Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनाशी लढून घरी परतलो.

कोरोनाशी लढून घरी परतलो.

कोरोनाशी लढून घरी परतलो.
X

लढाई संपलीय असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या घाईचं ठरेल. उपलब्ध ज्ञान सांगतंय की निर्णायक टप्पा ओलांडून सुरक्षेकडे प्रवास सुरू झाला आहे.

अस्वस्थतेची सुरुवात : 18-22 मेच्या दरम्यान लागण झाली असावी. आठ - दहा दिवसांतून एकदा नाशिवंत माल भरायला उतरत असे त्यादरम्यान. आठवायला जावं तर एक विशेष संक्रमणशक्यता अशी आठवत नाही. पण बाजारपेठ हेच उत्तर आहे.

शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थता जाणवू लागली. उन्हाळी लागली असेल म्हणून शनिवारी एक दिवस वाट पाहिली. तरीही खबरदारी म्हणून घरीच विलगीकरण सुरू केलं.

रविवारी ताप 102.9° पर्यत गेला. गंध, चव या संवेदना पार नष्ट झाल्या. इतक्या, की चहा-गरमपाणी यात फरक कळेनासा झाला. प्रत्यक्ष तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तज्ज्ञांशी फोनवरून चर्चा करून प्रोटोकॉलची प्रतिजैविके आणि तापशामक गोळ्या सुरू केल्या.

सोमवारी स्थानिक महापालिका रुग्णालयात गेलो. तिथल्या व्यवस्थेवर दयनीय ताण आला होता. माणसं हतबल, वैतागलेली होती, पण आपलं काम सचोटीने, युद्धपातळीवर करत होती.

मग दोन दिवस पाठपुरावा करून निकाल आला नाही, तेव्हां कळलं की दिलेला नमुना 'तांत्रिक कारणांमुळे अग्राह्य' ठरला. पुन्हा नवा नमुना देण्याची ताकत माझ्यात नव्हती. मग प्रभाग आरोग्य अधिकाऱ्यांनी घरीच चमू पाठवून नमुने घेतले.

दोन दिवसांनी मला फोनवर कळलं की मी कोरोनाबाधित आहे, मात्र सुदैवाने कुटुंबाचे नमुने निगेटिव्ह निघाले. आधी लक्षणं आटोक्यात वाटत होती म्हणून घरच्याघरी लक्षणं नियंत्रित करणं हा सगळ्यात सुरक्षित पर्याय वाटला, पालिका अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. मात्र त्याच रात्री तापाने 102.5° ची हद्द ओलांडली आणि श्वास उथळ झाला.

त्या रात्री 2 ते सकाळी आठपर्यंत इस्पितळांची चौकशी, रुग्णवाहिका यांचा फोनवरून बंदोबस्त करून थकलो. शेवटची आशा घराजवळील एका रुग्णालयात होत असलेले डिस्चार्ज हीच होती. रिपोर्टची कॉपी मिळाल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश शक्य नव्हता. मग ग्लानी ओसरल्यावर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर, व प्रयोगशाळेत पाठपुरावा केला. संध्याकाळी इस्पितळाने ठराविक वेळेपर्यंत पोचायला सांगितलं. रुग्णवाहिका मिळत नव्हती, मग दुहेरी मास्क आणि योग्य ती खबरदारी घेऊन इमर्जेन्सी सर्व्हिस वाहन बोलावून रुग्णालयात दाखल झालो. त्या वाहनात पारदर्शक पडदे, उघड्या काचा, स्पर्षविरहित प्रवेश अशा सोयी होत्या.

रुग्णालयात- कोरोनावर औषध नसल्याने लक्षणांवरच इलाज, व आयसीएमआर-महापालिकेच्या वैद्यकीय संहितेप्रमाणे उपचार सुरू झाले. तापशामक, पित्तनाशक, खोकल्याचे उतारे, सकस आहार, तापमान, रक्तदाब, प्राणवायूचं प्रमाण या गोष्टींवर नजर ठेवली गेली. रक्तातला प्राणवायू (SPO2) हा 95% खाली जाता कामा नये. (मी 93% पर्यंत गेलो तेव्हां लगेच प्रत्यक्ष रक्ताचा नमुना घेऊन परिस्थिती गंभीर नसल्याची खात्री पटवली गेली).

सहा दिवस रुग्णालयात राहिलो, लक्षण बळावत नाहीत याची खात्री पटली, लक्षणं दिसू लागल्यापर्यंतचा बारावा दिवस एव्हाना आला होता. नव्या संहितेप्रमाणे 12 दिवसानंतर लक्षणं बळावत नसतील, तर शरीरात विषाणूचा उपद्रव आटोक्यात आल्याचं, व रुग्ण संसर्गक्षम नसल्याचं मानतात, व या निकषांवर मला सुट्टी देण्यात आली. खबरदारी म्हणून पुढील सात दिवस पुन्हा विलगीकरण व घरातील आपला माग निर्जंतुक करत राहणं (नळ, दरवाजे, हाताळलेल्या वस्तू), व कुणी अपरिहार्यपणे आसपास असताना मास्क घालून वावरणं ही बंधनं आहेत.

या चौदा दिवसात शक्य तितकं पालथं पडून राहणं गरजेचंं आहे. याने फुफ्फुसाची क्षमता टिकून राहण्यास मदत होते. उगाच दगदग, जागरण हानिकारक आहे.

घाबरून जाऊ नका. लक्षणं, अस्वस्थता भासल्यास कोरोना झालाय अशी शक्यताच गृहीत धरून घरच्यांपासून शक्य तितके विलग व्हा, व चाचणी करून लवकर उपचार सुरू करा. माझी रोगप्रतिकारक्षमता फार चांगली नाही. वर्षातून एक मोठं आजारपण मी काढत असतो. माझ्यासारखा रुग्ण कोरोनाला शिवून परतू शकतो, तर ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांनी घाबरायचं कारण नाही.

रुग्णालयात माझ्या बरोबर दाखल असलेले रुग्ण सत्तरीतले, आयसीयूमधून साध्या खाटेवर परतलेले आजोबा होते. त्यांचा डिस्चार्ज आज आहे. (शुक्रवार 5 जून). तेव्हां निव्वळ वय हाही फार धोक्याचा निकष नाही.

अनिश्चिततेच्या कुंपणावरच्यांनी...

मानसिक बळकटी ठेवा- सरकारी रुग्णालयंं, व्यवस्था यांच्यावर ताण आहे. ते त्यांना जमतंय, जी साधनं आहेत त्याच्यात सर्वोत्तम ती सेवा देत आहेत. निकाल उशिरा मिळत असले तरी त्यात आळस किंवा आकस नाही. त्यांचाही नाइलाज आहे. पाठपुरावा आपण करायचा, न चिडता करायचा, कारण आपला जीव आपल्याला प्यारा आहे. इथे डावंंउजवं, ओळखपाळख एका टप्प्यापलिकडे गैरलागू ठरते, कारण जमिनीवरची परिस्थितीच तशी आहे. समोरचे वाट वाकडी करून मदत करताना आपण आपला अथवा समोरच्याचा ताण वाढवून काहीही हशील नाही. 'तुम्हाला माहित नाही मी कोण/काय करू शकतो/तुम्ही हलगर्जी करत आहात' असली कार्यकर्तेगिरी करायची ही वेळ नाही. तितका धिंगाणा घालायची ताकत तुमच्यात असेल, तर तुमच्यापेक्षा इतरांना मदतीची गरज जास्त आहे. कुणी कुणाच्या वाईटावर नाहीये. प्रत्येकजण आपलं 120% देताना दिसतंय. अपरिहार्यतेला शांतपणे सामोरं जा. ताण हा संसर्गाला सरपण पुरवतो.

कोरोना संशयितांसाठी...

1) रक्तातला प्राणवायू मोजायला पल्स ऑक्सिमीटर घ्या. बोटावर लागणाऱ्या या यंत्रातून इन्फ्रारेड किरणं तुमच्या बोटात खेळत्या रक्तातला प्राणवायू मोजतात. शक्य असेल तर प्रत्येक रीडिंगपूर्वी खोलीतच तीन मिनिटं येरझारा करा.

2) पालथे पडून राहा. न चुकता. फुफ्फुसांसाठी इतकं कराच.

3) आहारात प्रथिनं ठेवा.

4) फुफ्फुसांवर थोडा परिणाम अपरिहार्य आहे. हा परिणाम कायम आहे की तात्पुरता ते नंतर कळेल. सहसा तुमची फुप्फुसंं पूर्ववत होतात असं डॉक्टर सांगतात.

5) नव्या संहितेत सुट्टीपूर्वी दुसरी कोरोनाचाचणी अनिवार्य नाही. 12व्या दिवशी तुम्ही संसर्गक्षम नसल्याने धोकादायक नाही इतकं पुरेसं आहे. सांप्रत कोरोनाचाचण्या तुमच्या रक्तातलं विषाणूचं अस्तित्व दाखवतात. मात्र हा विषाणू अर्धमेला आहे, मृतप्राय आहे की फक्त विषाणूचे अवशेष आहेत हे चाचणीत कळत नाही. इतरांनी....

6) डिस्टन्सिंग, बाहेरच्या खबरदार्‍या कसोशीने पाळा. यमाच्या कुंपणाला, खिशाला, नातेवाईकांच्या पुण्याईला, हितचिंतकांच्या झोपेला हादरे बसवावेत असं काहीही अवाजवी धोका पत्करून मिळवण्यासारखं बाहेरच्या जगात नाही. ना दूध, ना भाजी, ना किमान गरजेच्या मानाव्यात अशा गोष्टीही.

सगळे दरवाजे मिटताहेत असं वाटताना पुढील मार्ग दाखवणारे ज्येष्ठ, मार्गदर्शक कायम बरोबर होते. श्रीमती Ashwini Bhide व त्यांचे सहकारी श्री. किशोर गांधी, डॉ. आंग्रे, डॉ. Sandeep Gore व फोर्टिस कुटुंबीय, डॉ. Amar Walavalkar, डॉ. Amod Limaye, माझ्या ऑफिसचे सहकारी व मनुष्यबळ विभाग, कुटुंबीय- अमृता, आईबाबा, ताई, मानसबंधू सुयश, बाबांचे मित्र डॉ. श्रीरंग देशपांडे, श्रीमती स्वाती साठे व त्यांच्या कन्या यांचं ऋण कुठल्याही कृतीने, शब्दाने, वस्तूने या जन्मात फिटणारं नाही. त्या ऋणात जन्मभर राहण्यातच खरं सार्थक आहे.

Updated : 9 Jun 2020 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top