Home > मॅक्स ब्लॉग्ज > अरे हा 'पप्पू' काय बोलतोय बघा !!

अरे हा 'पप्पू' काय बोलतोय बघा !!

अरे हा पप्पू काय बोलतोय बघा !!
X

साधारण २०१० मधली ही घटना आहे. राहुल गांधींनी भारताने दहशतवादाला भावनिक नाही तर स्ट्रॅटेजीक अंगाने बघायला हवं असं एक विधान केलं. हा माणूस बोलतो ते चुकीचंच असणार असा समज करून द्यायची ती सुरुवात होती. झालं. राहुल गांधीला झोडणं सुरू झालं. मला आठवतं, रात्री चर्चा चर्चा खेळणा-या एका मराठी चॅनेलवरच्या पोरगेलश्या अँकरने तर "राहुल गांधींनी त्यांचं कोणी दहशतवादात गमावलंय काय?" असा प्रश्न विचारला होता. शेवटी पॅनलवर असणाऱ्या एका expert ने राहुलची आजी आणि बाबा दहशतवादात मारले गेलेत याची आठवण त्या अँकरला करून दिली.

याच राहुलची काश्मीर खो-याबद्दलची साडे आठ मिनिटांची एक क्लिप फिरतेय. इथे अपलोड केलीय. ती एकदा ऐकून घ्या.

यात राहुलने दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे काश्मीरच्या अस्वस्थतेचा फायदा पाकिस्तानसोबत "रिजन मधले काही जण" (अर्थातच भारतीय उपखंड आणि अगलबगलचे काही देश) घेतात त्याचा पुसटसा उल्लेख आहे. आणि काश्मीरमधल्या राजकीय पक्षांची रचना आणि त्याचा वापर करत तिथे 'प्रोजेक्ट इंडिया' कसा राबवला जाऊ शकतो त्याची मांडणी आहे.

पण एखाद्याची इतकी बदनामी केली जाते की तो काही गंभीर बोलत असेल तर त्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं. यात वाईट गोष्ट ही आहे की ज्यांनी बदनामीची फॅक्टरी उघडली आहे त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच ठोस योजना नाही. म्हणजे आपलं अपयश झाकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याची बदनामी करायची. पण यातून मुख्य समस्या सुटत तर नाहीच उलट ती अधिक गुंतागुंतीची होत जाते.

मोदी सरकार आणि आजची भाजप हे सगळं कश्यासाठी करत आहे? तर सत्ता टिकवण्यासाठी. पण सत्ता आणि देशातील नागरिकांच्या आयुष्यातील शांतता यामध्ये काय निवडायचं याचं भान मोदी सरकारचं सुटलंय. याआधी आपल्या सुदैवाने असं भान कुठल्याच सरकारचं सुटलं नव्हतं. मोदींच्या आधी भाजपकडून देशाचे पंतप्रधान झालेल्या अटलजींचा याबाबतीत आदर्श आहे. कालच शेखर गुप्ता यांनी मोदी सरकार आता काश्मीर खो-यात जी muscular (उर्फ दंडेलशाही) पॉलिसी राबवणार आहे त्याला अटलजींनी कधीच पाठींबा दिला नसता या आशयाचा लेख लिहिलाय. (त्याचीही लिंक इथे दिलीय.) या लेखातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे आपली हक्काची उग्र हिंदुत्ववादी व्होट बँक विरोधात जाऊ शकते याची पूर्ण कल्पना असताना, पाकिस्तानसोबत वाटाघाटीमध्ये वारंवार अपयश आलेलं असताना आणि देशातील सामान्य लोकं युद्धोत्सुक असतानाही अटलजींनी सत्तेचा नाही तर शांततेचा विचार केला. देशाचा आणि पुढील पिढ्यांचा विचार केला. परिणामी त्यांची व्होट बँक 2004 ला विरोधात गेली आणि वाजपेयींना सत्ता गमवावी लागली. पण अटलजींना त्याची फिकीर नव्हती.

अख्खा देश हातात असताना श्रीनगरमधल्या टीचभर सत्तेसाठी जी भयंकर लुडबुड मोदी आणि शहा जोडीने केली ती आता महागात पडली. आणि त्यातच देशाची सत्ता जायची वेळ आलीय. म्हणून मग काश्मिरातून पलायन ('सामना'चा शब्द) केलं आणि आता दंडेलशाहीची भाषा सुरू केली. म्हणजे एक चूक केली आणि आता पहिल्या चुकीच्या परिणामांना रोखण्यासाठी दुसरी चूक करत आहेत.

पीडीपी बरोबर आघाडी केली तरी मास्टर स्ट्रोक आणि तोडली तरी मास्टर स्ट्रोक असं चित भी मेरी, पट भी मेरी ज्यांना वाटत असतं त्या भक्तांचं सोडून देऊ. पण ज्यांना आपल्या सत्तेपुढे देशातल्या नागरिकांच्या आयुष्यातली शांतता महत्त्वाची वाटत नाही त्यांचं या देशाने काय करायचं हा खरा प्रश्न आहे.

(लेखाची लिंक आणि व्हिडीओ) सौ. द प्रिन्ट

https://theprint.in/…/what-would-vajpayee-have-t…/73061/amp/

Updated : 22 Jun 2018 7:45 AM GMT
Next Story
Share it
Top