Home > News Update > हाफीज सईदला पाकिस्तानने तुरुंगात का पाठवलं?

हाफीज सईदला पाकिस्तानने तुरुंगात का पाठवलं?

हाफीज सईदला पाकिस्तानने तुरुंगात का पाठवलं?
X

मुंबई २६/११ दहशतवादी हल्याचा मास्टमाईंड, ‘लष्कर-ऐ-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या हायकोर्टानं साडेपाच वर्षाची शिक्षा सुनावली. महत्वाचं म्हणजे फायनेंशियल एक्शन टास्क फोर्सच्या बैठकीपूर्वी हा निर्णय लाहोर हायकोर्टानं दिलाय. दहशतवादी संघटनांचा अर्थपुरवठा तोडण्यात अपयशी ठरल्यामुळे या टास्क फोर्सने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलंय.

दहशतवादी कारवाया आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करणे, वळवणे या आरोपाखाली लाहोर हायकोर्टानं ही शिक्षा ठोठावली आहे. मुंबई हल्याचा खटला मात्र अतिशय संथगतीनं सुरु आहे. कोण आहे हा हाफीज सईद आणि तो जगासाठी किती धोकायदायक आहे. हे जाणून घेऊयात...

कोण आहे हाफीज सईद

Courtesy : Social Media

हाफीज सईद याचा जन्म पंजाबमधील सरगोधा इथला आहे. त्याने पंजाब विद्यापीठातून अरेबिक आणि इस्लामिक स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. त्याचे वडील मौलाना कमालुद्दीन धार्मिक स्कॉलर होते. काका लष्करे-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत नेते होते.

१९७० मघ्ये सईदने जमात-ऐ-इस्लामी या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्याचा पराभव झाला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान गमावल्यानंतर सईद पक्का लोकशाही विरोधक झाला.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर, १९७४ मध्ये सईदला लाहोरच्या अभियांत्रिकी विद्यापीठात इस्लामिक अभ्यास विभागात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. या दरम्यान उच्च शिक्षणासाठी त्याने सौदी अरेबीया गाठलं. किंग सौद विद्यापीठातून सईदने उच्च शिक्षण पूर्ण केलं.

१९७९ मध्ये सईदने अफगाणिस्तानमधून रशियाला हुसकावून लावण्यासाठी अफगाण मुजाहिद अब्दुल रसुल सैय्यफच्या लष्करी शिबीरात प्रवेश घेतला. या शिबीरात अल-कैदाचा संस्थापक प्रमुख अब्दुला आझम याच्यासोबत त्याची भेट झाली. अब्दुलाने ओसामा बिन लादेनला शिकवलं होतं.

‘लष्कर-ऐ-तोयबा’ची स्थापना

सईदने १९८९ मध्ये ‘आयएसआय’च्या मदतीनं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी लष्करे-ऐ-तोयबाची स्थापना केली. ‘लष्करे-ए-तोयबा’ याचा अर्थ ‘आर्मी ऑफ प्युअर्स’ असा होतो. १९९० मध्ये या संघटनेनं काश्मीरमध्ये जिहादची घोषणा केली. यापूर्वी या संघटनेनं रशियन फौजांसोबत लढण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये आपले फायटर्स पाठवले होते.

मात्र काश्मीरमधल्या कारवायांमुळे ‘लष्करे-ए-तोयबा’ची पाकिस्तानमध्ये लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे या संघटनेनं आपला फोकस काश्मीर आणि धर्मदाय कामावर केंद्रीत केला. आरीफ जमाल यांनी या संघटनेवर लिहीलेल्या पुस्तकात हा उल्लेख आहे. मात्र सामाजिक काम हे दहशतवादी कृत्यांवर पांघरुन घालण्यासाठी होतं.

१० दशलक्ष डॉलरचं बक्षीस

तोयबावर बंदी घातल्यानंतर सईदने ‘जमात-उल-दवा’ अस नाव बदलवलं. या संघटनेमार्फत सर्व दहशतवादी कारवाया सुरु ठेवल्या होत्या. २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर या संघटनेची लोकप्रियता पाकिस्तानमध्ये शिगेला पोहोचली होती. या हल्यात एकूण १६६ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचा सहभाग भारताने पुराव्यानीशी सिध्द केला होता.

जमात-उल-दवाच्या दहशतवादी कारवाया वाढत गेल्या. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकनं २०१२ मध्ये हाफीज सईदच्या शिरावर १० दशलक्ष डॉलरचं बक्षीस जाहिर केलं. मात्र सईदने २०१४ मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई दहशतवादी हल्यात हात असल्याचा इंकार केला होता.

मात्र २०१७ नंतर हाफीजच्या कारवायावर लगाम घालण्यासाठी पाकिस्तानवर आंतराष्ट्रीय दबाव वाढू लागला. त्यामुळे पाकिस्तानने २०१७ मध्ये हाफीजला त्याच्या घरीचं ६० दिवस नजरकैदैत ठेवलं. मात्र लाहोर हायकोर्टाच्या निर्णयामुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये सईदची सुटका झाली.

२०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेनं ‘जमात-उल-दवा’ या संघटनेचा दहशतवादी संघटनामध्ये समावेश केला. त्यामुळे पाकिस्तान सरकारला हाफीजवर थातुरमातुर कारवाई करावी लागली. पाकिस्तानी सरकारला या संघटनेला मिळणारा आर्थिक रसद तोडावी लागली. या संघटनेला मिळणार डोनेशन बंद कराव लागलं.

फायनेंशियल एक्शन टास्कच्या पॅरीस बैठकीतही पाकिस्तान सरकारवर मोठा दबाव आला. हाफीजच्या संघटनांचा अर्थपुरवठा न थांबवल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा युरोपीयन युनीयनने दिला. त्यामुळे पाकिस्तानला या संघटनेवर कारवाई करणे भाग ठरलं. त्यामुळे पाकिस्तान सरकारने मदरसे, शाळा ताब्यात घेतल्या. संघटनेची संपत्ती गोठवण्यात आली.

हाफीजच्या मुसक्या आवळल्या

Image result for Hafiz Saeed a

फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तान सरकारने ‘जमात-उल-दवा’ आणि ‘फलाह-ऐ-इंसानियत फाऊंडेशन’ या धर्मदाय संस्थेवर बंदी घातली. ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेवर बंदी घालली गेली.

जमात-उल-दवाचे जवळपास १०० कार्यकर्ते अटक करण्यात आले. संस्थेअंतर्गत चालणारे २०० मदरसे सरकारने ताब्यात घेतले. या संघटनेशी संलग्न २७ संस्थाची नोंदणी रद्द करण्यात आली. मात्र तरीही या दहशतवादी संघटनेची आर्थिक पुरवठा पुर्णपणे तोडला गेला नव्हता अस निरीक्षण फायनेंशियल एक्शन टास्क फोर्सने नोंदवलं.

हाफीज सईदला अटक

जुलै २०१९ मध्ये हाफीज सईदला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याविरुध्द वेगवेगळ्या शहरात २३ गुन्हे दाखल करण्यात आलेत. धर्मदाय संस्थेकडून पैसै या दहशतवादी कारवायासाठी वळवले जात होते असं तपासातून बाहेर आलंय.

सईदवर मनी लाँडंरीग, दहशतवादाला पैसा पुरवणे आणि बेकायदेशीर जमीन बळकावणे या अंतर्गत २९ गुन्हे दाखल केले गेले आहेत.

पाकिस्तानी लष्कराचं सईदवरचं प्रेम

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन फौजा दाखल झाल्यापासून पाकिस्तान दहशतवादाविरोधातल्या लढाईत ओढला गेलाय. पाक-अफगाण सीमेवरच्या लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानला लष्करी मोहीम उघडावी लागलीय. यामध्ये पाक लष्कराचे साडेतीन हजारांपेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अशफाक कयानी यांना अंतर्गत कट्टरवाद्यांकडून पाकिस्तानला सर्वात मोठा धोका आहे अस विधान करावं लागलं. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

या मोहिमेमुळे पाकिस्तानचा काश्मीर फोकसही ढळला. मोहिमेमुळे अनेक दहशतवादी गट पाकिस्तानविरोधात गेले. आयएसआयने पोसलेल्या पाकिस्तान तालीबान सारख्या दहशतवादी संघटनांनी पाकच्या भूमीवर दहशतवादी कारवाया सुरु केल्या.

या परिस्थितीतही हाफीज सईद मात्र पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात गेला नाही. भारतात अनेक महत्वाच्या दहशतवादी कारवाया सईदने यशस्वी करुन दाखवल्या. मात्र सईदच्या संघटनेतही अनेकांना तालिबानी संघटनेविषयी सहानुभूती आहे. मात्र पाकिस्तानला तोडण्यासाठी भारत आणि अमेरिका पाकिस्तानी तालीबानींना मदत करतो असं म्हणावं लागतं.

मुंबई दहशतवादी हल्याच्या खटल्याचं काय?

मुंबई दहशतवादी हल्याचा खटला पाकिस्तानमध्ये अंत्यत संथगतीनं सुरु आहे. या प्रकरणात पाकिस्तानच्या थेट सहभागाचे पुरावे असूनही पाकिस्तान हा खटला मुद्दाम रेंगाळत ठेवतोय. यापूर्वी या खटल्यावरुन तत्कालीन पंतप्रधान नवाज शरिफ आणि लष्करप्रमुख बाज्वा यांच्यात खडाजंगी झाली होती.

मात्र हा खटला निष्पक्ष चालला तर या हल्यातील पाकिस्तानी लष्कराचा सहभाग उघड होईल. त्यामुळे हा खटला रेंगाळत ठेवण्याचा दबाव पाकिस्तान सरकारवर आहे.

हाफीज पाकिस्तानमध्ये लोकप्रिय का?

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बघता, पाकिस्तानी सरकार मुलांना मोफत शिक्षण, आरोग्य सेवा देवू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या गरीब जनतेला शिक्षणासाठी धर्मदाय संघटनांवर अवलंबून राहाव लागतं.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जिथं पाकिस्तानी सरकार पोहोचू शकत नाही, तिथे या धार्मिक संघटना पोहोचतात. मदत कार्य करतात. हाफीज सईदची संस्था देशभरात पाच मोठे हॉस्पीटल चालवते. ही संस्था २०० क्लिनीक, रुग्णवाहिका सेवा चालवते. तर देशभरात २५० पेक्षा जास्त शाळा (मदरसे) आहेत. यामध्ये गरीब विद्यार्थ्य़ांना राहण्याची, खान्यापिण्याची सोय मोफत आहे. नाममात्र फीमध्ये या रुग्णालयात ऑपरेशन केले जातात. पाकिस्तानमध्ये भूंकप आल्यावर फलाह-ए-इंसानीयत या हाफीजच्या संस्थेनं सर्वाधिक मदत केली होती. त्यामुळे हाफीज सईद सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकामध्ये खूप लोकप्रिय आहे.

Updated : 14 Feb 2020 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top