Home > मॅक्स ब्लॉग्ज > महाराष्ट्राला पंचाहत्तरीकडे कोण नेईल ?

महाराष्ट्राला पंचाहत्तरीकडे कोण नेईल ?

महाराष्ट्राला पंचाहत्तरीकडे कोण नेईल ?
X

महाराष्ट्र साठीचा झाला. साठीच्या प्रवासातला लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न सगळे करताहेत. तो मांडायलाच हवा. कुठे होतो, कुठवर आलो, कुठे असायला हवे होतो, हे मांडायलाच हवे. माझा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या साठीनंतरच्या वाटचालीचा. आजचा महाराष्ट्र कसा आहे ते सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. मी विचार करतोय अमृतमहोत्सवी महाराष्ट्र कसा असेल याचा. म्हणजे आणखी पंधरा वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचा. हीरकमहोत्सवी महाराष्ट्राला अमृतमहोत्सवी वर्षात घेऊन जाताना महाराष्ट्राच्या राजकारणातले कोण कोण नेते महत्त्वाची भूमिका बजावू शकतील? ती व्हिजन कुणाकडं आहे, राजकीय पाठबळ कुणाकडं आहे आणि दीर्घ खेळी करण्याची क्षमता कुणाकडं आहे याचा.

दीर्घ खेळी म्हणतो तेव्हा एकच नाव समोर येते, ते शरद पवार यांचे. महाराष्ट्राच्या साठ वर्षांच्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असलेले पवार सगळ्या स्थित्यंतरांमधून गेले आहेत. साठीतल्या महाराष्ट्राचे मूल्यमापन करताना अमृतमहोत्सवी महाराष्ट्राचे चित्र मांडण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे. कुणी किती बढाया मारल्या तरी पवारांच्या जवळपास फिरकण्याची क्षमता कोणत्याही नेत्याकडे नाही.

आजचा सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. फडणवीसांचे नेतृत्व हे दिल्लीहून नेमलेले नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतरच्या विशिष्ट परिस्थितीत राजकीय चित्र बदलले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. सर्वांना सोबत घेऊन राज्यकारभार केला असता तर फडणवीस यांना मोठी संधी होती. परंतु सर्वांना सोबत घेण्याऐवजी सोबत असलेल्या सहका-यांचे पंख छाटण्याला त्यांनी प्राधान्य दिले. चंद्रकांत पाटील यांच्यासारखा संघाचा स्वयंसेवकही दरम्यानच्या काळात भाजपने महाराष्ट्रात नेता म्हणून उभा केला. दोघांमध्ये सुप्त संघर्ष असला तरी आजच्या घडीला पक्षाचे आणि देशाचे सर्वोच्च नेतृत्व फडणवीस यांना अनुकूल असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर समाजमाध्यमांतून फडणवीस यांच्याविरोधात जो रोष व्यक्त होत आहे, त्या वास्तवाची जाणीव त्यांना आहे का, हा खरा प्रश्न आहे.

सत्ता गेल्यानंतरही फडणवीस यांनी सातत्याने ज्या आक्रस्ताळेपणाचे आणि उतावीळपणाचे दर्शन घडवले, सहका-यांना मागे ठेवून आपणच पुढे राहण्याचे राजकारण पुढे सुरू ठेवले, ते पाहता यापुढील काळात जेव्हा कधी भाजपला सत्तेत संधी मिळेल तेव्हा त्यांच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठल्यावाचून राहणार नाही. तरीसुद्धा फडणवीस यांचे वय ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यांना सुधारायला संधी आहे आणि लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते त्याचा फायदा त्यांना भविष्यात मिळू शकतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा यांचे राजकारण किती बळकट राहते यावर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून आहे. पंकजा मुंडे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी बीड जिल्हा आणि वंजारी समाज यापलीकडे त्यांच्या नेतृत्वाची झेप जाताना दिसत नाही. त्यांची उथळ राजकीय शैली त्यांच्या नेतृत्वाच्या आड येते. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाचा गेल्या काही वर्षांतील आलेख पाहता मुंबईपुरते का असेना, पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही.

काँग्रेसचे आजचे जे पहिल्या फळीतील दिग्गज नेते आहेत, त्यांचा प्रभाव मर्यादित काळापुरता राहील. पाचेक वर्षांनंतर काँग्रेसचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. महाराष्ट्र काँग्रेस कात टाकून नव्याने उभी राहण्याचा प्रयत्न करेल. त्यात घराणेशाहीतून आलेले परंतु स्वतःला सिद्ध केलेले नेते असतील तसेच सामान्य थरांतून आलेले अनेक कार्यकर्ते नेत्यांच्या पंगतीला दिसतील. सामान्य थरातील कार्यकर्ते जेवढे अधिक दिसतील तेवढी काँग्रेस अधिक मजबूत बनेल. तसे झाले नाही तर मात्र काँग्रेसचा –हास कुणाला रोखता येणार नाही. खासदार राजीव सातव, सध्या राज्यमंत्री असलेले सतेज पाटील, विश्वजित कदम आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे ही काँग्रेसमधील आश्वासक नावे. अमित देशमुख आजच्याच पद्धतीने कार्यरत राहिले तर ते नजिकच्या काळात पहिल्या फळीतूनही मागे फेकले जातील. काँग्रेसमध्ये नाव घेण्याजोगी आणखी काही नावे असली तरी, ती मर्यादित प्रभाव असलेली आहेत. नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतील, असे चेहरे दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज महत्त्वाचे नेते आहेतच, परंतु भविष्यातील राज्याचे महत्त्वाचे नेते असतील. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाची त्यांच्याएवढी समज असलेले दुसरे नेतृत्व आजघडीला राज्यात कोणत्याही पक्षाकडे नाही. शरद पवार यांचा वैचारिक वारसा म्हणून फक्त त्यांचाच उल्लेख करावा लागेल. कोणत्याही पक्षात असले तरी ते राज्याच्या नेतृत्वाचे प्रबळ दावेदार असतील. अजित पवार यांच्याकडे भविष्यातील राष्ट्रवादीची सूत्रे असली तरी राज्याच्या राजकारणात तो पक्ष किती दखलपात्र असेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्वाची क्षमता आहे, परंतु राष्ट्रवादीच्या सरंजामी नेतृत्वाच्या फळीमध्ये पवारांची कन्या असूनही त्यांना पुरेशी स्पेस मिळत नाही, यावरून महिला नेतृत्वाची कुचंबणा लक्षात यावी. परिणामी त्या दिल्लीतच रमतात.

राष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा आवाका कौतुकास्पद असला तरी राज्याचे राजकारण करण्यासाठी त्यांना मोठी मुसंडी मारावी लागेल. रोहित पवार यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिले जात असले तरी आजवर त्यांना तसे काहीच सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. त्यांच्या तोकड्या अनुभवावरून काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. धनंजय मुंडे यांच्याकडे क्षमता असली तरी आपल्या मतदारसंघाचे नेते आणि नंतर अजित पवारांचे कार्यकर्ते अशीच त्यांची ठळक ओळख आहे. ती ओलांडून ते पुढे जातील आणि मोठी आव्हाने पेलतील तेव्हा त्यांच्यासंदर्भात मतप्रदर्शन करता येईल.

शिवसेनेचे आजचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असले तरी उद्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे असेल. प्रारंभीच्या काळात शहरी तोंडावळा आणि प्रश्नांचे तोकडे आकलन यामुळे आदित्य ठाकरे यांचा प्रभाव मर्यादित राहिला. परंतु सत्तास्थापनेच्या काळातील कठिण प्रसंगांमध्ये त्यांनी दाखवलेली प्रगल्भता त्यांच्याकडूनच्या अपेक्षा उंचावणारी ठरली. सध्याच्या सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारून त्यांनी जी तयारी सुरू केली आहे, तीही वाखाणण्याजोगी आहे. आदित्य ठाकरे भविष्यात महाराष्ट्राला निश्चितपणे चांगले नेतृत्व देऊ शकतील यात शंका वाटत नाही.

सत्तेच्या राजकारणाबरोबरच चळवळींकडेही प्रभावी नेतृत्व असावे लागते. त्यादृष्टिकोनातून विचार केला तर राजू शेट्टी, अजित नवले, उल्का महाजन, संपत देसाई, किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे आदी नावांचा उल्लेख करावा लागेल. शेतकरी, कष्टकरी, आदिवासींच्या प्रश्नावर सत्तेशी सातत्याने सतत संघर्ष करावा लागतो. प्रश्नांची नीट मांडणी करावी लागते. अमृतमहोत्सवी महाराष्ट्रात उपेक्षितांचा आवाज ही मंडळी बुलंद ठेवतील याबाबत आज तरी शंका वाटत नाही. दुर्दैवाने आंबेडकरी चळवळीमध्ये आजच्या घडीला आश्वासक चेहरा दिसत नाही.

संविधानावरील हल्ल्यांविरोधात कुणाशीही टक्कर घेण्याचे धाडस आजघडीला फक्त आंबेडकरी चळवळीकडे आहे. बाकी जातनिहाय चळवळी म्हणजे सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी आसुसलेल्या जातीपातीच्या नेत्यांच्या राहुट्या. उत्तर प्रदेश, गुजरातसह देशभरात ठिकठिकाणी आंबेडकरी चळवळ आक्रमकपणे पुढे येत असताना महाराष्ट्रात मात्र या चळवळीकडे नवे नेतृत्व असू नये हे दुर्दैव. परिस्थितीची गरज ओळखून असे नेतृत्व पुढे आले तर ती सामाजिक समतेसाठी आणि समतोलासाठी आवश्यक बाब आहे.

हा धावता आढावा आहे. काही नावे निसटली असण्याची शक्यता आहे. नजिकच्या काळात आणखी काही वेगळे चेहरे समोर आले तरी आश्चर्य वाटायला नको. राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ असतो, हे गृहित धरूनच चालावे लागते.

Updated : 1 May 2020 5:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top