Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्रीला नक्की काय हवं असतं ?

स्त्रीला नक्की काय हवं असतं ?

स्त्रीला नक्की काय हवं असतं ?
X

स्त्रीला नक्की काय हवं असतं, याचं उत्तर खुद्द स्त्रीही देऊ शकणार नाही, पुरुष तर सोडाच. स्त्रीच्या मनाची, गरजांची, प्रेमाची नि त्यागाची चर्चा खरं म्हणजे कुणीही करू नये कारण कुणाचीच ती लायकी नसते.

ऐशीच्या दशकात अर्बन भारतात स्त्रीमुक्ती बाबत उठणारे आवाज जरा खणखणीत व्हायला लागले होते. 'अर्थ' चित्रपटातली पूजा पुरुष-विहीन आयुष्य जगायचं ठरवत होती. गौरी देशपांड्यांची नायिका 'संसारामधि ऐस आपुली... ' हा आदेश नाकारत होती. ज्योती म्हापसेकरांच्या 'मुलगी झाली हो .. ' नाटकाचे प्रयोग गावोगाव धडाक्यानं होत होते. तरीही... 'मुक्त स्त्री' म्हणजे कशी हे चित्र लोकांच्या डोळ्यांसमोर तसं धूसरच होतं. त्यामुळे 'मुक्त म्हणजे स्वैराचारी' असा सरसकट स्टँप मारून लोक, अगदी स्त्रियाही मोकळ्या होत.

अश्यात टीव्हीवर लिरिल साबणाची जाहिरात झळकली नि स्त्रीच्या मुक्ततेला प्रथमच आणि अगदी सुस्पष्ट दृश्यरूप मिळालं. उसळत्या धबधब्याखाली नाममात्र कपड्यांत आंघोळ करणारी हसरी स्वनिर्भर तरुणी , व जोडीला एक बेफाम लय शरीरात भिनवणारी वेगवान पाश्चात्य संगीताची धून घरोघर लोकप्रिय झाली. ही तरुणी निर्लज्ज, अश्लील अजिबातच नव्हती. किंबहुना तिच्या शरीरापेक्षा तिचा चेहरा जास्त नजर खेचून घेणारा होता.

का ??

कारण 'स्त्रीला काय हवं असतं.? , या प्रश्नाचं उत्तर तिच्या चेह-यावर उमटलेलं होतं. तिचं उत्फुल्ल हास्य, नाचणारे डोळे नि केसांतून - चेह-यावरून ओघळणारे पाण्याचे तुषार यांनी ते उत्तर दिलं होतं .. 'माझं स्वप्न मी जगणार'.

लिंटास या जाहिरात कंपनीने ही जाहिरात बनवली होती. जाहिरात क्षेत्रातला अनभिषिक्त बादशहा अलेक पदमसी या जाहिरातीचा क्रिएटिव्ह डिरेक्टर होता. या जाहिरातीच्या ( साबणाच्या नव्हे.. ) लोकप्रियतेबाबत अलेक म्हणतो ' भारतातली मध्यमवर्गीय स्त्री ही दिवसभर कुणा ना कुणासाठी राबत असते. नवरा, मुलं, त्यांच्या तब्बेती, शाळा, किराणा, ऑफिस ... एक ना दोन. दिवसभरात एकच वेळ अशी असते, की जेव्हा ती पूर्णपणे स्वतःसोबत असते... बाथरूममध्ये..!! मी अशी कल्पना केली की यावेळी ती तिचं स्वप्न जगत नसेल का ..?? समाजाने नेमून दिलेले कुठलेही संकेत ती यावेळी उतरवू शकते, नि उंचावरून स्वतःला स्वप्नात झोकून देऊ शकते. ते स्वप्न मी चित्रित केलं.”

या जाहिरातीत हा साबण कसा आहे, याने कसं अंग स्वच्छ होतं , याची किंमत किती आहे याचा लवलेशही नाही. या निमित्ताने प्रथमच ऍक्सेसरी ही पर्सनॅलिटी डिफाईन करणारी होऊ शकते हा विचार जनसामान्यांना मिळाला. हा साबण शरीरासोबत मनाचाही होता.

आज पस्तीस वर्षांनंतरही या जाहिरातीची मोहिनी लोकांवर कायम आहे. अलेक पदमसी परवा नव्वदाव्या वर्षी वारला , पण लिरिलची जाहिरात व त्यातली ती चैतन्य सळसळवणारी संगीताची धून ही पुढील अगणित वर्षं लोकांच्या मनावर राज्य करील.

Updated : 22 Nov 2018 8:55 AM GMT
Next Story
Share it
Top