Home > मॅक्स कल्चर > रियल लाइफमधले सुपरस्टार अमिताभ बच्चन

रियल लाइफमधले सुपरस्टार अमिताभ बच्चन

रियल लाइफमधले सुपरस्टार अमिताभ बच्चन
X

महानायक अमिताभ बच्चन यांचा (११ ऑक्टोबर) म्हणजे आज ७५ वा वाढदिवस. महानायक आपल्या कुटुंबासमवेत मालदीव येथे वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचे स्नेही, प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. हिमाशू मेहता यांनी त्यांचं केलेले हे अभिष्टचिंतन.

महानायक अमिताभ बच्चन यांना मी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाबद्दल मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो. अमिताभसारखी परिपूर्ण व्यक्ती युगांनी जन्माला येते. केवळ उत्तम शारीरिक उंचीच नव्हे तर मानसिक-वैचारिक-सांस्कृतिक उंची गाठलेले अमिताभ बच्चन यांच्याशी झालेला माझा परिचय आणि त्या परिचयाचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं. हा माझ्या आयुष्यातील मोलाचा ठेवा आहे असं मी मानतो.

मी बच्चन कुटुंबीयांचा डोळ्यांचा फॅमिली डॉक्टर आहे. मला माझी अनेक व्यवधानं आहेत. कायम असतात. पण माझ्यापेक्षा अनेक पटींनी हा अवघा ७५ आयुमानाचा चिरतरुण, अतिशय व्यस्त असतांना एकाच वेळी शेकडो कामं, जबाबदाऱ्या कशा सांभाळू शकतो हे मला आजवर न उलगडलेले कोडं आहे. नवीन पिढीच्या कलाकारांचा सिनेमा, त्यांचा परफॉर्मन्स भावला की अमित जी त्याला-तिला स्वहस्ताक्षरातील पत्र आणि पुष्पगुच्छ आवर्जून पाठवतात. बहुधा जुन्या पिढीला नवी पिढी आणि त्यांचे आचरण पसंतीस उतरत नाही. वैचारिक दरी-मतभिन्नता कायम असते. पण महानायक त्याला अपवाद आहेत. बॉलिवूड कलाकारांसाठी अमिताभ बच्चनचे प्रशंसापत्र म्हणजे आयुष्याचा ठेवा ठरतो.

अमिताभ बच्चन या अजोड कलावंताशी ज्याची काही काळ भेट होते. तो त्याच्या जीवनात काही क्षणांच्या सहवासातून खूप काही शिकतो हा माझा अनुभव आहे. मी त्यांच्यामुळे खूप 'ग्रो' होत गेलो हे सत्य आहे. १९९८ मध्ये अमितजींशी माझी पहिली भेट झाली. आमच्या एका कॉमन डॉक्टर मित्रामुळे घडलेला हा परिचय यथावकाश वटवृक्षासारखा फोफावत गेला. ह्याला काही कारणंही घडलीत. परिचय झाल्यानंतर अवघ्या २-३ महिन्यांत प्रथम त्यांचे वडील (डॉ. हरीवंशराय बच्चन) बाबूजींना डोळ्यांचा त्रास होऊ लागला. बाबूजींना आणि नंतर माँ तेजी बच्चन यांच्या डोळ्यांवर उपाय करण्यासाठी त्यांची भेट माझ्या क्लिनिकमध्ये होत गेली. प्रत्येक वेळा स्वतः अमितजी आपल्या आई-वडिलांना समक्ष घेऊन येत असत. १९९८ पर्यंत या महानायकाचे काही मोजके सिनेमे मी पाहिले होते. रुपेरी पडद्यावर हाणामारी करणारा अँग्री यंग मॅन ही इमेज ठसठशीत होती. पण माझ्या क्लिनिकमध्ये आपल्या आई-वडिलांचा हात धरून त्यांना घेऊन येणारा, त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा 'श्रावण बाळ' माझ्या मनांत महानायकाचं हे रूप आदरमिश्रित होतं. मला स्तिमित करणारं होतं. जयाजी, अभिषेक, ऐश्वर्या सगळ्या कुटुंबावर लक्ष देणारा, त्यांची काळजी वाहणारा, वेळोवेळी डोळे तपासून त्याबद्दल दक्ष असणारा हा महानायक त्याच्या 'अँग्री मॅन इमेजशी' अगदी विपरीत वाटणारा होता. अमितजींनी क्लिनिकमध्ये येण्याची वेळ जर संध्याकाळी ६ दिली असेल तर ते ५.५५ वाजता वेटिंग लाउंजमध्ये हजार असतात. उत्तुंग यश मिळूनही किती शिस्तबद्ध, विनम्र असावं याचं उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन !

स्वतः महानायक आणि त्यांचे कुटुंब यांची ट्रीटमेंट केल्यामुळे मी त्यांचा कौटुंबिक स्नेही बनलो. त्यांच्या दरवर्षी होणाऱ्या दिवाळी-होळी पार्टीजना त्यांचे वैयक्तिक आमंत्रण मला येऊ लागलं. या अनेक वर्षांच्या सहवासात जाणवलं, अमिताभ बच्चन हे रसायन काही वेगळंच आहे. फक्त पडद्यवरच नाही पण प्रत्यक्षात देखील हा माणूस 'सुपर स्टार' आहे.

वर्ष मला स्मरत नाही, पण तेजी बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. ही सर्जरी चालू असतांना स्वतः अमितजी तोंडावर मास्क लावून ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर ताणतणाव आणि डोळ्यांत करूणा होती. ऑपरेशन नंतर मी बाहेर पडलो तोच समोर अभिषेक आणि जयाजींना पाहिलं. कौटुंबिक स्नेह, प्रेम, ममता ही आई-वडिलांची परंपरा दस्तूरखुद्द महानायकाने त्यांची पुढील पिढी अभिषेकला सोपवलीये. तेजी आणि हरिवंशराय ह्या दोहोंच्या डोळ्यांचे ऑपरेशन मी केले आणि त्या-त्या वेळेस अमितजी उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांची वयाच्या ७५ व्या वर्षी प्रचंड धावपळ पाहिली की, मी डॉक्टर असूनही असं वाटतं कुठून आणत असेल हा माणूस आपली ऊर्जा ? एक सामाजिक संकेत आहे. ७५ वय म्हणजे निवृत्तीचे वय. पण महानायक निवृत्तीपासून अनेक योजनं दूर आहे. त्यांच्या शब्दकोशात निवृत्ती हा शब्दच नाही.

दररोज सकाळी अनेक वर्तमान पत्रांचे वाचन, व्यायाम, पूजा, व्यायाम, योगा यात कधीही महानायकाचा खंड पडला नाही. पूर्वी जे. डब्लू. मॅरीयटमध्ये जिमसाठी ते जात असत. त्यांच्या जलसा बंगल्यातून ते पहाटे सहा वाजता सायकलने मॅरीयॉटमध्ये पोहचत असत. सायकलिंग हा उत्तम व्यायाम आहे यावर त्यांचा विश्वास आहे. ते विदेशात गेले तरी कुटूंब उठण्याआधीच सायकलिंग करून येतात. अतिशय वक्तशीरपणे जबाबदारीने शिस्तबद्ध आयुष्य घालवणारा हा माणूस म्हणजे अनुकरणीय, वंदनीय आहे. महानायकात असलेल्या अनेक सुप्त आणि दर्शनीय गुणांपैकी दहा टक्के गुण जरी आपण सर्वानी घेतेलेत तर तो स्वतःचा, देशाचा विकास ठरेल. एक सकारात्मक बदलाची आपल्याला सगळ्यांना आवश्यकता आहे तीच महानायकाला आपण भेट म्हणून देऊया !

शब्दांकन - पूजा सामंत

Updated : 10 Oct 2017 3:20 PM GMT
Next Story
Share it
Top