Home > मॅक्स ब्लॉग्ज > खरंच मेरा देश बदल रहा हैं, की ग बाई !

खरंच मेरा देश बदल रहा हैं, की ग बाई !

खरंच मेरा देश बदल रहा हैं, की ग बाई !
X

चला, काका चला, तुम्ही जत्रेला चला

चला काकी, चला तुम्ही जत्रेला चला

लेकरे बाळे घेऊ नका

घरी काही ठेवू नका

तुम्ही जत्रेला चला

दशम्या धपाटे घेऊ नका,

उपाशी तुम्ही राहू नका.

तुम्ही जत्रेला चला

काकी, मामी, आत्या,

काका, मामा, आबा,

म्हाळसाबाई तुळसाबाई तुम्ही जत्रेला चला....

लहानपणी दारावर आलेला वासुदेव अशी गाणी म्हणायचा. आम्ही लहान मुले त्याच्या मागेमागे जायचो. डोक्यावर घातलेली मोरपिसाची टोपी सावरत, हातातला टाळ वाजवत, स्वत: भोवती गिरकी घेत तो हे गाणे म्हणत असायचा. आज सकाळीसकाळी एक वासुदेव माझ्या घरी आला. हा थोडा वेगळा होता. पांढरे स्वच्छ कांजी केलेले, कडक स्वच्छ कपडे त्याने घातलेले, खिश्यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप बॅग, डोळ्यावर भारीचा गॉगल, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात दोनतीन अंगठ्या!

तोही यात्रेला चला असे म्हणत होता. त्याच्यासाठीचे गाणे त्याच्या फोनवर वाजत होते. तो फक्त जस्टीन बिबरसारखा ओठांच्या हालचाली करत होता. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितले.

‘नमस्कार मॅडम, मी तुम्हाला यात्रेस सहभागी होण्यासाठी आमंत्रण देत आहे.

‘कशाची यात्रा? कोण काढते आहे, आणि कुठे जायचे आहे? देवदर्शन आहे का?’

‘माझे प्रश्न मध्येच थांबवत, तो म्हणाला, ‘चार प्रकारच्या यात्रा आहेत.

तुम्हाला ज्यात हवे असेल त्यात सहभागी व्हा. चॉईस इज युवर्स- पहिली आहे संघर्षयात्रा.

शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून ही यात्रा अधूनमधून सुरु असते.या यात्रेत जर तुम्ही सहभागी झालात, तर फार त्रास होणार नाही. वातानुकूलीत बसने प्रवास करता येईल. गेस्टहाउस किंवा मोठ्या हॉटेलमध्ये जेवण असेल. रात्री आरामासाठीही चांगली व्यवस्था असेल. तुम्ही फक्त एक करायचे. एकदम साधे कपडे घालून, गरीब चेहरा करून सहभागी व्ह्यायचे. जिथेजिथे सभा होतील तिथे उपस्थित राहायचे आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेच पाहिजे. अशा घोषणा द्यायच्या!

‘दुसरी यात्रा थोडी अवघड आहे. इथे फक्त बुद्धिमान लोकांना प्रवेश आहे. या यात्रेचे नाव आहे ‘संवादयात्रा!’ इथे तुम्हाला थोडे बोलावे लागेल. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटायचे. त्यांना प्रश्न विचाराचे नाही. आपणच त्यांना खूप मोठी आकडेवारी देऊन गारद करायचे. दिल्ली ते गल्ली कमळाची शेती फुलल्यामुळे किती सुंदर वातावरण झाले आहे. त्याची प्रचीती द्यायची आणि अच्छे दिन येत आहेत याची टेप वाजवायची. कुणी अगदी मुद्देसूदपणे अवघड प्रश्न विचारत अंगावरच आले तर मात्र ‘७० वर्षाचे जुने प्रश्न आहेत ते ३ वर्षात कसे सोडविणार?’ असे हळूच मांडायचे. आणि विषय बदलायचा.

‘मॅडम, तिसरी यात्रा आहे ‘आसूड यात्रा’. या यात्रेत यायचे असेल तर भडक कपडे घालायचे, भडक बोलायचे आणि शब्दांचे आसूड सरकारवर ओढायचे. बहुतेक ही यात्रा गुजरातच्या सीमाभागातून निघते. आसूड ओढत जायचे म्हणून यात्रेचे नाव आहे आसूड यात्रा. आणि चौथी यात्रा आहे. शिवसंपर्क अभियान यात्रा. या यात्रेत शेतीच्या माहितीचा काही संबंध नाही. फक्त हल्लागुल्ला करत राहायचे. सरकार काही काम करत नाही असे सांगायचे आणि आम्हाला काम करायचे आहे पण आमचे हात बांधले आहेत असेही बोलायचे. सगळीकडे तुमची राहण्याची व्यवस्थित सोय असेल, फिरण्यासाठी गाड्या असतील, तर मग कोणत्या यात्रेला येत आहात?’

मी म्हणाले, ‘अहो साहेब, मी कोणत्याही पक्षाची नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. मी कोणत्या यात्रेला कसे जाऊ? मला सांगा, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात?’

‘नो नो मॅडम, मीही तुमच्यासारखा कोणत्याच पक्षाचा नाही.’

‘मी आहे “इव्हेंट मॅनेजर” वेगवेगळ्या पक्षाचे लोक यात्रा काढतात. त्यावेळी मी त्यांना कार्यकर्ते पुरवितो.’

जेंव्हा माझा होकार येण्याची शक्यता त्याला दिसली नाही त्यावेळी त्यानं वेळ न दवडता शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली आणि पुन्हा“चला काका चला” या गाण्याची धून माझ्या कानी ऐकू येऊ लागली. नवे आधुनिक, आय.टी सॅव्ही सरकार, सर्व म्हणजे अगदी पारंपारिक चालीरितीत सुद्धा केवढा आकर्षक बदल घावून आणते आहे हे पाहून मी खरेच प्रभावित झाले.

मनात म्हटले, ‘खरेच मेरा देश बदल रहा हैं, की ग बाई !’

-श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 19 May 2017 12:43 PM GMT
Next Story
Share it
Top