Home > मॅक्स ब्लॉग्ज > मंदीर नहीं बनायेंगे....!

मंदीर नहीं बनायेंगे....!

मंदीर नहीं बनायेंगे....!
X

देशानं ज्याची अमाप किंमत मोजली अशा कदाचित जगातल्या सगळ्यात महाग मंदीराचं भूमिपूजन आज होत आहे.

हे भूमिपूजन अनेक कारणांनी ऐतिहासिक आहे. एकप्रकारे अध्यात्मिक प्रेरणेच्या हिंदूंवर धार्मिक प्रेरणेच्या हिंदूंनी मिळवलेला हा विजय आहे, हेही कबूल करायला हवे. रामायण लिहिणारे वाल्मिकीपासून तुलसीदासांपर्यंत किंवा अगदी महाराष्ट्रात भावार्थ रामायण लिहिणाऱ्या एकनाथांपासून ते गीतरामायण लिहिणाऱ्या गदिमांपर्यंत कोणाच्याही रामाशी संबंधित प्रेरणा धार्मिक राजकारणाच्या नव्हत्या तर अध्यात्मिक शिकवणीच्या होत्या.

शबरीच्या हातची उष्टी बोरं खाणारा, रामराज्य आणणारा राम बघता बघता पुसला जाऊन संतप्त चेेेेेहऱ्याचा धनुष्यबाण ल्यालेला राम हाच खरा राम इथपर्यंत हिंदूंना आणण्यात आणि त्याच बाणाच्या आधारे देशाची सत्ता कमावण्यात संघ परिवार यशस्वी झाला.

संघ परिवारानं जेवढं हिंदूंचं नुकसान केलं तेवढं इतर कोणी केलं नाही. भारताच्या परंपरा, संस्कृती, सणवार, अध्यात्म, रामायण महाभारतासारखी महाकाव्य यापासून वारकरी संप्रदायापर्यंत प्रत्येक गोष्टीचा त्यांनी भाजपाच्या राजकारणासाठी दुरूपयोग करून दाखवलेला आहे. गुढीपाडव्याच्या राजकीय शोभायात्रा असोत की दसऱ्याच्या शिलंगणासाठी वेशीबाहेर मिरवणूकीनं जाणाऱ्या गावातील हिंदूंचे जय श्रीरामचे नारे, सहिष्णु हिंदूंमधील बहुतेकांना 'रामराम' पासून 'जय श्रीराम' पर्यंत खेचून नेण्यात संघपरिवार यशस्वी झाला. क्रांती स्वतःच्या पिल्लांना खाते म्हणतात, तद्वत संघपरिवाराच्या राजकीय हिंदुत्वानं मूळ अध्यात्मिक हिंदुपणाच खाऊन टाकला हे एक वास्तव आहे.

मोदींच्या उदयाची मूळं 2011च्या आंदोलनात शोधणाऱ्या उथळांनी हा बदल लक्षात घ्यावा असा आहे. 2014च्या मोदी - शहा उदयाची पायाभरणी 1992 ला मशीदीचा पाया उखडण्यातून झाली. चाळीस टक्के मतांपर्यंत भाजपा पोचली ते सहिष्णु हिंदूच्या 'हिंदुत्वी'करणातून हेही विसरता कामा नये. अन्यथा अळवावरच्या पाण्यासारखे फक्त पृष्ठभागीय विश्लेषण करणे हा बालिशपणा ठरेल.

1992ची अडवाणी, सिंघल, बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंबरा, उमा भारती यांची भाषणं आठवली तरी अंगावर काटा येतो. मात्र त्यांच्याच स्वप्नातलं राजकारण पुढे गेलं ही वस्तुस्थिती आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत.

अयोध्येचा अध्याय हा आपल्या घटनात्मक संस्थांच्या पराभवाचा अध्याय आहे. न्यायसंस्थेची दिरंगाई, संसदेचा धर्मनिरपेक्षतेबाबतचा अस्पष्टपणा आणि झुंडशाहीपुढे हतबल झालेले तत्कालिन सरकार यातील एकही घटक वेळीच जागा झाला असता तर देशाचं दुभंगणं टळलं असतं. कट्टर हिंदूंना जसं तिथं मंदिरच पाहिजे होतं तसंच कट्टर मुस्लिमांनाही तिथं मशीदच पाहिजे होती, हेही नाकारता येत नाही. परिणामी काही स्क्वेअर फूटाची अयोध्येतील ती भूमी संपूर्ण भारतभूमीला वर्षानुवर्ष वेठीस धरू शकली हे कटू वास्तव आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्यच केला पाहिजे. तो तसा सगळ्यांनी आता मान्य केला आहे. ती रामजन्मभूमीच होती याचे पुरावे Archaeological Survey of India ने दिले आहेत आणि ते सर्वोच्च न्यायालयानं मान्य केले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला एका समुदायाच्या 'भावनांना' सर्वोच्च न्यायालयानं legitimate केलं आहे. त्याचे खूप वाईट परिणाम दिसू शकतात हेही या उन्मादी वातावरणात विसरून चालता येत नाही. खटला जुन्या काळीच निकाली निघाला असता तर ब्याण्णवचा उन्माद टळला असता पण दिरंगाई हा आपल्या न्यायालयांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. असो.

आपले प्राधान्यक्रम यापुढे तरी बदलायला हवेत. मंदिर नही बनायेंगे, अस्पताल और पाठशाला बनायेंगे असा आपला यापुढे नारा असायला पाहिजे. मंदिर नही बनायेंगे म्हणताना त्यात चर्च नही बनायेंगे, मस्जीद नही बनायेंगे हेही अपेक्षित आहे हे मुद्दाम सांगण्याची गरज आहे. अन्यथा हे लिहिणाऱ्याला हिंदू विरोधी ठरवले जाण्याची ठाम शक्यता आहे.

ज्या हिंदूंची रामराज्य आणणाऱ्या रामावर भक्ती आहे त्या हिंदूंना शुभेच्छा देण्याचा आजचा दिवस आहे. त्यांना शुभेच्छा. अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर देशातल्या धार्मिक सहिष्णुतेचं प्रतिक होऊन राहो. संघर्षाच्या कटू आठवणी मागे ठेऊन देश ऐक्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात करो.

विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक वॉलवरुन...

Updated : 5 Aug 2020 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top