जिकडे तिकडे आनंद गडे!

1374
Courtesy: Social Media

जिकडे तिकडे आनंद गडे! कारण; अरे यार परीक्षा रद्द झालीय ना. 2020 मध्ये अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर चक्क विनापरिक्षा पदवी देणार आहेत म्हणे. त्यामुळे आनंद तर होणारच ना. वस्तुस्थिती पाहता जगभर कोरोनाचा उद्रेक होतोय. त्यात भारत सातव्या क्रमांकावर आहे. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले व विद्यार्थी खूप आनंदी झाले. सरकारने नक्कीच विद्यार्थ्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हा शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!

पण परीक्षा रद्द केल्याने प्रश्न सुटणार आहेत का? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं आहे त्याचं काय? पाश्चात्य देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनाच्या पदवी प्रमाणपत्रावर खूप कमी विश्वास ठेवला जातो. परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असल्यास भारतीयांना प्रवेश परीक्षा अनिवार्य केल्या जातात. म्हणजेच भारतीय शिक्षण पद्धती ही जागतिक क्रमवारीत खूप मागे आहे. अशा वेळी 2020 च्या लाखो विद्यार्थ्यांना जर विना परीक्षा पदवी प्रदान केली तर त्यांना भविष्यात नोकरी कोण देणार?

कंपन्या रिक्त जागांची जाहिरात काढताना 2020 च्या पदवीधारकांनी अर्ज करू नये असे शासनाच्या भीतीपोटी नाहीत म्हणणार पण त्या जागेवर मुलांचा इंटरव्ह्यू घेताना 2020 च्या पदवीधरांना नक्कीच डावलले जाणार यात दुमत नाहीच. सरकार म्हणतंय विद्यार्थ्यांच नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला. पण दुसरी बाजू अशी आहे की फुकट पदवी दिल्याने विद्यार्थ्यांना असा कोणता मोठा फायदा होणार आहे हे पण सरकारने सांगावे.

विद्यापी कुलगुरू व राज्य सरकारच्या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा धोरणाला बहुतांश कुलगुरूंचा विरोध असताना सुद्धा राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कसा काय घेतला? सरकार पुढे इतर पर्याय नव्हते का? साऊथ कोरिया पॅटर्न प्रमाणे शाळा महाविद्यालयाच्या मैदानावर सोशल डिस्टन्स ठेवून परीक्षा घेता येऊ शकल्या असत्या. तसेच पुणे-मुंबई सारख्या शहरात क्रिकेट किंवा फुटबॉल मैदानावर पण परीक्षा घेता येऊ शकल्या असत्या.

परंतु सरकारला विद्यार्थ्यांना आनंदी ठेवायचे राजकारण करायचे होते का हा प्रश्न उपस्थित होतो. कोरोनामुळे जागतिक मंदी आलेली आहे. लोकांच्या हातात पैसा नसल्याने वस्तूंची मागणी कमी झाली आहे? मागणीच नसल्याने कंपन्याही उत्पादन कमी करत आहेत. त्यामुळे आहे त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ लोकांवर आली आहे.

बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्यात 2020 च्या पदवीधर विद्यार्थ्यांना कोण नोकरी देणार ? आजच्या वर्तमानातील निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जीवनावर परिणाम करणारा असल्याने सरकारने पुन्हा अजून एकदा परीक्षा घेण्याबाबतीत विचार करावा. अनलॉक 1 मध्ये सरकार मॉल व चित्रपट गृह चालू करत आहे. तिथे गर्दी होणार नाही का? की फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायचं म्हटलं की गर्दी होते. सरतेशेवटी, उशिरा का होईना राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात. अन्यथा 2020 च्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांबाबतीत हमी द्यावी.