Home > Election 2020 > आपण जबाबदार नागरिकांऐवजी मतदार जन्माला घातले

आपण जबाबदार नागरिकांऐवजी मतदार जन्माला घातले

आपण जबाबदार नागरिकांऐवजी मतदार जन्माला घातले
X

कोणीतरी कुणाला तरी चालता चालता दटावतो आणि श्रीराम म्हणायला लावतो, कुणी तरी कुणाला जातीवरून शिव्या घालतो आणि नंतर बातमी दाखवल्यावर मिडीयालाच जातीयवाद पेरल्याबद्दल धारेवर धरतो, कुणीतरी कुणाला भरचौकात केवळ मुस्लीम आहे म्हणून मारहाण करतो, तर कुणीतरी हा देश फक्त हिंदूंचा आहे असं सांगत असतो.. कुणी सांगतं सती प्रथा चांगलीच होती...विविध माध्यमांमध्ये अशा बातम्या येत असतात. प्रतिक्रिया द्यायला गेलं की, काही लोक अंगावर येतात. मागील सरकारच्या काळात का बोलला नाही, तुम्ही तर दलाल आहात, तुम्हाला आता बघा भीक मागायला लागणार, काँग्रेसची दलाली करणं बंद करा अशा शब्दांत ट्रोलींग होतं. मी साधारणपणे सर्वच टीकांना उत्तरे देतो. फेक आयडीच्या पलिकडे पण कुणी तरी माणूस बसलाय, जो मिळणाऱ्या पैशाच्या पलिकडे जाऊन एकवेळ विचार करेल आणि माणूस म्हणून जागा होईल असा माझा विश्वास आहे. फेक आयडी धारण करून वावरणाऱ्यांच्या पोस्टपेक्षाही जास्त व्यथा होते ती सुशिक्षित समाजातून अशा गोष्टींचं समर्थन केलं जातं. काही अतिशिक्षित लोकांना तर हा देशच समजलेला नाहीय. या लोकांनी कधीच राज्यघटना वाचलेली नाही, त्या घटनेवर अशा लोकांची श्रद्धा नाहीय. हे सगळं पाहिलं की मला विचलित व्हायला होतं.

चळवळीतल्या काही लोकांबरोबर सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना एकाने परिस्थितीचं विश्लेषण करताना सांगितलं की, 1990 साली जन्माला आलेल्या मतदाराला शाहू-फुले-आंबेडकर कोण हेच माहित नाही, त्यामुळे शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावावर किती भाषणं करायची हे ठरवायला पाहिजे. मला प्रचंड काळजी वाटली हे ऐकून. 1990 सालापासून. त्यांना दिलेले सगळं शिक्षण, त्यावर सरकारने केलेला सगळा खर्च वाया गेल्यात जमा आहे का.. या देशातल्या सामाजिक ऐक्य, स्वातंत्र्य, बंधुता, समता, लोकशाही, समाजवाद, प्रतिकं या सगळ्यांवर ज्यांना श्रद्धा नाही, आत्मियता नाही, अभ्यास नाही अशा नागरिकांचं काय करायचं.. त्यांचं लोकशिक्षण करण्यात आपण कमी पडलो हे जाहीररित्या मान्य केलं पाहिजे.

देशात सरकार कुणाचं ही येवो, या देशाची व्यवस्था कशी चालावी याचे मापदंड ठरलेले आहेत. गुन्हा घडल्यावर पोलीस तक्रार नोंदवत नाहीत, कोर्ट सुनावणी करत नाही, गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, या देशातले नागरिक जात-धर्म-प्रांत यांच्या आधारावर गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहतात, त्यांना निवडून देतात, त्यांच्या गुन्ह्यामध्ये त्यांना देशभक्ती दिसते, रस्त्यामध्ये कुणीतरी स्पॉट जस्टीसचा टॅग लावून कुणालाही ठेचून मारण्याचं लायसन्स मिळाल्यासारखं वावरतो, इतर ते कसं योग्य आहे आणि अशांना कसं ठेचलं पाहिजे याचं समर्थन करतात, उलट मारण्याचं नवनवीन तंत्र सुचवतात. विरोधी मत व्यक्त करणाऱ्या कुणाच्याही बायका-मुली-बहिणींवर बलात्कार करण्याची धमकी दिली जाते, बाकीचे त्यांचं समर्थन करतात, अशा प्रवृत्तींना विरोध करणाऱ्यांना देशद्रोही-टुकडे टुकडे गँग इ.इ. म्हटलं जातं आणि बाकीचे टाळ्या पिटतात. हे जे काही चाललंय ते योग्य चाललंय असं वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय की हा विचार मनात जोपासत अनेक वर्षे वाढलेल्यांना आता कंठ फुटलाय, पोषक वातावरण मिळालंय.. नक्की काय झालंय. मी याचा दोष सत्तेवर बसलेल्यांना नाही देणार, कारण या मतदारांनीच त्यांच्या मनातलं सरकार सत्तेवर बसवलंय. भारतातील जनताच अशी आक्रमक, अघोरी झालीय का ? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज माझ्यासमोर आहे.

देशातील सत्ता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाकडे आली म्हणून तुम्ही विरोध करता असं सर्वसाधारणपणे आरोप केला जातो. या आरोपात तत्थ्य आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी असा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलेलं नाही. रेंद्र मोदींना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की कायद्याने स्थापित असलेल्या या देशाच्या राजकारभाराचे ते प्रमुख आहेत. या देशातील कायदा हातात घेणारे हात अप्रत्यक्षपणे तुमच्याविरोधात बंड किंवा युद्ध पुकारतायत. या देशातील यंत्रणांनी निष्पक्षपणे काम न करणे म्हणजे तुमच्याच अधिकारांना आव्हान देण्यासारखं आहे. जे लोक कायद्याच्या परिघाबाहेर जाऊन काम करू इच्छितात, राज्यघटनेला सारून धर्मसत्ता आणू इच्छितात ते सगळेच लोक देशद्रोही आहेत. अशा देशद्रोही घटकांच्या कृत्यांकडे डोळेझाक करणे म्हणजे तुम्हाला घटनेने ज्या पदावर बसवलंय त्या पदाला मृत्यूशय्येवर ढकलणे होय.

हे सगळं होत असताना गप्प बसण्याची भूमिका घेणारे सगळेच या देशाचे मारेकरी आहेत. समूह करेल ते सगळंच योग्य असतं असं समजणं चुकीचं आहे. जे चुकीचं आहे ते चूक नसून, चूक लक्षात आणून देणाराच चुकीचा कसा आहे, हे सांगण्याची सध्या टूम निघालीय. साधारणतः माणूस म्हणून उन्नतीकडे वाटचाल करण्याचा रस्ता आपल्या राज्यघटनेने आपल्याला दाखवलाय, सध्याची स्थिती आपल्याला पुन्हा टोळी बनवू पाहतेय. या टोळीला तिच्या वरचढ असण्याच्या अस्मिता जोपासायच्या आहेत, तिला इतरांना माणूस म्हणून अस्तित्व नाकारायचं आहे. या टोळीला वंचित-शोषित घटक, महिला यांना गुलाम बनवायचंय.. या टोळीला आपलं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी इतरांचा जीव घ्यायचाय.. या सगळ्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी आपल्या देशाने बरेच लढे दिले आहेत. अनेक समाजसुधारकांनी अवहेलना सहन केली, पण काळाची गती उलटी फिरवण्याचा प्रयत्न संघटितपणे केला जातोय. हे सगळं असह्य होतंय. या टोळीत सामील झालेल्या सर्व लोकांनो मला माफ करा पण मला तुमच्या अ-विचारांचा आदर करता येणार नाही. तुमच्या आदीमपणाकडे सुरू असलेल्या वाटचालीच्या विरोधात मी बोलत राहणार आहे. तुमच्याशी संघर्ष करत राहणार आहे. तुम्हाला माणूस बनवण्याची प्रक्रीया चुकलीय असं वाटतं, तुमची वाटचाल अमानुषते कडे सुरूय.

- रवींद्र आंबेकर

Updated : 29 May 2019 4:14 AM GMT
Next Story
Share it
Top