Home > नॉन स्टॉप लता > लता मंगेशकर आणि कैफ इरफानी

लता मंगेशकर आणि कैफ इरफानी

लता मंगेशकर आणि कैफ इरफानी
X

" कैफ इरफानी " काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला एक गीतकार

अनिलदांच्या लेखात आपण " तराना " चित्रपटाबद्दल वाचलं ....

" तराना " चं संगीत जरी अनिल विश्वास याचं असलं तरी ह्या चित्रपटात कैफ इरफानी, डी एन मधोक आणि प्रेम धवन अशा तीन गीतकारांच्या रचना आहेत .

आज अशी सुरेल गीते रचणारे अनेक गीतकार विस्मृतीत गेलेले आहेत ..... त्यांची नावं देखील कुणाला आठवत नाहीत .... गाणीही अनेकांना माहित नसतील आणि म्हणूनच लताच्या या सूर सफरीत अशाच अनेक गुणी गीतकार संगीतकारांवर लिहायच ठरवलं आहे ....

ह्यांची लोकप्रिय गाजलेली गाणी जरी खूप कमी आणि मोजकीच असली तरी त्यांचं लता ला घडविण्यातलं योगदान अमुल्य आहे . त्यांच्या उल्लेखा शिवाय ही सफर अधुरीच राहील आणि म्हणूनच या सफरीत कैफ इरफानी यांचा उल्लेख अटळ आहे ..... तराना साठी " वापस ले ले ये जवानी " हे लताने म्हटलेलं आणि " एक मै हुं एक मेरी बेकसी की शाम है " हे तलत ने गायलेलं अशी २ अप्रतिम विरहगीते कैफ इरफांनी यांनी लिहिली आहेत .

त्यांनी सर्वात आधी गीतरचना केली ती १९४९ साली आलेल्या " नाच " ह्या चित्रपटासाठी . पण कैफ इरफानीना खरी प्रसिद्धी मिळवून दिली १९५० मध्ये आलेल्या " मल्हार " ह्या चित्रपटातील गीतांनी ....

यातील एकूण एक गीत गाजले .

कैफ इरफानी यांनी मल्हार साठी लिहिलेली " दिल तुझे दिया था रखने को " , " मुहब्बत की किस्मत बनाने से पहले ", " आणि " कहा हो तुम जरा आवाज दो " तीनही गीते त्याकाळी अफाट लोकप्रिय झाली .

मल्हार मध्येही ३ वेगवेगळे गीतकार आहेत . पण तेव्हापासून " मल्हार " चे संगीतकार रोशन आणि कैफ इरफानी यांची जोडी जमली .... आणि रागरंग , आगोश , शिशम , या चित्रपटात दोघांनी काही सुरेख गाणी दिली .

१) जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपलं अख्ख जग आपला पिया असतो .... सार काही त्याच्यासाठीच तर असत ....

आपलं हसणं , आपलं रडणं , आपलं उठणं , आपलं बसणं सार सारा फक्त त्याच्या एका इशाऱ्यावर , त्याच्या एका प्रेमळ नजरेसाठी .....

आणि जेव्हा तो प्रेमाचा एक कटाक्ष टाकतो न आपल्याकडे तेव्हा तर ते पूर्ण जग जिंकल्याचा आनंद होतो .... सार जग जणू फेर धरून आपल्या भोवती नाचत आहे असं वाटतं ही ओढ , ही साथ अशीच रहावी , हा जो प्रेमाचा वसंत फुलला आहे तो असाच कायम बहरलेला असावा

" नैनों में प्यार डोले, दिल का क़रार डोले

तुम जब देखो पिया, मेरा संसार डोले .....

तुमने बसाया मुझे अपनी निगाहों में

फूल खिलाये मेरी प्रीत की राहों में

अंखियों में प्यार भरा नया इकरार डोले

तुम जब देखो पिया मेरा संसार डोले " ......

" शेरू " या चित्रपटातल कैफ इरफानी यांनी लिहिलेलं आणि मदन मोहन यांनी संगीत दिलेलं हे एक हलकं फुलकं गीत आणि गाण्याचे बोलही किती गोड ....

४० च्या दशकातील मदन मोहनच्या संगीतातही किती वेगळेपण जाणवतंय नाही ?

२) पण ही प्रीत , ही साथ , कायम रहात नाही. कारण प्रेमाच्या नशिबातच मुळी दुरावा लिहिलेला असतो

तो सर्वेसर्वा " जमाने का मालिक " त्याला कस बर हे करवल असेल ?

खरंच इतका निष्ठुर आहे का तो ? दोन आकंठ प्रेमात बुडालेल्या जीवांना अस दूर करताना त्याचेही डोळे नक्कीच पाणावले असतील .....

जर त्याने कधी कुणावर जीव लावला असेल तर ताटातूट झालेल्या प्रेमिकांची हालत काय होत असेल हे त्याला कळत नसेल का ? .....

की मग नशिबापुढे तो मालिकही शेवटी आपल्यासारखाच असहाय्य ठरतो ?

सर्वांच्या हृदयात प्रेमाची हळुवार भावना जागवून मग ती एका क्षणात उध्वस्त करताना , करावी लागताना , तो नक्कीच रडला असणार ....

" मुहब्बत की क़िसमत बनाने से पहले

ज़माने के मालिक तू रोया तो होगा ......

तुझे भी किसी से अगर प्यार होता

हमारी तरह तू भी क़िसमत को रोता

हँसी मेरे ग़म की उड़ाने से पहले

ज़माने के मालिक तू रोया तो होगा " ...

१९५१ साली आलेल्या " मल्हार " मधलं रोशन ने संगीत दिलेलं हे सदाबहार गीत .... यातील कैफ इरफानींचे शब्द ऐकणाऱ्याला रडवल्याशिवाय रहात नाहीत ....

३) एखादी छोटीशी जरी नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात आली की खूप काही बदल घडतात ...... कधी हवेहवेसे तरी कधी नको असणारे

पण कधीतरी असा एखादा बदल येतो आपल्या आयुष्यात की तो आयुष्याच वळणच बदलून टाकतो ....... बरबाद करून टाकतो ......

प्रेम ...... कुणाच्या आयुष्यात कसं येईल सांगता येतं का कधी ?

प्रेम , कधी एखाद्याच आयुष्य रंगीबेरंगी करत तर कधी तेच प्रेम कुणाचं जग उध्वस्त करत ......

जरा कुठे जीवनात हास्याची चाहूल लागतेय तोच अश्रू येतात ..... कायमचे साथ द्यायला आणि आपल्यावर फुलांची उधळण व्हावी अशी भाबडी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र वाट्याला येते अश्रूंनी भरलेली रक्तबंबाळ करणारी काटेरी वाट

" बड़ी बरबादियाँ ले कर मेरी दुनियाँ में प्यार आया

हँसी एक बार आयी है, तो रोना लाख बार आया

भरा अश्कों से वो दामन जिसे फूलों से भर्ना था

मुझे इस बेवफ़ा दुनियाँ पे रोना बार बार आया

बड़ी बरबादियाँ ले कर मेरी दुनियाँ में प्यार आया

बड़ी बरबादियाँ ले कर " ...

ऐकणाऱ्याला विव्हल करणार हे कैफ इरफानी याचं एक अप्रतिम गीत .... " धून " या चित्रपटातल .... याचंही संगीत मदन मोहन नेच दिलेलं आहे ...

४) हळूहळू बालपण संपत आणि जवानी हळूच डोकावू लागते ... नेहेमीचच जग , नेहेमीचेच लोक , आजूबाजूचा परिसरही तोच .... पण तरीही सगळंच वेगळं .... त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीची अशावेळी साथ असेल तर मग काही विचारायलाच नको .... सार विश्वच बदलतं आपलं , प्रत्येक गोष्टीचा अर्थ नव्याने कळायला लागतो ....

त्याच्याबरोबर हिंदोळ्यावर झुलत असतो आपण सुखस्वप्न पहात .... आणि अशावेळी ही साथ जर अचानक नाहीशी झाली तर ? आपला प्रियकर आपल्यापासून दूर गेला तर ?

काय करायचं मग ही जवानी घेवून ? त्यापेक्षा ती नसलेलीच बरी ..... आपण जवानी यायच्या आधी जास्त सुखी होतो .....

जर नशिबात प्रेम असत तर प्रेमाचा पराजय झालाच नसता ..... कदाचित त्या " वरच्यानेच " काहीतरी ठरवून प्रेमिकांची ताटातूट केलेली आहे .... मग अशावेळी नुसता प्रियकर हिरावून घेण्यापेक्षा जवानी देखील परत घेतली तर जगणं थोड तरी सुसह्य होईल ...... खरच होईल का ?

" वापस ले-ले ये जवानी ओ जवानी देनेवाले

रास न आई प्यार-कहानी

हो प्यार-कहानी देनेवाले

वापस ले-ले ये जवानी

प्यार तुझे मंज़ूर जो होता

ठेस न लगती दिल ना रोता

तूने कुछ तो सोचा होता ज़िंदगानी देनेवाले

वापस ले-ले ये जवानी "

" तराना " मधलं मधुबाला वर चित्रित केलेल हे गीत .... मधुबालाच्या नाजूक, कोवळ्या चेहऱ्यावरचे दुखी भाव आणि तेवढेच घायाळ करणारे हे शब्द ..... कुणाचेही डोळे पाणावतील ....

५ )पण प्रेमात वाट्याला काहीही येवो हे आयुष्य जगायचं असत .....

कारण आयुष्य म्हणजे एक वाहणारा किनारा आहे ..... तो वाहतच राहणार .... कुठेही कुणाही साठी न थांबता तो थांबला तो संपला ..... त्याला तिथेच सोडून ही वहाणारी जिंदगी पुढे जात असते ....

आणि म्हणूनच जो जगतो त्याचंच हे जग आहे .... कुठेही न थांबता काळाबरोबर वहात जाण , त्याच्याच गतीने त्याच्याच सुरात सूर मिळवण म्हणजेच जिंदगी ......

आयुष्य जे काही देईल ते हसत खेळत स्विकारा आणि मग पहा ..... तुम्हाला आयुष्य परत कसं नव्याने कळत ते ....

" किस की नज़र का मस्त इशारा है ज़िंदगी

किस आसमां का टूटा सितारा है ज़िंदगी ....

क्या कश्तियाँ रहेंगी ये लहरों से होशियार,

उनके हैं जिनसे लाख उम्मीदों के बेक़रार

दरिया का एक बहता किनारा है ज़िंदगी

किस आस्माँ का टूटा सितारा है ज़िंदगी " .....

" रागरंग " मधील रोशन यांनी संगीत दिलेलं कैफ इरफानी याचं हे गीत , किती सहज ओघवत्या शब्दात आयुष्याचा अर्थ सांगितला आहे यात ...

छोटे बाबू " मधलं तलत ने गायलेलं सदाबहार गीत " दो दिन की मुहब्बत में हमने कुछ खोया है कुछ पाया है "

" धून " मधलं " तारे गिन गिन बीती सारी रात "

" नाच " मधलं सुरेय्याच " ऐ दिल किसे सुनाऊ ये दुख भरा फसाना "

" सरदार " चित्रपटातल " प्यार की ये तल्खीया , जो न सह सकू तो क्या करू " हे आज खूप दुर्मिळ असलेलं गीतही कैफ इरफानी यांनीच लिहिलेलं आहे.

प्रभावी आणि तरीही सामन्यांना आवडेल अशी साधी सोप्पी शब्दरचना हे त्याचं वैशिष्ट्य होत .....

पण दुर्दैव असं की तराना , शेरू , नाता , धून , छोटे बाबू , लाडला, अनुराग अशा जवळ जवळ ५० च्या वर चित्रपटांची काही अप्रतिम गीते लिहिणाऱ्या ह्या गीतकाराची आज फारच कमी गाणी रसिकांना आठवतात ....

नयना पिकळे

Updated : 9 March 2017 6:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top