Home > मॅक्स कल्चर > प्रबोधनकारांनी कोणता कानमंत्र दिला?

प्रबोधनकारांनी कोणता कानमंत्र दिला?

प्रबोधनकारांनी कोणता कानमंत्र दिला?
X

चार दशकापूर्वी मी आणि तत्कालीन पोलिस कमिशनर रामराव नलावडेंचे चिरंजीव बांद्र्याला प्रबोधनकार ठाकरेंना भेटायला गेलो. त्या वेळी त्यांनी, मॉरल रिऑर्नामेंट MRA बद्दल काय माहिती आहे का, असा प्रश्न विचारला पण आमचे अज्ञान बघून त्यांनीच भाष्य केले. त्यानंतर दत्ता बाळ यांच्या बरोबर आणखी दोन वेळा भेट झाली. त्यांनी दिलेला कानमंत्र आम्ही आचरणात आणला.

देवळातील अधर्म चव्हाट्यावर आणण्याचे आरंभले. आता या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार आणि दक्षिण महाराष्ट्रातील शिवसैनिक सहभागी झाले आहेत. अर्थात ही सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी, वाणी म्हणजे ज्वालामुखीची धग. त्यांनी सांगितले होते हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती अडकून पडली आहे ते. तिचा उपयोग देशोध्दाराच्या कामी न होता, लुच्च्या-लफंग्या, चोर, ऐदींच्या चैनीसाठी होत आहे... तर याकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे ते म्हणाले होते.

दुष्काळाने कोट्यवधींची अन्नान्न दशा झाली. (आता तर कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.) तरी देवळातल्या दगड-धोंड्यांना शिरा, केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भया भया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिनघोर चालूच आहे. देशातला शेतकरी कणीकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या पुजारीसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळाएवढाही खड्डा आजपर्यंत कधी पडला नाही.

करवीर निवासिनी अंबाबाई ही शिवपत्नी पार्वती अजूनही ती विष्णुपत्नी आहे हे रंगवण्यासाठी करवीर पुराण रचले ते भाबड्या भक्तांना खरे वाटू लागले. त्यात भर म्हणून मंदिराच्या मालकीचा ताम्रपट दिला अशी थापही पुजाऱ्यांनी मारली. भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवली. देवळे म्हणजे भटांच्या पोटापाण्याची सोय. हे बहुसंख्य बहुजनांना कळू नये म्हणून पुराणकथा. देवळावर देह जगविणाऱ्यांचा भरपुराणावरच असतो, उपनिषदावर नसतो. पुराणकथा पाचकळ असतात. या पुराणकथा वाचणारा, पचनी पडलेला प्रत्येक प्राणी इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्या, पुजाऱ्याच्याच पायावर डोके ठेवतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो.

देवळात कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने होतात पण सर्व श्रोत्यांचे कान भागवत आणि पुराणातील शृंगारिक नि छिनाल कथा ऐकण्याकडे असतात. या श्रवण, मननाने बहुजनसमाजातील हिंदू स्त्री- पुरुषांच्या मनावर घाणेरडे आणि विकृत परिणाम आजपर्यंत झाले. आज होत आहेत व पुढे होतील. भटांनी, पुरोहितांनी या पुराणकथांतून बहुजन समाजाची जी बीभत्स नालस्ती केली आहे त्याची न्याय-विधि खात्याने चौकशी करावी. नाहीतर एक दिवस जागृत ब्राह्मणेतर उघड उघड या पुजाऱ्यांना जोड्याने मारून त्यांची शेंडी गदागदा हालवतील.

प्रबोधनकारांनी जे भाकित केले ते शब्दश: त्यांच्या नातवाच्या, पणतूच्या काळात खरे ठरले. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील एका मस्तवाल पुजाऱ्याला महिलांनी भर महसूलमंत्र्यांच्या सभेत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हजेरीत, चपलांनी बडवले त्याला कपडे फाटेपर्यंत ठोकले.

प्रबोधनकार म्हणतात या बहुजनांच्या संघर्षामागची भावना न्यायाधीशांना कळते पण वळत नाही. त्यांच्या न्यायाचा काटा धोब्यांच्या उभ्या-आडव्या घावाप्रमाणे पुराण मंडणावर म्हणजेच पुजारी, भटा-बामणांच्या जाळ्यात अडकून पडतो. कोल्हापूरला अलिकडे घडलेली घटना अशीच आहे. सरकारी वकील, जिल्हा कोर्टात पुजाऱ्यांनी दावा दाखल केला तो कोर्ट आणि पुजारी सारेच जाळ्यात अडकलेले.

मुख्यमंत्री, केंद्र सरकार हेही बहुजनांना प्रतिकू.ल लोकशाहीचा चौथा स्तंभही पुजाऱ्यांच्या डी.एन.ए.शी जुळणारा. त्यात भर म्हणजे ब्राह्मण संघातर्फे न्यायाधीश ब्राह्मण म्हणून जाहीर सत्कार होतो. ही गोष्ट उच्च आणि सर्वोच्च न्यायाधीशांनी गांभीर्याने घेण्यासारखी आहे. पंढरपूरप्रमाणे अंबाबबाई मंदिर पुजारी हटावो संघर्षात वरील गोष्टी जनहिताच्या विरोधी ठरू शकतात. त्याचा जाहीर निषेध व्हायला हवा.

प्रबोधनकार ठाकरे परखडपणे सांगतात, देवळे म्हणजे पुजाऱ्यांच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमचझाला आहे. पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या वाढवण्यासाठी देवांची संख्या भरमसाठ करत ती ३३ कोटींवर नेऊन ठेवली. देवांच्यातही श्रेष्ठ-कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्यात. विष्णु श्रेष्ठ, बाकी देव तुच्छ. प्रत्येक देवाचे देऊळ या स्पर्धेने साऱ्या देशभर देवळांचा मुसळधार वर्षाव.

देव, भक्त यांच्या संप्रदायात भेदाभेद झाला तरी हे देवाचे दलाल म्हणून हजर. बाप राममंदिराचा पुजारी तर पोरगा रावणाच्या पूजेला हजर. एकाच गावात एकाच देवाची मंदिरे उभी करायला लावण्यात ही भटं तयार. जिलब्या मारुती पासून भिकारदास मारुतीपर्यंत अनेक मारुती. अशा देवळांद्वारे भटांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सहजपणे सोडवला.

भटांच्या थापेबाजीला बळी पडलेल्या छत्रपतींनी, राजांनी, भोळसट हिंदूंनी देवाला जमिनी, दागदागिने दान दिली. धारादत्त ( म्हणजे शेतसारा गोळा करून मठ, देऊळ चालवा) दिली. पण हे माजोरे पुजारी, शंकराचार्य मठाधीश स्वत:ला मालक, हकदार समजू लागले. आता त्यांची हकालपट्टी पंढरपूरप्रमाणे करून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आणि वार्षिक उत्पन्न बहुजनहिताय बहुजन सुखाय वापरण्याची वेळ आली आहे. मात्र गेल्याच आठवड्यात कोल्हापुरात आमच्या भोळ्याभाबड्या महसूल मंत्र्यांनी आवाहन केले की, तालमीप्रमाणे महानगर पालिकेच्या मोकळ्या जागेत मंदिरे बांधा. आपण पैशाची मदत करू.

पुरोगामी महाराष्ट्राचा मंत्री हिंदू राष्ट्र या संघप्रणित, भाजपच्या ध्येयधोरणाप्रमाणे मंदिरे वाढवत असेल तर ते कोणासाठी? ब्राह्मण जातीला आर्थिक रीत्या बलवान बनवण्यासाठी!त्यामुळे बहुजनसमाज धार्मिक गुलामगिरीत कायमचा राहील. बहुजन समाजानेच ही अधर्माची देवळे आता बंद करावीत. तेथे जाणे बंद करावे. दान-दक्षिणा या भटांना पोसणाऱ्या काळ्या पैशांचे रांजण भरणे बंद करावे.

गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही

प्रबोधनकार ठाकरे कडाडतात, देवळे ही जाती द्वेषाची नरककुंडेच होत. कारण जातीभेद आणि जातीद्वेषाचा उगम या धर्ममंदिरातूनच होतो. स्वजाती वर्चस्वासाठी हिंदूंची देवळे म्हणायची... पण ती भटांची खास मिरास. बामणाशिवाय देव कोणाची पूजा घेत नाही. कोणी ब्राम्हणेतराने पूजा केली की म्हणे लागलीच तो भंगतो. त्याला दरदरून घाम सुटतो. मग तो नवसाला फळत नाही. काकड आरतीला उठत नाही. नैवेद्याचे ताट चाटीत नाही, पालखीत बसत नाही. विडा खात नाही. खाल्ला तर गिळत नाही. थुंकतही नाही. त्यामुळे भटांच्या तोंडचे पाणी पळते. देवळातूनच देव आता गायब झाला आहे.

प्रबोधनकारांच्या या अपेक्षेप्रमाणे करवीर निवासिनी अंबाबाई आता या पुजाऱ्यांच्या पापाला कंटाळून मंदिर सोडून गेली असावी...!

डॉ सुभाष के देसाई

Updated : 11 Aug 2017 6:43 AM GMT
Next Story
Share it
Top