Home > मॅक्स कल्चर > ‘शहाणपणा’च आला मदतीला धावून...

‘शहाणपणा’च आला मदतीला धावून...

‘शहाणपणा’च आला मदतीला धावून...
X

प्रवास... कुणाला नाही आवडत... प्रत्येक प्रवासाच्या निरनिराळ्या रंगीबेरंगी आठवणी... मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यानिमित्त मला राज्याराज्यांत, देशात फिरावे लागते, तेही एकट्याने नाहीतर माझी अख्खी फलटण घेऊन...

यावेळेला जायचे होते ओडिशामध्ये... तेथे होणाऱ्या ग्लोबल थिएटर फेस्टिव्हलमध्ये मी आणि माझ्या ग्रुपने सहभाग नोंदवला होता...

अर्ररररर... मी काय थेट मुद्यालाच हात घातला... क्षमा करा, मी कोण? काय करतो? हे सांगायचंच राहूनच गेलं...

मी महेश सोनावणे... साताऱ्यातील ऱ्हिदम कला व साहित्य अकादमीचा अध्यक्ष...

तर... ओडिशाच्या कटकमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचा ठसा उमटवण्यासाठी मी आणि माझी कलाकार मंडळी फारच उत्सुक होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही सातारा ते पुणे आणि पुण्याहून ओडिशाला जाण्यासाठी एक्स्प्रेस पकडली... प्रवास करताना मला मंडळींची जास्त काळजी घ्यावी लागणार होती, कारण 9 ते 12 वयोगटातील माझे 20 विद्यार्थी, त्यातही मुलींची संख्या जास्त...

एक्स्प्रेस पकडल्यानंतर आम्ही आमच्या जागांवर सामानसुमान ठेऊन सेटल झालो. काही वेळानंतर अचानक एक जण आला आणि दोन सीटमधील जी मधली जागा असते ना तेथेच तो आडवा होऊन झोपला... दोन मिनिटं तो नेमके काय करतोय हे समजलंच नाही... कोण? कुठचा? हा तिऱ्हाईत येतो काय आणि सीटवर मुली झोपडलेल्या असताना तेथे खालील बाजूस येऊन झोपतो काय?... मुलींची जबाबदारी माझ्यावर असल्यानं मी त्याला उठवले आणि म्हटलं,

‘यहाँ पे मत सोईए. दोनो तरफ लडकीया सोयी हुई है इसलिए’. तर उलट मलाच धमकी द्यायला त्याने सुरुवात केली, ‘मैं चैन खिच कर पोलीस से तुम्हे पिटवाऊंगा’. हिंदीपेक्षा मराठीच चांगलं येत असल्याने बोलता बोलता माझ्या तोंडून शब्द निघून गेला, ‘शहाणपणा करू नकोस ज्यादा’.

तर मला म्हणे ‘मराठी मे मत बोल, यह महाराष्ट्र नही है....’ मग माझी सटकली मी म्हणालो ‘5 मिनिटांत जा नाहीतर मीच पोलिसांना घेऊन येतो’. त्यानंतर मी दुस-या डब्यात गेलो दोन पोलिसांना सोबत घेऊन आलो.

तोपर्यंत डब्यातील स्थानिक प्रवाशांनी त्याला समजावले की, ‘वह महाराष्ट्रसे आए है उनकी कदर करनी चाहिए, हमे भी वहाँ जाना पडता है. और लडकीया है तो वहाँ नही सोना चाहिए’. प्रवाशांनी मलाही सांगितले की, जाऊ द्या आम्ही त्याला समजावलेय. अशा प्रकारे ‘शहाणपणा करू नकोस’ या एका मराठी वाक्यामुळे केवढी मदत मिळाली... स्थानिक प्रवाशांनी मदत केल्याने पुढील प्रवासातील समस्यादेखील सुटल्याने माझा जीव भांड्यात पडला.

हा प्रवास खरं तर आणखी एका गोष्टीमुळे विस्मरणीय ठरला ते म्हणजे जेव्हा ग्लोबल थिएटर फेस्टिव्हलमध्ये सोलो डान्स स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळाले. सोबत बेस्ट डान्सर व बेस्ट अॅक्ट अशा दोन पारितोषिकानंही गौरवण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताबरोबर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमधील कलाकारांनीही आपआपल्या देशातील संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्रातील थोर योद्धा पुरुषांची कथा मी नृत्यातून सादर केली. साडेपाच मिनिटांच्या गाण्यातून पाचवेळा वेशभूषा बदलून नृत्य सादर केले. राज्यासोबत सातारा जिल्ह्याचाही डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवल्याने मुंबईतील ज्येष्ठ लोककला अभ्यासक सदानंद राणे यांनीही माझे कौतुक केले.

Updated : 11 Feb 2017 5:38 AM GMT
Next Story
Share it
Top