Home > मॅक्स कल्चर > साईंच्या भगवेकरणाचा प्रयत्न?

साईंच्या भगवेकरणाचा प्रयत्न?

साईंच्या भगवेकरणाचा प्रयत्न?
X

‘सबका मालिक एक’ असा संदेश जगाला देणाऱ्या साईबाबांचे जन्म गाव पाथरी (परभणी) हे असून त्या गावचा विकास करावा, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्याने साईबाबांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करून, या माध्यमातून साईबाबांचे भगवेकरण होते की काय, ही शंका व्यक्त केली जात आहे. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी साईबाबांनी शिर्डीत समाधी घेतली होती; याला यंदा शंभर वर्षे होत असल्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. देशाचे महामहीम राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रसंगी उपस्थिती होती. राष्ट्रपतींच्या बोलण्यात साईबाबांच्या मूळ गावाविषयी संदर्भ आला आणि जे साईबाबा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत, त्यांच्या हिंदूधर्मीय असण्याच्या प्रचाराला लागलीच सुरुवात झाली.

‘आओ साई’ म्हणत म्हाळसापतींनी एका फकीराला हाक मारली आणि तो फकीर पुढे साईबाबा झाले. त्या साईबाबांची महती जगभर पसरायला लागली आणि हिंदू, मुस्लीम, शीख व इतरही सर्व जातीधर्माच्या लोकांचे साईबाबा हे श्रध्दास्थान झाले, त्या शिर्डीत जिथे साईबाबा बसायचे ती द्वारकामाई मशीद होती. आणि आजही तिचा मशीद म्हणूनच उल्लेख केला जातो. त्यांची सेवा करणाऱ्या भक्तांपासून ते सर्व शिर्डीकरांपर्यंत कोणालाच साईंची जात, धर्म शोधावा असे वाटले नाही.

पण देशभरात एका विशिष्ट धर्माची सत्ता निर्माण करायला निघालेले सत्ताधारी मात्र साईबाबांचा अप्रत्यक्षरीत्या धर्म सांगण्याचा खटाटोप करत आहेत. यापूर्वी काही टोकाच्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या संघटनांनी साईबाबा हे नानासाहेब पेशवे आहेत असे म्हटले होते तर काही हिंदुत्ववादींनी ते नुसते हिंदू नसून ब्राह्मणच आहेत असा शोध लावला होता. मी स्वतः याबाबत साईबाबा संस्थानकडे तक्रार केली होती पण त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न कधीच संस्थानने केला नव्हता. ज्या देशात विशिष्ट जाती, धर्माची मंदिरे उदयास येत आहेत त्याच देशात साईबाबा देवस्थान मात्र समतेचा संदेश देणारे आहेत.

महामहिम राष्ट्रपती हे राज्यपाल असताना ते पाथरी, जिल्हा परभणी, येथे दोन दिवस मुक्कामी होते आणि त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना साईबाबांचे हेच मूळ गावं आहे असे सांगितल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. त्यामुळे पाथरीचा उल्लेख हा राष्ट्रपतींनी ठरवून केला की त्यांना कोणी करायला लावला याची सध्या चर्चा सुरू आहे. या समाधी शताब्दी वर्षाच्या धर्तीवर करण्यात आलेले ध्वजारोहण हे सुद्धा वादग्रस्त ठरत आहे. जे साईबाबा कोणत्याच धर्माचे नव्हते त्यांच्या शताब्दीच्या कार्यक्रमात कुंभमेळ्याच्या धर्तीवर मोठा ओम आणि भगवा झेंडा असणारे ध्वजस्तंभ उभारून काही हिंदुत्ववादी संघटना त्यांचा वापर साईबाबांना हिंदू करण्यासाठी तर करत नाहीत ना, हा प्रश्न पडतो. कारण कुंभमेळा हा फक्त हिंदूंसाठी असतो तर तिथे जे जे प्रयोग केले गेले ते साईबाबांच्या बाबतीत करण्यात संस्थानचा अट्टहास का आहे?

पूर्वी साईंच्या दर्शनासाठी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर यायचा. पण काळाच्या ओघात साईंचे होत असलेले भगवेकरण बघून मुस्लिम भाविक क्वचित फिरकू लागले. खरेतर साईबाबांचे एक अब्दुल्ला नावाचे भक्त होते आणि त्यांची झोपडी ही आजही द्वारकामाईजवळ आहे आणि त्यांच्या वारसांना आजही मध्यान आरतीपूर्वी बाबांच्या समाधीवर फुले टाकण्याचा मान आहे. कदाचित भविष्यात हा मान सुद्धा त्यांच्या परिवाराकडून हिरावला जातो की काय अशी शंका काहींनी व्यक्त केली. जर असे झाले तर साईबाबांचे मुस्लिम धर्मीयासोबतचे नाते संपुष्टात येईल. पूर्वी साईबाबा संस्थानच्या नियुक्त्या धर्मादाय आयुक्त करायचे पण या संस्थानच्या पैशाकडे सरकारचे लक्ष गेले आणि त्यांनी हे संस्थान सरकारच्या अधिपत्याखाली आणले संस्थानचे एक विश्वस्त या संस्थानामार्फत आपली स्वतःची पुरेपूर जाहिरातबाजी करून लोकसभेची तयारी करत आहेत.

संस्थानचा कारभार हा नियमानुसार सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी साईबाबांच्या समाधीची देखरेख करणारे सर्व पुजारी मात्र ब्राह्मण जातीचे आहेत. त्यातीलच एका पुजाऱ्याच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून इतर ब्राह्मण पुजाऱ्यांनी त्या व्यक्तीस त्रास दिला असल्याची चर्चा शिर्डी परिसरात होती. राष्ट्रपतींनी ज्या पाथरी गावाचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून उल्लेख करून राजमान्यता देण्याचा जो प्रयत्न केला त्यातून भविष्यात ही संस्थानची विश्वस्त मंडळी एखादा ठराव घेऊन करोडो रुपये त्या गावाला विकासासाठी देतील की काय? अशी शंकाही काहींनी बोलून दाखवली आहे.

या पाथरी गावात पूर्वी भुसारी नावाचे एक कुटुंब राहत होते त्याच परिवारातील हरिभाऊ भुसारी म्हणजे साईबाबाच होते असा दावा करणारी एक डॉक्युमेंटरी एका वृत्तवाहिनीने केली होती आणि आता त्या कुटुंबातील लोकं हे निजमाबाद, औरंगाबाद आणि हैद्राबाद येथे राहत असून ते ब्राह्मण असल्याचा उल्लेख त्यात केला होता या सर्व बाबींचा विचार करता साईबाबांना आता हिंदू म्हणून मानले जाऊ लागेल, असे दिसते. त्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न असला तरी हे एक षड्यंत्र असल्याचे म्हणावे लागेल.

गणेश बोऱ्हाडे

Updated : 6 Oct 2017 2:30 AM GMT
Next Story
Share it
Top