Home > मॅक्स कल्चर > चांभार्डा : महाराष्ट्रातले दुसरे सावंतवाडी

चांभार्डा : महाराष्ट्रातले दुसरे सावंतवाडी

चांभार्डा : महाराष्ट्रातले दुसरे सावंतवाडी
X

धानोरा तालुक्यातील एका गावात चहा घेत होतो. चहा घेता घेता समोर लक्ष गेलं तर तिथे टेबलवर एक सुंदर माशाची लाकडी मुर्ती दिसुन आली. मी अवाक होऊन चहा तिथेच ठेवला व जवळ जाऊन पाहीलं, लाकडापासुन बनवलेला तो हुबेहुब मासा. त्यावर कोरलेले खवले, तोंड, माशाचे पर, तोंडाच्या निमुळत्या भागावर खोचून कलात्मकतेने बसवलेले ते डोळे, सगळं काही जसच्या तसंच. हुबेहुब पाण्यातल्या जिवंत माशासारखंच. ते सर्व पाहुन मला त्या कारागिराबद्धल उत्सुकता वाटली. मी त्या घरातल्या व्यक्तीला विचारलं, कोठुन आणला हा मासा? ते म्हणाले “थो ना लग्नात भेट आलाय जी!” पण त्यांनी कोठुन आणला कोठे मिळतात अशा वस्तु”? चांभार्डा नावाच गाव आहे. त्या गावात एक सुतार हाय जी. हुबेहुब सांगाल त्या प्राण्याची मुर्ती बनवून देतो.

चांभार्डा हे नाव ऐकताच मी माझे सहकारी कड्यामी मामा यांच्याकडे पाहीलं आणि त्यांना विचारल, हे गाव कोठे आहे. तेंव्हा त्यानी सांगितले की येथून ३० कि.मी. असेल. मग त्यांना विचारलं, जाऊयात का आपण चांभार्ड्याला? कड्यामी मामांनी क्षणात होकार दिला. समोरच्या व्यक्ति बोलली “चहा तर घ्या ना जी ! थंडा पडला” मी म्हणालो असु द्या चालतो मला. चहा घेऊन आंम्ही बाहेर पडलो. आमचा प्रवास चांभार्ड्याच्या दिशेने सुरु झाला. टु व्हीलरवर एक एक गाव मागे टाकत आम्ही चांभार्ड्यात पोहोचलो. मामांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी नेले.

तेथील शाहुजी किरंगे यांना घेउन आंम्ही त्या कारागिराच्या घरी पोहोचलो. तर समोर त्यांचा मुलगा समोर लाकडाचा तुकडा घेउन त्याला तासनीने तासत बसला होता. आम्ही ओळख करुन दिली. व त्यांनी बनवलेल्या वस्तु पहायला आलोय म्हणल्यावर त्याने अतिशय उत्साहाने घरातील लाकडाने बनवलेले कासव, खेकडा, विंचू, बैल अशा वस्तु दाखवल्या. हुबेहुब खेकडा, त्याचं डोकं खोलुन दाखवलं तर त्यात बडीशेप, सुपारी ठेवण्यासाठी छोट्या वाट्या बलवलेल्या. आम्ही त्या वस्तु हातात घेउन पाहतच राहीलो. खेकड्याच्या नांग्यातील छोटे छोटे बारकावे, समोरच्या नांगीतील दात, त्याच्या अंगावरील ओरखडे, छोटा कोंब फुटावा तसे खेकड्याचे हुबेहुब डोळे, अगदी जसंच्या तस कोरलेलं होतं. ते पाहत असतानाच त्या मुलाचे वडील आले व आमच्यात संवाद सुरु झाला. त्यामुलाचे वडील म्हणजे महादेव हजारे यांनी काही वेळातच त्यांच्या आयुष्यातील या कलेचा पटच उलगडुन दाखवला.

महादेव हजारेंचे वडील दामाजी हजारे हे चंद्रपुर जिल्ह्यातले हे सुतारकाम करत होते. त्या भागात वेगवेगळे लाकडी साहीत्य बनवन्यात ते प्रसिद्ध होते. वडीलांची ही कला महादेव हे लहानपणापासून पाहत पाहत मोठे झालेले. पण त्यांचे मन या सुतारकामात रमले नाही. त्यांनी चंद्रपूरात स्वत:चा टेलरचा व्यवसाय सुरु केला. मुलाचा हा व्यवसाय वडीलांना पसंत नव्हता. एक दिवस ते म्हणाले, ''गड्यासारखा गडी तू, आण तीन आण्याची चोळी शिवतोय''. वडीलांचं हे बोलण त्यांच्या जिव्हारी लागलं. तेंव्हापासून त्यांनी टेलरकीचा व्यवसाय बंद केला आणि सुतारकाम शिकायला लागले. दरम्यान त्यांच लग्न गडचिरोली जिल्ह्यातल्या चांभार्डा गावातील एका मुलीशी झालं. मुलीच्या वडीलांना मुलगा नसल्याने महादेव हजारे हे घरजावई झाले आणि चांभार्डा गावाचे रहिवाशी बनले. परंपरागत सुतार कामात म्हणावा असा नफा होत नव्हता. त्यांची चित्रकला लहानपणापासूनच चांगली होती. त्यांचं मन लाकडात चांगलंच रमलं होतं. गडचिरोली जिल्ह्यात आढळणारे वेगवेगळे प्राणी ते पाहत होते. पाहिलेले प्राणी त्यांना लाकडात दिसायचे. मग सुरु झाला त्यांच्या व्यवसायाचा कलेचा नवा प्रवास.

एक दिवस सागाच्या लाकडाचा एक तुकडा घेउन त्याला तासायला सुरवात केली. या कलाकाराच्या डोक्यात मासा होता. समोर लाकडाचा तुकडा होता. आपल्या डोक्यातलं माशाचं चित्र त्यांनी लाकडात पाहीलं आणि त्याला तो आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हुबेहुब मासा तयार केला. लोकांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यानी बनवलेला मासा अख्या तालुक्यात प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्राणी तयार केले. परंपरागत सुतारकामाला नवे वळण दिले. त्यांचे नाव त्यांच्या गावाचे नाव गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. आपल्या कलेचा वसा त्यांनी आपल्या मुलाला दिला. मुलाला त्यांनी यात तरबेज केले. मुलाने या कलेतील आयटीआय पुर्ण केलं. नोकरीच्या मागे न लागता वडीलांचा व्यवसाय सुरु केला. वडीलांना लाकडासाठी फॉरेस्टवाले तंग करायचे, पैसे मागायचे, दंड करायचे. या सगळ्याला वैतागुन त्याने फॉरेस्ट विभागाची परवानगी मिळवली आणि सागवानाचे टीपी असलेले लाकूड विकत आणलं.

“काम कमी करा, पण सुपर करा” हे ब्रीदवाक्य घेउन महादेव हजारेंची पुढची पिढीसुद्धा या व्यवसायात वळली आहे. त्यांच्या या कामाने त्यांच्या गावाची वेगळी ओळख गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. लाकडी खेळणी तयार करण्यासाठी महाराष्ट्रात सावंतवाडी हे ठीकाण प्रसिद्ध् आहे. अशीच एक नवी सावंतवाडी गडचिरोली जिल्ह्यात उदयास आलेली आहे. या त्यांच्या व्यवसायात त्यांना भांडवल कमी पडते. शहरात दुकान टाकायची ईच्छा असुनही पैशामुळे ते शक्य होत नाही ही त्यांची खंत आहे. त्यांना याबाबत सरकारकडुन मदतीची अपेक्षा आहे. ग़डचिरोली जिल्हा हा बऱ्याच जणांना माहीतही नसतो. पण महादेवहजारेंनी बनवलेलं कासव आज सात समुद्र पार करुन श्रीलंकेपर्यंत पोहचलेलं आहे.

त्यांच्याशी गप्पा मारत मारत दिवस संपत आला. त्यांनी जाता जाता आम्हाला एका गावात नेले. तेथील एका मंडळाला त्यांनी बनवुन दिलेला फार वर्षापुर्वीचा घोड्याचा लाकडी रथ त्यांनी दाखविला. जाताना शेवटी आम्हाला सांगितलं की साहेब, आत्ता एकच स्वप्न आहे. जीवंत असेपर्यंत लाकडाचा मोठा गणपती बनवेन आण मगच मरेन. मी त्यांना म्हणालो भाउ तुम्ही कधीच मरणार नाही. तुम्ही बनवलेल्या या कलेतुन तुम्ही कायमस्वरुपी जीवंत रहाल. असं बोलत आम्ही त्यांचा निरोप घेतला व आम्ही दिसायचे बंद होइपर्यंत ते आम्हाला मागून हात करत होते.

सागर गोतपागर

9421248492

Updated : 20 July 2017 7:25 PM GMT
Next Story
Share it
Top