Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > हॉस्पिटलचं बिल भरताना हुज्जत नको?

हॉस्पिटलचं बिल भरताना हुज्जत नको?

हॉस्पिटलचं बिल भरताना हुज्जत नको?
X

भिकार्‍यानं गयावया करावी हुबेहुब तशाच अविर्भावात त्या बाई याचना करत होत्या. काष्ट्याची साडी. वय साठीच्या आसपास असावं. डोळ्यात आसवं. आर्जवं करताना त्यांचं पुटपुटणंही नीटसं कळत नव्हतं. या बाईंचं नाव अलका शिंदे. सोमवारी 27 जुलैला त्यांच्या सात वर्षांच्या नातवाला पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

बुधवारी या बालकाचा मृत्यू झाला. त्याचं पार्थिव मिळावं यासाठी त्या आर्जवं करत होत्या. रात्री आठचा सुमार होता. दूरच्या गावी पार्थिव नेणं नंतर अंत्यसंस्काराचे सोपस्कार उरकणं याबद्दलची काळजी त्यांना असावी. पण हॉस्पिटलमधील बिलिंग काऊंटरवर यांची अडवणूक सुरू होती.

कारकुनाला या बाईंच्या समस्येत स्वारस्य दिसत नव्हतं. संयोगाने मी तिथेच होतो. मी माझ्या पेशंटला डिस्चार्ज मिळावा यासाठी हुज्जत घालत होतो. या बाई विनवण्या करताना दिसल्या. म्हणून आस्थेनं विचारपूस केली. समजलेली हकीगत खिन्न करणारी होती. ती सांगण्यापूर्वी माझ्या हुज्जतीचा मुद्दा सांगतो.

कोरोना संक्रमण झाल्याने माझ्या भावावर या दवाखान्यात उपचार झाले. तो टाटा मोटर्सचा कर्मचारी असल्याने मेडिक्लेममधून हे उपचार झाले. डॉक्टरांनी डिस्चार्ज घ्यायलाही सांगितला. पण टाटा मोटर्सकडून मंजुरी मिळाली की पेशंटला न्या. असं प्रशासनाचं मत होतं. आम्ही वाट पाहिली. रात्री आठ वाजले तरी डिस्चार्ज मिळेना.

Courtesy: Social Media

चौकशी केल्यावर उद्या डिस्चार्ज घ्या असं सांगू लागले. याचा अर्थ आणखी एक दिवसाची रक्कम बिलामध्ये लावली जाणार होती. डॉक्टरांनी सकाळी अकराला डिस्चार्जची परवानगी देवूनही दिवसभर मंजुरीची प्रक्रिया का झाली नाही? या माझ्या प्रश्नावर त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हतं. उलट मेडिक्लेममधून पैसे मिळत असल्याने तुम्ही पैशांची काळजी का करता? असं मला सांगितलं गेलं. मी म्हटलं मेडिक्लेममध्ये वर्षभरातील उपचारांची रक्कम निश्चित असते. माझा भाऊ डायलिसिस वर असून सध्याचे कोरोनावरील उपचार तर झालेतच, शिवाय त्याच्या मुलावरही खासगी दवाखान्यात याच मेडीक्लेममधून उपचार झालेत.

यापुढेही उपचारांची गरज आहे. मग आम्ही उगाचच गरज नसताना हॉस्पिटलचं बिल का वाढू द्यावं? अखेर माझी ही हुज्जत फलद्रूप झाली आणि माझ्या भावाला डिस्चार्ज मिळाला. (सध्या हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, म्हणून कोरोनाग‘स्तांची चिंता मी अनुभवलीय. नि हे लोक केवळ प्रशासकीय दिरंगाईने खाटा अडवून ठेवतायेत याचा संतापही येत होता.)

हे सर्व घडत असतानाच मी अलका शिंदे व त्यांचा मुलगा नितीन यांच्याशीही बोलत होतो. त्यामुळेही असेल कदाचित या नडलेल्या लोकांचीही समस्या सुटली असावी.

अलकाताईंनी नंतर सांगितलं, हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्यांनी पाच टक्के दराने खासगी सावकाराकडून कर्ज काढलंय. ते फेडण्यासाठी जमीन विकण्याशिवाय आता त्यांना गत्यंतर नाही. 23 ते 28 जुलै या सात दिवसात या कुटुंबावर दिवाळखोरीची वेळ आलीय. या आठवडाभरात आपल्या वैद्यकीय व्यवस्थेनं त्यांना अक्षरश: कंगाल करून सोडलंय.

23 जूलै अलकाताईंच्या नातवाला छोटासा अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णापुर हे त्यांचं गाव. नातू सकाळी अंघोळीला बसला होता.

अंघोळीसाठी तापलेलं पाणी कलंडलं आणि या पोराचा पार्श्वभाग भाजला. अलकाताई सांगतात, “आमच्या भागात चौरे डॉक्टर फेमस आहे. तो औषध पेलेले, साप चावलेले व भाजलेले पेशंट बरे करतो. म्हणून आम्ही पोराला चौरे डॉक्टरकडे नेलं.” हा डॉक्टर नेहमी दारूच्या नशेत असतो. असंही अलकाताईंनी सांगितलं. या डॉक्टरकडे कोणती डिग्री आहे. याबद्दल त्यांना कसलीही कल्पना नाही. केवळ विषबाधा, सर्पदंश व भाजलेल्या पेशंटवर गुणकारी डॉक्टर असा लौकीक ऐकून यांनी मुलाला डॉक्टरच्या हवाली केलेलं.

त्या म्हणतात, “तीन दिवस या डॉक्टरने पोराला पट्ट्या लावल्या. आणि बिसलेरीचं पाणी जखमेवर टाकत राहिला. जखमेत पॉयझन झाल्यावर केस पुण्याला घेवून जा म्हणाला...” या डॉक्टरने दीड लाख रूपये घेतले.

मुलाला गंभीर अवस्थेत पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. या ठिकाणी पेशंटला दाखल करतानाच पन्नास हजार रूपये जमा करायला सांगण्यात आले. त्यानंतर तीस हजारांची औषधं यांनी आणून दिली. शिवाय वेळोवेळी विविध रकक्म जमा केल्या. केवळ दीड दिवस हे मूलं या दवाखान्यात होतं. 29 जुलैला बुधवारी दुपारी मुलाची प्राणज्योत मालवली. तोवर या शेतकरी कुटुंबाकडून आणखी एक लाख रूपये घेतले गेले होते.

जवळपास दोन लाख रूपये खर्च झाले होते. मूल हातातून गेलं होतं. आणखी 31 हजार रूपये भरल्याशिवाय पार्थिव मिळणार नाही! असा दबाव आणला जात होता. अलकाताई म्हणाल्या, “आमच्याकडून आधी वीस हजार रूपये घेतलेत, त्याबद्दल काहीच बोलत नाहीत, उलट आणखी पैसे मागतायत. आम्ही आणखी कुठून पैशे भरू?” पुण्यात रूग्ण हक्क परिषद ही संघटना गरीब रूग्णांना मदत करते. हे मला माहित होतं. मी या संघटनेचा संपर्क त्यांना दिला. पण तिथे फोन उचलला गेला नाही.

ही घडामोड घडत असतानाच माझी हुज्जतही सुरू होती. परिणामी माझ्या भावाला डिस्चार्ज मिळाला. त्याचवेळी अलकाताईही तिथे होत्या. त्यांनाही अधिक पैसे न घेता पार्थिव देण्यात आलं. दिवंगत मुलाची आई चार वर्षांपूर्वीच बाळंतपणात वारली आहे. या मुलाच्या पाठीवर आणखी एक चार वर्षांचा मुलगा आहे. या लेकरांचा बाप एका पायाने अधू आहे. अलकाताईंचा हा मुलगा मोलमजुरी करतो. दुसरा मुलगा नितीनही मोलमजुरीचं काम करतो. त्यांचे यजमान वृद्ध आहेत.

या कुटुंबावर आलेल्या आपत्तीने तीन लाखांचं कर्ज झालं आहे. अलकाताई म्हणतात, “माझ्याकडं एक एकर जमिनीचा तुकडा आहे. तो इकूनबी कर्ज फिटणार नाही. आता तुम्ही आम्हाला काही मदत करा...” एकिकडे कोविडच्या युद्धात वैद्यकीय यंत्रणा झटत असल्याने जनमाणसात डॉक्टर व हॉस्पिटल्सबद्दल नितांत आदर आहे. दुसरीकडे अलकाताईंसारखे गरीब अक्षरश: देशोधडीला लागताहेत. त्यांच्या मदतीला कुणीही नाही.

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून अलकाताईंच्या नातवावर कदाचित उपचार होवू शकले असते. ही योजना कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये राबवली जातेय. योजनेंतर्गत हेल्पलाईनचा नंबर, आरोग्य मित्रांची उपलब्धता याची सूतरामही कल्पना अलकाताईंना नाही.

मी घातली तशी हुज्जतही त्या घालू शकत नाहीत. परिणामी आपली एकमेव पुंजी फुकाच्या भावात विकून त्या गप्प बसतील. आपणही गप्पच बसणार आहोत का? सध्या वैद्यकीय यंत्रणेवर अतिशय ताण असल्याने आपण त्यात भर घालू नये हे खरं, पण बिलं अव्वाच्यासव्वा बिलं लावली जातानाही हुज्जत घालू नये?

- प्रशांत खुंटे (मो.-9764432328)

ई-मेल[email protected]

(ठाकुर फाउंडेशन, यु.एस.ए. कडून इनव्हेस्टीगेटिंग रिपोर्टींग इन पब्लिक हेल्थ या शिष्यवृत्ती अंतर्गत लेखन)

Updated : 8 Aug 2020 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top