Home > News Update > जागतिक कॅन्सर दिन : ४ फेब्रुवारी

जागतिक कॅन्सर दिन : ४ फेब्रुवारी

जागतिक कॅन्सर दिन : ४ फेब्रुवारी
X

‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ तर्फे ‘ग्लोबोकॅन २०१८’ नावाने, कर्करोगाविषयीची जागतिक पातळीवरची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. कॅन्सरमुळे एकंदरीत मृत्युदर प्रमाण आणि कॅन्सरग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.

२०१८ मध्ये, जगभरात नवीन भर पडलेल्या कॅन्सरपीडितांचे प्रमाण १८० लाख तर कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण ९६ लाख इतके आहे आणि या मध्ये फ़क्त अशिया मधुन ४८ टक्के कॅन्सररुग्ण आढतात. जगभरातील पुरुषांमध्ये फुप्फुसाचा कॅन्सर आणि त्यापाठोपाठ प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर सर्वाधिक आढळतो.

महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो तर त्यापाठोपाठ कोलोन (आतड्यांचा) कॅन्सर आणि गर्भ पिशवीचा कॅन्सर आढळून येतो. १३५ करोड़ लोकसंख्या असलेल्या भारतात २०१८ मध्ये,नवीन नोंद झालेल्या कॅन्सरपीडितांचे प्रमाण ११ लाख ५८ हजार तर कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण ७ लाख ८५ हजार आणि २२ लाख ५८ हजार रुग्ण कँन्सर शी लढ़त आहेत. किंवा यशस्वी पणे कँसर चा नायनाट केला आहे.

भारतीय पुरुषांमध्ये तोंडाच्या आणि गळ्याच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त असून त्यापाठोपाठ फुप्फुसाच्या कॅन्सरचा क्रमांक लागतो. तर भारतीय महिलांमध्ये अनुक्रमे स्तनांचा तसेच गर्भपिशवीचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सर यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गेल्या २५ वर्षांत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. मुबलक आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असतानाही ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त आहे.

उशिरा होणारे निदान हे त्याचं प्रमुख कारण आहे. जर सुरुवातीच्या टप्प्यातच कॅन्सरचं निदान झालं आणि त्यावर तातडीचे उपचार झाले तर कॅन्सरमधून सुटका होऊ शकते. त्यामुळे कॅन्सर स्क्रीनिंग करणं गरजेचे आहे.कॅन्सरव्याधीग्रस्त नसलेल्या व्यक्तीची, शरीरात कॅन्सर आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी तपासणी करणे याला कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतात. कॅन्सर स्क्रीनिंगचे उद्दिष्ट केवळ सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर शोधणे किंवा जास्तीत जास्त कॅन्सरचे रुग्ण शोधणे हे नसून या व्याधीमुळे होणारा त्रास हा उपचार करून कमी करणे तसेच रुग्णाचे आयुष्य वाढवणे हे आहे.

कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये बऱ्याच व्याधीग्रस्त नसलेल्या व्यक्तींना नाहक तपासणीस सामोरे जावे लागते. तसेच तपासणीसंबंधी दुष्परिणाम आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा स्क्रीनिंगमुळे असेही घडते की भविष्यात कधीही वाढणार नसणारी व्याधी शोधली जाते. त्यावर उपचार सुरू होतात. वैद्यकीय भाषेमध्ये याला over diagnosis व overtreatment असे संबोधले जाते.

देशाच्या लोकसंख्येचा विचार करता कॅन्सर स्क्रीनिंग फार खर्चिक असून त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मनुष्यबळाची गरज आहे. कॅन्सर स्क्रीनिंगसाठी हळूहळू वाढणाऱ्या व्याधीच निवडल्या जातात; ज्यामध्ये उपचार करून आजार बरा होतो. तसेच स्क्रीनिंगसाठीच्या सध्याच्या चाचण्या देखील कमी खर्चिक असून त्या रुग्णांना कमीत कमी त्रास होईल अशा रीतीने वापरल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णांची सरसकट स्क्रीनिंग न करता high risk व्यक्तींसाठी ही तपासणी केली जाते.

विविध कॅन्सर आणि स्क्रीनिंग तपासण्या

1. स्तनांचा (Breast) कॅन्सर : २० ते ३९ वर्षे वयापर्यंत सर्व स्त्रिया स्वत: स्तनांची तपासणी करू शकतात किंवा दर वर्षांनी दवाखान्यात जाऊन स्तनांची तपासणी करवून घेऊ शकतात. ४० वर्षे वयानंतर पुढे दर वर्षी मॅमोग्राफी करावी.

2. सर्विक्स (Cervical) कॅन्सर : महिलांनी २१ वर्षे वयानंतर किंवा शारीरिक संबंध ठेवल्यापासून ते ६५ वर्षे वयापर्यंत दर तीन वर्षांनी pap टेस्टिंग (cytology) करावी.

3. कोलोरेक्टाल (Colorectal) कॅन्सर : २१ वर्षे वयाच्या पुढे करण्यासाठी दर वर्षी स्टूल, occult blood test, पाच वर्षांनी sigmoidoscopy, १० वर्षांनी colonoscopy या तपासण्या आहेत.

4. प्रोस्टेट ग्रंथींचा(Prostate) कॅन्सर : ५० वर्षांपासून पुढे दर वर्षी DRE व रक्ताची PSA तपासणी करावी.

5. फुप्फुसाचा (Lung) कॅन्सर : ५५ ते ७४ वर्ष वयोमान असणाऱ्यांनी व जे दर वर्षी ३० पॅकसिगारेट ओढतात त्यांनी एक्स्पर्ट डॉक्टरकडून तपासणी व गरज लागल्यास सी. टी. स्कॅन करावा.

6. हेड आणि नेक (Head & Neck) कॅन्सर : तंबाखू, मावा, गुटखा, खैनी, बिडी, सिगारेट यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी, ४० वर्षांपासून पुढे दर वर्षी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करावी.

कमी वयात कॅन्सर आढळल्यास, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना एकच कॅन्सर असल्यास, एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त वेगवेगळे कॅन्सर असल्यास, एकापेक्षा जास्त कॅन्सर एकाच व्यक्तीला असल्यास किंवा पॅथोलोजी रिपोर्टमध्ये जेनेटिक कॅन्सर सिंड्रोम आल्यास आनुवंशिक कॅन्सरसाठी जेनेटिक तपासणी करावी

डॉ. दिलीप निकम

कॅन्सर तज्ज्ञ, मुंबई

Updated : 4 Feb 2020 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top