Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे का रडले?

रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे का रडले?

कोरोनाच्या संकटात पारंपारिक लोककला असलेला तमाशा अडचणीत आला. काल एका वृत्तवाहिनीवर या वेदना सांगताना रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे रडल्या. लोककलेचा लोकाश्रय आणि राजाश्रय कधीच संपला आहे .अब्राम्हणी कला आशय आणि रूप अधिक तेजस्वी होण्यासाठी लोककलेच्या पालखीच्या या भोयांच्या खांद्याला आधी ताकद दिली पाहिजे, असं सांगताहेत महेंद्र लंकेश्वर आणि अशिया सदर्न रिसर्च टीम..

रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे का रडले?
X

" मी कालची एबीपी माझावर झालेली रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे या लोककलावंतांची यांची मुलाखत पाहिली नाही तरीही हि पीडा आजची नाही. दोघेही अतिशय ताकदीचे कलाकार आहेत. मंगला बनसोडेंचा प्रत्यक्ष वारसा तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग यांचा आहे. मंगला बनसोडे, संध्या माने व मालती इनामदार या तिन्ही लेकी महाराष्ट्राला विठाबाईंनी दिल्यात, व तिघींनीही आपापले फड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिवंत ठेवले. रघुवीर खेडकर फडमालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून माझा कट्ट्यावर आले, त्यांच्या तरूणपण त्यांनी बोर्डावर केलेलं थाळीनृत्य अप्रतिम असे, ते कथ्थक व लोककलेचे मिश्रण असे.

तमाशा मरणासन्न अवस्थेत पडला यालाही बरीच वर्षे झाली. नदीनाल्याच्या पाण्यात फेटे गुलाबी रंगवून, जत्रंतल्या तमाशाच्या कनातीत जाऊन ते फेटे उडवण्याचा काळ आता संपलाय. लोककलेला लोकांचाच पाठिंबा असेपर्यंतच ती जिवंत असते. आता लोककलांना लोकांचाही मिळत नाही अन राजाश्रयपण मिळत नाही.

राजाश्रय मिळायला हे काय शाहूजीं छत्रपतींचे राज्य नाही. शाहूजी महाराजांनी लोककलेला राजाश्रय दिला. एकदा लोकनाट्यातल्या एका कलाकाराला राजाचा रोल करायचा होता पण ऐनवेळी राजाचा सोनेरी मुकुटच (मोर्चेल) गायब झाला. राजाची एन्ट्री होण्याची वेळ आली तेव्हा हा मोर्चेलविनाचा राजा रडकुंडीला आला, प्रेक्षागृहात बसलेल्या महाराजांना कुणीतरी हे हळूच कानात येऊन सांगितले तेव्हा दहाच मिनिटात राजाची मोर्चेलसहीत रूबाबात एन्ट्री झाली. सगळे कलाकार अवाक झाले कुठून आणला एवढा भारी मोर्चेल??? राजानं आपल्या घराण्याचा राजसन्मान असलेला मोर्चेल एका साध्या कलाकाराच्या डोक्यावर चढवला होता...........!!!! हा मोर्चेल प्रत्यक्ष महाराजांचा परंपरागत आहे हे जेव्हा त्या तमाशातल्या राजाला समजलं तेव्हा तो शाहूजी छत्रपतींचे पाय धरून रडू लागला.....!!!!राजाश्रय देणं म्हणजे काय असतं??? तर हे असतं......!!!

भांडवली व्यवस्थेत जसं प्रत्येक वस्तू हि क्रय वस्तू बनते, कमोडीटी बनते तसा कलेचाही बाजार भरतो. मूळ तमाशात फिल्मी गाण्याचा तद्दन टाकाऊ अॉर्केस्ट्रा आला म्हणून तमाशा पाणचट झाला हि खंत आमचे मित्र Ravi Sarawade यांनी बोलून दाखवली. मी त्यांच्याबरोबर लहाणपणापासून बऱ्याच फडाचे तमाशे बघितले आहेत त्यांची खंत खरी आहे, पण यात कलाकारांना संपूर्णतः दोष देणे चुकीचे वाटते. ते बिचारे समाजात जे विकले जाते तेच दाखवणार ना...!!

गणगवळण, बतावणी झाल्यानंतर मध्येच ऑर्केस्ट्रा दाखवणे ही त्यांची मजबूरी आहे, तरीही कुणी वग बघितल्याशिवाय जाऊ नये अशीच त्यांची दहादहा वेळा विनंती असे, कारण वग हेच खरे लोकनाट्य असते. त्यातच खरे प्रबोधन असते. वग लिहिणे हे काही साधे काम नसते, शाहिराचा तिथे खरा कस लागत असतो.

मूळ मुद्दा असा आहे की कलेचे भांडवलीकरण होऊन ती क्रय वस्तू बनवली गेली. समाजाची कलेची अभिरूची अशी या भांडवलीकरणाने, सांस्कृतिक आक्रमणाने त्यांना हवी तशी केलीय, हे आक्रमण चळवळीतल्या लोकांना आकलन होतंय की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

आधुनिक भारतात अब्राम्हणी कलेलाही फूटफोर्थ ठेवणारे ज्योतीराव फुले यांनी याबाबतीत पिढ्यांचं केलेलं आकलन अत्यंत महत्वपूर्ण आहे. "Tamasha-The robust art" नावाने तमाशा फोटोचं प्रदर्शन लावणारे संदेश भंडारे यांच्याकडे मी फुलेंच्या काळातील तमाशाचे एक आणेचं तिकिट पाहिलं आहे.

रघुवीर खेडकर रडले यात खरं दुःख हे आहे की काहीतरी चिवटपणे जपलेलं निसटू लागलंय. "नटरंग" मधला गुणा कागलकर तमाशानं उद्ध्वस्त झाल्यावरही म्हणतो की, " जे जिथे हरवलंय ते तिथंच शोधलं पाहिजे..." अन परत तमाशात स्वतःला झोकून देतो.

राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाईनं सीमेवरच्या सैनिकांसाठी तिथे जाऊन शो करणं आणि त्यांच्या मुली संध्या माने, मंगला बनसोडे पूरग्रस्तांसाठी जमेल तशी रसद पाठवणं हे खरंतर एकच आहे, पण हे दिसत नाही कारण याला ग्लॅमर नाही.

कोविड काळात कलाकार, शाहिर, लोककलावंत हे उद्ध्वस्त झालेत. दारावरच्या मागत्या आला तर त्याचेकडेही संशयाने बघण्याचा हा काळ आहे. उलट त्यालाच संक्रमक म्हणून आधी हाकलण्याचा हा काळ आहे. अशा काळात हे कलाकार हतबल होतील नाही तर काय होतील??

आपण काय युरोप नाही की त्यांनी त्यांच्या परंपरागत कला आहे त्या फॉर्ममध्ये अक्षुण्ण ठेवून जिवंत ठेवल्या व त्याला ग्लॅमर दिले.

तरीही कलाकारांचा आत्मसन्मान जिवंत ठेवून समाजानेच त्यांना जपले पाहिजे असे वाटते कारण या कलेच्या मरणात आपली सांस्कृतिक हार लपलेली असते हा सगळ्यात मोठा धोका असतो.

पिढ्यांचे वारसे धडाधड कोसळून पडतात, अशा अब्राम्हणी कला आशय व रूप दोन्ही अधिक दोन्हीने अधिक तेजस्वी होण्यासाठी त्याच्या पालखीच्या या भोयांच्या खांद्याला आधी ताकद दिली पाहिजे..!!!! "

महेंद्र लंकेश्वर व अशिया सदर्न रिसर्च टीम

Updated : 2021-04-05T09:31:54+05:30
Next Story
Share it
Top