Home > मॅक्स ब्लॉग्ज > सावधान इंडिया!

सावधान इंडिया!

देशात सुशांत सिंह राजपुत प्रकरण सध्या मीडियामध्ये गाजत आहे. मात्र, या सर्वांच्या पलिकडे देशाची आर्थिक परिस्थिती, देशाच्या सीमांवरील सद्धस्थितीची जाणीव करुन देणारा डॉ. विनय काटे यांचा लेख नक्की वाचा..

सावधान इंडिया!
X

सध्या देशात सुशांत सिंह राजपुत प्रकरण सोडता माध्यमं तुम्हाला काहीच दाखवत नसतील. मात्र, देशातील लोक सध्या रोटी, कपडा, मकान या मुलभूत प्रश्नांसाठी झगडत आहेत. देशाची अर्थव्यवस्था लयाला गेली आहे. चीन भारताच्या सीमेवर डोळे वटारत आहे... या सर्व परिस्थिती मध्ये सर्व देशभक्तांना खऱ्या देशभक्तीची जाणीव करुन देणारा लेख डॉ. विनय काटे यांनी लिहिला आहे...

१) मीडियातल्या बातम्यांवर जर लक्ष दिलं हे ध्यानात येईल की चीन भारताशी युद्ध करायच्या तयारीत आहे. चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. दुर्दैवाने हे युद्ध झालं तर त्यात जी आर्थिक धूळधाण होईल. ती सहन करायच्या स्थितीत सध्या भारत नाहीये, जीवितहानी तर वेगळीच असेल. पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका या सगळ्या शेजारी देशांशी आपले राजनैतिक संबंध सध्या अत्यंत वाईट आहेत. आणि ही संधी चीन किंवा पाकिस्तान सोडणार नाही. कारण भारतीय उपखंडात चीनला स्वतःचा वरचष्मा दाखवायला याइतकी मोठी संधी नाही.

२) चीनने भारताशी युद्ध पुकारले. तर अमेरिका त्यामध्ये मोठी मध्यस्थी करणार नाही, कारण तिकडे राष्ट्रपतीपदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. आणि जरी चुकून अमेरिकेने काही हस्तक्षेप केला तरी तो फुकट नसेल, त्याबदल्यात अमेरिका भारताकडून त्याचा आर्थिक मोबदला या ना त्या प्रकारे काढून घेईलच. अमेरिका कुठलेही युद्ध फुकटात किंवा तोट्यात जाण्यासाठी करत नाही हा इतिहास आहे. वरून अमेरिकेची सोबत घेतल्यास चीन आपला कायमचा शत्रू बनून जाईल. ज्याची आणि आपली सीमा एक आहे.

३) अर्थव्यवस्थेचं बोलायला गेलं तर गेल्या तिमाहीत -24% चा विकास (?) दर नोंदवून आपण हलाखीत चाललो आहोत हे स्पष्ट आहे. बऱ्याचशा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की, सध्याची परिस्थिती आहे. तशी राहिली तरी वर्षाअखेर आपला विकासदर -10% ते -14% या घरात कुठेतरी असेल. 2024 ला 5 ट्रीलीयनची इकॉनॉमी बनणे सोडा, आपण महागाई वजा करता गेल्या वर्षीच्या GDP च्या आकड्यावरच असू अशी लक्षणे आहेत. आणि यात जर चीनसोबत युद्ध आणि अमेरिकेत सत्ताबदल या दोन गोष्टी घडल्या तर आपली आर्थिक अवस्था भयानक असेल.

४) भारतातल्या मंदीचा सगळ्यात मोठा फटका इथल्या गृहनिर्माण उद्योगाला बसला आहे. जिथे सगळ्यात जास्त रोजगार आहे. गेल्या 5 महिन्यात संघटीत क्षेत्रांत 2 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. असंघटित क्षेत्रांतली परिस्थिती तर अजूनच वाईट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणे आणि पगारकपात होणे. लाखो घरांचे EMI थकवू शकते आणि ती घरे बँकाकडून लिलावात निघू शकतात. बाजारात ग्राहक नसल्याने बँकांना त्यांचा पैसा परत मिळणार नाही आणि त्यातून बँका बुडण्याची भीती आहे. 2008 ला अमेरिकेत जे झालं ते आपल्याकडे यावेळेस होण्याची शक्यता खूप मोठी आहे.

५) कोरोनाच्या वाढीचा वेग पाहता भारतात पुढच्या आठवड्यापासून दररोज लाखभर नवीन केसेस यायला सुरू होतील. आणि हा आकडा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आताच आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीयेत, त्यामुळे येत्या काळात तर परिस्थिती अजूनच वाईट होणार आहे.

बाहेरून आक्रमण आणि आतून आर्थिक दुरावस्था अशा दुहेरी संकटात आपण अडकलो. तर आपल्याला आणीबाणीची परिस्थिती पाहावी लागेल. कदाचित सरकार ती आणीबाणी जाहीर करेलही आणि आपले आर्थिक हक्क नाकारून बाहेरचे आक्रमण परतवून लावण्याला प्राधान्य देईल. दुर्दैवाने असं काही घडलं तर लक्षात ठेवा की यासाठी कोरोना जबाबदार नाहीये, तर एक देश आणि नागरिक म्हणून आपल्या चुकीच्या प्राथमिकता जबाबदार आहेत.

राजकारण, मंदिर-मशीद, सेलेब्रिटी यांच्यापलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपल्या आरोग्याचे, रोजगाराचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न दुर्लक्षित केले असल्याने ही वेळ आपल्यावर येणार आहे.

माझ्या प्रिय देशा, सावध रहा! येता काळ खूप भयंकर आहे!!

- डॉ. विनय काटे

Updated : 10 Sep 2020 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top