Home > मॅक्स कल्चर > अरुंधती रॉयच्या नव्या कांदबरीच्या निमित्ताने...

अरुंधती रॉयच्या नव्या कांदबरीच्या निमित्ताने...

अरुंधती रॉयच्या नव्या कांदबरीच्या निमित्ताने...
X

येणार येणार म्हणून गाजत असलेली अरुंधती रॉय यांची कादंबरी अखेर आली… “मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस" असे कादंबरीचे नाव आहे. साधारणपणे ४५० पानाची ही कादंबरी सुबक हार्डबाउंड आकारात छापलेली आहे. त्यासाठी खास स्वीडन वरून मागवलेला कागद वापरण्यात आला आहे. पुस्तकाचा आकार नेहमीप्रमाणे नाही. किंचित चौकोनी आहे पण चौरसाकृतीही नाही.

मुखपृष्ठ माझा मित्र मयंक ओस्टीन याने केलेले आहे. त्याबद्दल त्याला अरुंधती रॉयने एवढेच सांगितले होते की दिल्लीच्या एका थडग्याचा फोटो हवाय. विशिष्ट असे कोणतेही नाही पण ते थडगे ओळखता यायला नको. अशीही तिने सूचना दिली होती. त्याप्रमाणे त्याने बऱ्याच थडग्यांचे फोटो काढले. त्यानिमित्ताने एखादा पुस्तकाचा इव्हेंट कसा होतो हे बघण्यासारखे आहे.

वीस वर्षापूर्वी अरुंधती रॉय यांची कादंबरी आली आणि गाजली जिच्या तेव्हा चार लाख प्रती खपल्या. कादंबरीचे नाव होते ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग’ कादंबरीचे कौतुकही खूप झाले टीकाही खूप झाली. जाहिरातीशी सर्वात लांब लिहिलेली कॉपी असे एकाने वर्णन केले फारूक दोन्डी मंडळी त्यावर तुटून पडले. उलट अरुंधती रॉयला बुकर मिळाले आणि बुकर मिळालेली पण भारतात राहून लेखन करणारी ती पहिली भारतीय लेखिका ठरली. तर इतर बुकर विजेती मंडळी जरी कॉमनवेल्थ मानत असली तरी ती प्रामुख्याने ब्रिटनमध्ये वैगरे राहतात. उदा: सलमान रश्दी.

जादुई गद्य हा अरुंधती रॉयच्या पहिल्या कादंबरीचा स्थायीभाव होता. अरुंधती रॉयला बुकरचे सहा सात लाख डॉलर्स मिळाले. कादंबरीच्या भरघोस खपातून भरपूर रॉयल्टी मिळाली. त्याही पेक्षा ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखिका म्हणून मान्यताप्राप्त झाली. खरतर एखादा लेखक यामुळे संतुष्ट होऊन गेला असता. पण तिने नर्मदा बचाव आणि तत्सम आंदोलनात स्वतःला झोकून दिले. मिळालेले सारे पैसे नर्मदा बचाव आंदोलनाला दिले. मला वाटते त्यातून मेधा पाटकरांनी बऱ्याचश्या बोटी आणि अनेक गोष्टी विकत घेतल्या. स्वतःचा आवाज तिने खंबीरपणे नर्मदा बचाव आंदोलनाच्या मागे उभा केला. तेव्हापासून ती आदिवासी, नक्षलवादी,काश्मिरी यांच्यासाठी आपला आवाज राबवते आहे. तिची मते सर्वांना मान्य होण्यासारखी अजिबात नाहीत. मात्र ती ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते तो वर्ग दीर्घकाळ वंचित राहिलेला आहे. हेही समजण्यासारखे आहे.

आज अरुंधती रॉय आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच मोठी लेखिका मानली जाते. तिने वेळोवेळी इतरत्र लिहिलेल्या आउटलुक आणि निबंधांचे संग्रह प्रसिद्ध होत गेले. त्याच्यामध्ये पहिलाच लेखसंग्रह आहे तो वाजपेयी सरकारने केलेल्या अणुस्फोटाच्या विरुद्ध आवाज उठवणारा. त्यानंतर यासारखे अनेक प्रश्न तिने घेतले. साहजिकच उजव्या आणि मध्यम मंडळींच्या ती द्वेषाचा विषय ठरली. पण अरुंधती रॉय आपले काम करतच राहिली. तिचे नुकतेच आलेले छोटे पुस्तक अर्थात कादंबरी ही केवळ तीनचार माणसांच्या गप्पा आहेत. ती रशियामध्ये स्नोडेनला भेटली आणि स्नोडेन आणि इतर दोनजण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून ते पुस्तक साकारले आहे. थोडक्यात आज अरुंधती रॉय जे काही लिहील त्याला मागणी आहे. अशाच परिस्थितीत तिची कादंबरी वीस वर्षानंतर आली. अर्थातच हा मोठा इव्हेंट होता. जवळपास पाच-सहा लाख प्रतीची पहिली आवृत्ती छापण्यात आली आहे. कागद, छपाई सर्वच गोष्टीत अरुंधती रॉयने लक्ष घातले आहे आणि तिचेही प्रकाशकांनी भरपूर कौतुक केले आहे.

काय आहे या कादंबरीत ? कादंबरीची सुरवात होते ती गिधाडापासून. गाईला दिलेल्या डीक्लोफीनॅक नावाच्या औषधामुळे गिधाडे मरतात. अश्या एखाद्या छोट्या परीश्चेदापासून कादंबरीची सुरवात होते. कादंबरीची नायिका आहे अंजुम. ही अंजुम स्त्री किंवा पुरुष नसून एक तृतीयपंथी आहे. लहानपणीच तिच्यामध्ये पुरुषाबरोबर स्त्रीचे ही अवयव होते. त्यामुळे आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तिला हेमोफ्राइड म्हणजे स्त्री-पुरुष दोन्ही असलेला असे वर्णन केले. त्यामुळे आई अक्षरशः हादरून गेली अशी अंजुम तिने आपले ऑपरेशन करून घेतले. आणि पुरुषाची ती सहा फुट उंच स्त्री झाली. अंजुम म्हणून ती ख्वाप्गा नावाच्या एक जागेत राहू लागली. जिथे प्रामुख्याने अशाच स्त्रिया होत्या. तिथे काही वर्षे राहिल्यानंतर ती लहानाची मोठी झाली. एक छोटे बाळही तिला मिळाले. पोलिसांकडे अनेक तपास केल्यानंतर बाळाच्या आईचा पत्ता लागला नाही. तेव्हा ते बाळ या घरातच राहिले अंजुमला ती मम्मी म्हणत असे. एक दिवस अंजुम अहमदाबादला गेली आणि गोध्राच्या दंग्यांमध्ये सापडली. एका मशिदीत ती पुरुषाचा वेश घेऊन राहू लागली. तिचे केस कापलेले होते. परत ती दिल्लीला आली पण छोटी मुलगी तिला ओळखेना काही दिवस पार ख्वाप्गा मध्ये राहून तिने चक्क एका मुस्लीम स्मशानवस्तीत वस्ती केली. तिथे ती एका मौलवी बरोबर राहत असे. आसपासच्या निराधार थडग्यामध्ये चादर आणि इतर सामान रोवून तिने आपली वस्ती कायम केली. तिचीच ही कहाणी. कहाणीत सारे काही येते काश्मीर तरुणांची कथा, गोध्रानंतरच्या दंगली, भोपाल गॅस दुर्घटना, आणीबाणी, शीख दंगली थोडक्यात विसाव्या शतकाचा कालपटच कादंबरीच्या निमित्ताने उभे करण्याचा अरुंधती रॉयचा प्रयत्न आहे. अर्थात तो अॅम्बीशस आहे पण ती त्यात किती यशस्वी झाली. बरेच टीकाकार याचे उत्तर नकारात्मक देत आहेत.

अरुंधती रॉय ही एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मली. लहानपणीच वडील सोडून गेलेले त्यामुळे आईने एकटीने दोन्ही मुलींना वाढवलेले. आई एक शाळा चालवत असे आणि वडील सोडून गेले असल्यामुळे प्रामुख्याने गरीब मुलांमध्येच अरुंधती रॉय राहत असे त्यामुळे गरिबांशी अटॅचमेंट तयार झाली असे त्या सांगतात. नंतर केरळ मधून थेट दिल्लीपर्यंत अरुंधती रॉय पोचली ती आर्किटेक्ट कॉलेजमध्ये शिकण्यासाठी. आर्किटेक्चरचा कोर्स केला तिथेच तिची प्रदीप किशन या आपल्या भावी नवऱ्याशी ओळख झाली. त्याकाळात ती अॅरोबिक इस्ट्रकट्टर म्हणून काम करत होती. दोघांनी मिळून स्क्रीनप्ले लिहिले. एक छोटा सिनेमाही बनवला युट्युबवर तो पाहता येतो. काही वर्षे दोघे गोव्यामध्येही राहिले. अरुंधती आणि तिचे पती असे दोघे चक्क टुरिस्ट लोकांना बीचवर,आपण बनवलेले केक विकत असत.

अरुंधती रॉय जवळपास पाच वर्षे कादंबरी लिहित होती. गॉड ऑफ स्मॉल थिंगचे नाव सर्वतोपरी झाले ते अवॉर्ड मिळाल्यामुळे. प्रत्यक्षात जेव्हा ती कादंबरी वीस वर्षापूर्वी आली तेव्हा तिची किंमत चारशे रुपये होती. पुस्तक खूपच महाग होते मला आठवते नंदू धनेश्वर यांनी मला ते आणायला सांगितलेले आणि मी आणून ते बकाबका वाचून काढले. गॉड ऑफ स्मॉल थिंगचे अत्यंत झुळझुळणारे गद्य होते. प्रेमकहाणी होती भारतातील निसर्गाची हेलावून टाकणारी दृश्य, नात्यातले व्यामिश्र संबंध होते. नात्यात कहाणी होती आणि भारतीय कादंबऱ्यात न आढळणारे धीट वर्णन होते. या साऱ्यामुळे गॉड ऑफ स्मॉल थिंग उजवी ठरली. जगभरात गाजली. माझा मित्र मायांक ऑस्टीन सुफी याने एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. दिसेल त्याच्या हातात तो गॉड ऑफ स्मॉल थिंगची कॉपी ठेवायचा आणि फोटो काढायचा. त्याचप्रमाणे दिल्लीच्या दोन वाहत्या रस्त्याच्या कठड्यावर बसून मी गॉड ऑफ स्मॉल थिंग वाचले. आणि त्याचे त्याने फोटो काढले. आज गॉड ऑफ स्मॉल थिंगला वीस वर्षे होऊन गेलेली आहेत. अरुंधती रॉय यांचे बरेच केस पांढरे झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची टवटवी तशीच आहे.

वीस वर्षात अनेकदा त्यांना असा प्रश्न विचारला जायचा की तुम्ही गॉड ऑफ स्मॉल थिंगनंतर काही लिहिले का नाही ? या प्रश्नाचा त्यांना राग येतो कारण त्या म्हणतात मी जे एवढे नॉन-फिक्शन लेखन केले आहे त्याला लेखन म्हणायचेच नाही का ? काहीही असो अनेक वर्षाने का होईना त्यांची नवी कादंबरी वाचकांच्या हातात पडलीय. त्यावर उलटसुलट चर्चाही सुरु झालीय. जेरी पिंटो या माझ्या मित्राने तर हा कादंबरीचा पहिला आराखडा वाटतोय अशी चर्चा केलीय. अर्थात अनेक आवाजांचे मिश्रण अनेक नॅरेटीव्हज हे उत्तराधुनिक साहित्यात नावे नाही .

अरुंधती आज लेखिका म्हणून सुप्रतिष्ठित आहे. गरिबांच्या बाजूने भांडण्याचा अंगार त्यांच्यात कायम आहे. त्यांची मते कोणाला मान्य होऊ न होऊ अरुंधती रॉय लहानपणापासून ज्यांच्यामध्ये गरिबीत मोठी झाली त्यांच्यासाठी लढते आहे एवढे नक्की. भारतासारख्या देशाला अरुंधती रॉय आवश्यक आहे.

शंशीकांत सावंत

Updated : 4 Sep 2017 8:00 AM GMT
Next Story
Share it
Top