Home > News Update > साने गुरुजींची आत्महत्या फक्त हार-जीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके

साने गुरुजींची आत्महत्या फक्त हार-जीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके

साने गुरुजींची आत्महत्या फक्त हार-जीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके
X

आत्महत्त्या हा भेकडपणा आहे, सुशांतसिंग तू हरलास, अशा आशयाच्या बर्‍याच पोस्ट पाहिल्या. आत्महत्त्या करणाराला डरपोक, भित्रा, भेकड ठरवणारे शून्य मिनिटात निकाल सुनावून मोकळे होतात. जो गेला त्याच्या मनात त्यावेळी किती कोलाहल माजलेला असेल! अशा टोकाच्या निर्णयाला माणूस गंमत म्हणून तर नक्कीच येत नसणार. तुम्ही बघितलाय असा माणूस कधी? मी बघितलाय. तुमच्या वाट्याला असे लढाईचे प्रसंग आलेयत वारंवार? ज्यांना सुखही टोचतं त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये.

" दि ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी" ही नोबेल पुरस्कारविजेती कादंबरी लिहिणार्‍या अर्नेस्ट हेमिंग्वेने आत्महत्त्या केली होती. या कादंबरीत जगण्याचा अतुलनीय संघर्ष चित्रित करणारा हा प्रतिभावंत कादंबरीचा शेवट आशावादी करतो, मात्र व्यक्तीगत जीवनात त्याला जगणे संपवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. हे त्याच्यासाठी किती यातनादायी, गुदमरवणारे असेल.

जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे मातृहृदयाचे साने गुरुजी आत्महत्त्या करतात ती फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल? अस्पृश्यांच्या पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी आयुष्य पणाला लावणारे लढवय्ये गुरुजी भेकड असतील?

दुरितांचे तिमिर जाओ जो जे वांछिल तो ते लाहो अशी प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर, लहान वयात जग आणि जगणे यांच्याबद्दलची अतुलनीय समज असणारे तत्वज्ञ, इतक्या कोवळ्या वयात समाधी घेतात म्हणजे जगणे थांबवतातच ना? बालपणी सामाजिक छळाला सामोरे जाणारे योद्धे ज्ञानोबा आयुष्याच्या प्रारंभालाच थांबायचा निर्णय घेतात तो घाबरून असेल?

काय आणि किती घालमेल असेल ना? सगळेच निरर्थक वाटायला लागणे हा डरपोकपणा आहे की जगण्याच्या नजरेला नजर भिडवणं? किती घनघोर लढाई केली असेल त्यांनी मनामेंदूत.

मी आत्महत्त्येचं समर्थन करत नाहीये. आत्महत्या हे उत्तर नव्हे हे मलाही मान्यच आहे. मात्र जेव्हा जीवनरसच आटतो, तेव्हाची उलघाल,घुसमट समजून घ्यायचा प्रयत्न तर कराल? इतक्या असंवेदनशीलपणे निकाल सांगून मोकळे होऊ नका, थोडं त्यांनाही समजून घ्या इतकंच मला म्हणायचं आहे. जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणं काय असतं, सलग तीनवर्षांचे दुष्काळ, नापिकी, कर्जापोटी होणारी मानहानी, वाट्याला आलेली लाचारी, कुटुंबाचे होणारे हाल ह्या सगळ्या जगण्याला भिडणं, ते चिमटीत पकडणं हे येरागबाळ्याचं काम आहे काय?

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं संत तुकाराम सांगूनच गेलेत. जीवनात सुख जवापडे, दु:ख पर्वताएव्हढे हेही खरेच आहे. मात्र ज्यांच्या वाट्याला जवाएव्हढेही सुख येत नाही, जे सततच्या लढायांनी दमून जातात, थकून गलितगात्र होतात, परिस्थितीचं पाणी ज्यांच्या नाकातोंडात जातं त्यांना पाण्याबाहेरच्यांनी, "तुम और लडो", असं कोरडं, पुस्तकी सांगायला काय जातं? जीवनेच्छा/जगण्याची प्रेरणा ही सर्वात चिवट असते. तिच्यावरही मात करणारांकडे करूणेने पाहायला नको? त्यांच्याकडे सखोलपणे, चौफेरपणे बघायला हवे, त्यांच्यासाठी आणखी थोडी सहानभुतीची भावना मनी वसू द्यावी इतकेच..

Updated : 18 Jun 2020 5:22 AM GMT
Next Story
Share it
Top