Home > मॅक्स ब्लॉग्ज > वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) : दावोस परिषद : ग्लोबल एलिटचे नेटवर्किंग

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) : दावोस परिषद : ग्लोबल एलिटचे नेटवर्किंग

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) : दावोस परिषद : ग्लोबल एलिटचे नेटवर्किंग
X

आजपासून डब्ल्यूईएफ तर्फे दरवर्षी भरवला जाणारी वार्षिक परिषद स्वित्झर्लंड मधील दावोस मध्ये सुरु होत आहे. जगभरातील उद्योगधंदे, बँकामधील उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, मीडिया व तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी व विचारवंत जमतात. ३००० हजारांवर प्रतिनिधी उपस्थित असले तरी दोन तृतीयांश प्रतिनिधी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या व वित्तक्षेत्रातील असतात. चार दिवस एकत्र बसून जगापुढील प्रश्नांबद्दल विचारमंथन केले जाते असा दावा ते करतात.

सत्तरीच्या दशकात प्रचलित जागतिकीकरणाची सुरुवात झाली. त्यातून विकसितच नव्हे तर विकसनशील देशांमध्ये देखील एक अल्पसंख्य एलिट (श्रेष्ठी) वर्ग तयार होत होता. जागतिक बँक,नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना या औपचारिक संस्थांच्या पलीकडे जाऊन देशोदेशांच्या श्रेष्ठींना एकत्र येण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी, नेटवर्किंग करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती. ती गरज या व्यासपीठाने पुरवली.

जगातील धनाढ्य व सर्वात ताकदवर राजकीय नेत्यांच्या या परषदेतून नक्की काय निष्पन्न होते ? का तो एक गप्पांचा अड्डा बनला आहे ?“जगाच्या सद्यस्थितीत सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध” हे डब्ल्यूईएफचे ब्रीदवाक्य आहे.

जग म्हणजे काय? जग असे एकसंघ आहे का ? त्यात परस्पर आर्थिक हितसंबंधांना छेद जाणारे वर्ग नाहीत का ? म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताची जी अर्थी धोरणे असतात उदा टॅक्स हेवन्स त्यातून जगातील शेकडो कोटी सामान्य नागरिकांच्या आर्थिक हितसंबंधांना धोका पोहोचतो. कारण त्या प्रमाणात राष्ट्रीय शासनांकडे कमी कर गोळा होत असतो. लोककल्याणासाठी कमी वित्तीय सामुग्री गोळा होत असते.

पण या व अशा अडचणीच्या अनेक विषयांबद्दल डब्ल्यूईएफच्या प्लॅटफॉर्मवर कधीच चर्चा होत नाही. उच्च वर्ग नेहमीच जगाचे भले, देशाचे भले, समाजाचे भले या सबगोलंकारी मांडण्या करतात.

डब्ल्यूईएफ उघडपणे जागतिकीकरणाची समर्थक राहिली आहे. पण गेल्या काही वर्षापासून सर्वच देशात घडत असणाऱ्या घडामोडीनी जागतिकीकरणा मागच्या आर्थिक तत्वज्ञानाला आव्हान मिळत आहे. गरीब व विकसनशील राष्ट्रांकडूनच नाही तर अमेरिका, युरोपातील विकसित भांडवलशाही देशांकडून !

पण या गंभीर प्रश्नांवर कोणतीही उपाययोजना डब्ल्यूईएफकडे नाही. कारण ते नेहमीच मक्तेदार, बहुराष्ट्रीय कंपन्या व बँकिंग व वित्त संस्था यांची पाठराखण करतात. आणि गेल्या चाळीस वर्षातील जागतिकीकरणाचा फॉरमॅट मक्तेदार-वित्त भांडवल पुरस्कृतच आहे. तेच त्याचे प्रमुख लाभार्थी आहेत.

मक्तेदार बहुराष्ट्रीय कंपन्या व वित्त भांडवल या जोडगोळीने जागतिक अर्थव्यवस्थेत अरिष्ट सदृश्य परिस्थिती तयार केली आहे. कर्जबाजारीपणा, वित्तीय मत्तांची (फायनान्शियल ऍसेट्स) मार्केट; पर्यावरणाचा ऱ्हास, आर्थिक विषमता व बेरोजगारी; शेतीमाल वा ऊर्जेच्या किंमतीतील वादळे इत्यादी. यातून सामाजिक, वित्तीय व पर्यावरणीय स्थिरता धोक्यात येत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या व वित्त भांडवल शोषक आहे हे उघड आहे. पण आर्थिक शोषण सुरु राहण्यासाठी देखील जगात सामाजिक, वित्तीय व पर्यावरणीय स्थिरतेची गरज आहे हे देखील आकळून कळत नसेल तर त्याला बौद्धिक अप्रामाणिकपणाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही. स्वतःच्या आर्थिक स्वार्थापुढे ही मंडळी स्वार्थांधळी झाली आहेत.

दावोसमध्ये जमून जगापुढील विविध प्रश्नांच्या फक्त चर्चा करायच्या हा यांचा औपचारिक अजेंडा आहे. दरवर्षी नवीन प्रश्न घ्यायचे. आधीच्या वर्षी ज्या चर्चा केल्या त्याचे काय झाले याचे उत्तर ते देत नाहीत. हे असे ४८ वर्षे सुरू आहे.

त्यांचा खरा अजेंडा आहे या चार दिवसात विविध राष्ट्रातील राजकीय नेते. धोरणकर्ते, लॉबिस्ट यांच्याबरोबर प्रोफेशनल संबंध स्थापन करायचे, विविध राष्ट्रात आपल्याला हवी तशी अर्थी धोरणे बनतील यासाठी प्रभाव टाकायचा. आपल्या गुंतवणुकीच्या योजना राबवता येतील का याची चाचपणी करायची हा दावोसचा हिडन अजेंडा आहे.

संजीव चांदोरकर (२२ जानेवारी २०१९)

#davos,#WEF

Updated : 23 Jan 2019 5:39 AM GMT
Next Story
Share it
Top