Home > भारतकुमार राऊत > ज्या देशात 'हिंदुत्व' हा शब्दही 'पाप' ठरतो...!

ज्या देशात 'हिंदुत्व' हा शब्दही 'पाप' ठरतो...!

ज्या देशात हिंदुत्व हा शब्दही पाप ठरतो...!
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जणू दिग्विजियी अश्वमेघ सुरू केला आहे. त्यांचा वारू आता एकामागून एक राज्ये काबीज करतच निघाला आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या भारतीय जनता पक्षाने पाचपैकी चार राज्ये काबीज केली. त्यापैकी गोवा व मणिपूरचे विजय हे अंकगणितात्मक व 'हिशेबी' असले, तरी भाजपला उत्तर प्रदेशात मिळालेली जीत अवर्णनीय व ऐतिहासिक अशीच होती. तीन चतुर्थांश जागा काबीज केल्यानंतर मोदी व भाजपचे विजयी अध्यक्ष अमीत शहा मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवतात, याची चर्चा व उत्सुकता होतीच. गेल्याच आठवड्यात तीही संपली आणि गोरखनाथ मंदिराजे मुख्य पुजारी व गोरखपूरचे गेली पाच टर्म्स लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे खासदार योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी वाजत गाजत शपथ घेतली व त्यांचा कारभारही सुरू झाला. मात्र भाजपच्या या अनपेक्षीत भव्य यशामुळे ज्यांचे अंदाजांचे बुरूज पार ढासळले व ज्यांच्या राजकीय 'पांडित्या'ची जाहीर विल्हेवाट लागली, अशा माध्यम प्रतिनिधींची माथी मात्र फिरली. त्यांच्या उसळत्या भावनांना खतपाणी घालायला व आगडोंबात तेल ओतायला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी अशा पराभूत पक्षांचे नेते तयार होतेच. सुरुवातीला मतदानासाठी वापरल्या गेलेल्या ईव्हीएम यंत्रणेवर संशय घेण्यात आला. पण निवडणूक आयोगाने त्यांचा प्रत्येक आरोप तातडीने खेडून काढल्यावर त्यांनी आपल्या भात्यातील ब्रह्मास्र बाहेर काढले.

आता त्यांचा रोख आदित्यनाथ यांच्यावर होता. ते हिंदू 'संन्यासी' आहेत व हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते आहेत, या मुद्यांवर टीकेचा भडिमार सुरू झाला. आता काय तर म्हणे, मोदींनी आपले खरे रुप दाखवायला सुरूवात केली. आता देशाचे भगवीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे देशातील अल्पसंख्याक जनता भयभीत झाली आहे. या देशाचे निधर्मी रुप आता बसनात गुंडाळून ठेवून हे 'हिंदुराष्ट्र' बनवण्याच्या मोदींच्या मानसाला आता मूर्त रुप मिळू लागले आहे, वगैरे, वगैरे. यातील प्रत्येक आरोप हा बिनबुडाचा व सर्वस्वी दिशाभूल करणाराही आहे. पण गोबेल्सच्या सिद्धान्तानुसार जर हजार वेळा एकच असत्य विधान पुन्हा पुन्हा तितक्याच त्वेषाने केले, तर जनतेला ते खरे वाटायला लागते. काँग्रेस, समाजवादी व त्यांच्या पाठोपाठ काही इंग्रजी माध्यमांनीही याचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली. त्यामुळेच असे आरोप होत आहेत.

मोदींचे हिंदुत्वावर प्रेम आहे व संधी मिळाली, तर देशात हिंदुत्वाचीच सत्ता असावी, अशी त्यांची मनिषा असेल, तर त्यात गैर काहीच नाही. कारण या देशाच्या राज्यघटनेनेच प्रत्येक नागरिकाला आपल्या मताचा स्वीकार, आचार व प्रचार करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार करण्याचा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना हक्क आहेच. पण तसे काही घडते आहे का? हा खरा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशात वीस टक्क्यांहून अधिक मुसलमान मतदार आहेत. तरीही भाजपने एकाही मुसलमानाला विधानसभेचे तिकिट दिले नाही. त्यामुळे मुसलमान समाजावर अन्याय झाला, अशी ओरड झाली. पण इतर पक्षांनी मुसलमान उमेदवार उभे करूनही जर मुस्लिमबहुल मतदारसंघांत भाजपचे हिंदू उमेदवार विजयी झाले असतील, तर त्याचे दोन अर्थ निघतात; एक तर मुसलमानांनी धर्माच्या भिंती ओलांडून भाजपच्या हिंदू उमेदवारांना मते दिली, किंवा मुस्लिमबहुल असे जे मतदारसंघ मानले जातात, तेथेही हिंदू मतदारांची टक्केवारी अधिक असावी व त्यांनी एकगठ्ठा भाजपला मतदान केले. तिसरी शक्यता ही की, अशा मतदारसंघांत मुसलमान मते काँग्रेस-समाजवादी आघाडी, बहुजन समाज पार्टी व अन्य मुस्लिम पक्ष यांच्यात विभागली गेली असू शकतील. याचा विचार हे पक्ष केव्हा करणार?

या देशाने अधिकृतपणे निधर्मी राज्यव्यवस्था स्वीकारलेली असली, तरी सामाजिक व राजकीय जीवनात ती स्वीकारली गेली आहे का? याचा विचार व्हायला हवा. आजही काँग्रेससारखे वर्षानुवर्षे सत्तेत बसणारे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारणारे पक्ष मतदारसंघांतील जाती व धर्मांचा विचार करुनच उमेदवार ठरवतात. मालेगाव मतदारसंघात काँग्रेस मुस्लिम उमेवारच उभा करते व धारावी भागात दलीतालाच संधी मिळते. यालाच आपण 'इलेक्टिव्ह मेरिट' अशी गोंडस संज्ञा देतो. अशा वेळी उत्तर प्रदेशात सर्वच्या सर्व मुस्लिमेतर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपच्या साहसाचे कौतुकच करायला हवे. यात त्यांच्या विचारांच्या पारदर्शकतेची वाहवा करायला नको का?

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केल्यामुळे अनेकांचे पित्त खवळले. त्यामुळे त्यांचा 'संन्यासी' व गोरखनाथ मंदिरातील मुख्य पुजारी दर्जा, यावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे राज्याचे भगवीकरण होणार, अशी भीती व्यक्त होऊ लागली. ही भीती अनाठायी व आपमतलबी आहे. याचे कारण आदित्यनाथ काही पहिल्यांदाच सार्वजनिक जीवनात आलेले नाहीत. ते त्यांच्या वयाच्या 26व्या वर्षापासून सलग पाच टर्म्स लोकसभेचे सदस्य आहेत. या पाच निवडणुकांच्यावेळी त्यांच्या 'भगव्या' वस्त्रांच्या विरुद्ध अशी जहरी टीका झाली नव्हती. ती आताच का व्हावी? शिवाय भगवी वस्त्रे परिधान केलेली व्यक्ती देशाच्या वा राज्यांच्या मंत्री वा मुख्यमंत्रीपदी बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी साध्वी उमा भारती मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या व आता त्या केंद्रात मंत्रीही आहेत. त्या देशाचे भगवीकरण करणार, असे कुणी बोलले नव्हते. ती शंका आताच का?

भारतात कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचे व तशा संघटना बांधण्याचे स्वातंत्र्य घटनेनेच दिलेले आहे. 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू महासभेने भाग घेतला होता. या पक्षाने उत्तर प्रदेशातच फुलपूर मतदारसंघात तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध निवडणूकही लढवली होती. मुस्लिम लीग व आता एमआयएम हे अधिकृतपणे मुस्लिम धर्माचा प्रचार व प्रसार करणारे पक्ष राजरोसपणे निवडणुका लढवतात. मुस्लिम लीग तर केरळात व केंद्र सरकारात काँग्रेसबरोबर सहभागी झालेली होती. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल हा शीख धर्माधिष्ठित पक्ष सलग पंधरा वर्षे सत्तेत होता. आता अकाली दल भाजपसमवेत केंद्रात सत्तेत सामील आहे. अशा वेळी जर भाजपने आपली मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ध्येय-धोरणे राबवण्याचे प्रयत्न घटनात्मक मार्गाने करायचे ठरवले, तर त्यात गैर काय? जर जनतेला हा विचार पटला नाही, तर जनताच भाजपला व पक्षाला नाकारू शकते व निवडणुकीत पराभूतही करू शकते, हे वास्तव का नाकारायचे?

मुख्य म्हणजे ज्या देशात 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू धर्माचे आचरण करते व हिंदू देव-देवतांचे पूजन करते, त्या देशात 'हिंदुत्व' हा शब्दच जणू दूषण आहे, अशी भावना का निर्माण व्हावी? निधर्मी राज्यव्यवस्थेत सार्वजनिकरित्या धर्मांचे वा जन्माने आलेल्या जातींचे अवडंबर माजता कामा अनये, हे मान्य पण सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत धर्म नाकारणे, असे कुणी सांगितले? आपापले धर्म राखून व त्यांचे आचरण करूनही सर्वधर्मसमभाव राखता येतोच ना? आजही अमेरिकेत प्रत्येक राष्ट्राध्यक्ष बायबलवर जाहीरपणे हात ठेवून पदाची शपथ घेतो. तरीही ते राष्ट्र कॅथलिक बनत नाही. भारतात बहुसंख्य आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान ईश्वरसाक्ष शपथ घेतात. न्यायालयात सर्रास त्या त्या धर्माप्रमाणे गीता, बायबल, कुराण, अवेस्था हातात घेऊन सत्यवचनाची शपथ घ्यावी लागते. तसे असेल, तर कुणी हिंदुत्वाचे नाव जरी घेतले, तरी कुणाच्या रागाचा पारा का चढावा? हा खरेच निधर्मीवाद की आपले ढोंग उघडे पडण्याच्या भीतीने पोटात उठलेला शूळ?

-भारतकुमार राऊत

Twitter: @BharatkumarRaut

Updated : 23 March 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top