ताळेबंद नाही . म्हणूनच हे नाटक कला व कलाकारांना उन्मुक्त करत, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक ऊर्जेतून अधिक चांगले विश्व बनवण्यासाठी प्रेरित आणि कटिबद्ध करते.

माणसाकडून माणूसपण,निसर्गाकडून त्याची संसाधने हिसकावून घेणारे जागतिकीकरण विषमता व अन्यायाचे वाहक आहे. हवा ,जल , जंगल व मानवतेच्या विध्वंसावर त्याच्या विकासाचा पाया टाकलेला आहे त्यातून पृथ्वीचे तापमान वाढत आहे.अशा काळात लोकशाही व्यवस्थेचा आवाज असलेली प्रसारमाध्यमे ही भांडवलदारांच्या मांडीवर बसून नफा कमवत आहेत. "थिएटर ऑफ रेलेवेंस” हा नाट्य सिद्धांत या राष्ट्रीय आव्हानांचा स्वीकार तर करतोच , पण त्याचवेळी राष्ट्रीय अजेंडा सुद्धा निश्चित करतो .

सत्ता नेहमीच कलाकारांना घाबरते. सत्ता हुकूमशहाची असो की लोकशाही व्यवस्थेची असो तलवारी,तोफा व अणूबॉम्ब चा मुकालबा सत्ता करू शकते पण कलाकार,रचनाकार, नाटककार,चित्रकार व सृजनात्मक कौशल्याने परिपूर्ण व्यक्तितत्वाचा सामना ती करू शकत नाही. कारण कलाकार मूलतः विद्रोही असतो, क्रांतिकारी असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कृतीचा जनमानसावर अद्भुत प्रभाव पडतो.

"थिएटर ऑफ़ रेलेवंस" ने जीवनाला नाटकाशी जोडून एक रंगचेतना जागृत केली आणि तिला लोकांशी जोडले. “थिएटर ऑफ़ रेलेवंस" च्या रंगमंचीय प्रस्तुती कोणत्याही खास , प्रतिष्ठित रंगस्थळांपुरत्या सीमीत नाहीत . त्याचे नाट्यविष्कार रंगस्थळांच्या उपकारांवर अवलंबून नाहीत , कोणत्याही सरकारी, बिगरसरकारी, देशी-विदेशी संस्थांच्या पैसांवर पोसलेला नाहीत . त्याचे खरे खुरे धन आहे त्याचा "उद्देश्य" व खरे खुरे संसाधन आहे 'दर्शक' या आधारावर कठीण परिस्थितीतही माणुसकीचा आवाज बनून समोर येते. आपले तत्वज्ञान व सकारात्मक प्रयोगांनी राष्ट्रीय व वैश्विक पटलावर अधिक चांगले, सुंदर व मानवी विश्व निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक चेतना जागवून एका सांस्कृतिक क्रांतीसाठी कटीबद्ध झाले आहे.

- मंजुल भारद्वाज

(रंग चिंतक - “थिएटर ऑफ़ रेलेवंस” चे निर्माता व प्रयोगकर्ता)

संपर्क – [email protected] / 9820391859

Updated : 16 Feb 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top