Home > मॅक्स ब्लॉग्ज > हवा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ‘उतारा’...

हवा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ‘उतारा’...

हवा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ‘उतारा’...
X

उत्तर प्रदेश मधील झाशी येथील सरकारी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका चौथीतल्या विद्यार्थ्याला वर्ग स्वच्छ करीत असताना विंचवाने दंश केला. त्यावर तातडीने डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्याऐवजी त्या मुलाला मांत्रिकाकडे नेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांच्यापूर्वी घडली. शिक्षित समाज हा अंधश्रद्धाच्या पासून दूर असतो ह्या गृहितकाला खोलवर धक्का देणारी ही घटना आहे.

थोडे खोलात जावून ही घटना आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आणखी धक्के आपल्याला बसतात. विंचूदंश झाल्या नंतर त्या मुलाला तात़डीने दवाखान्यात उपचारांसाठी नेण्याऐवजी एका मांत्रिकाकडे नेण्याची सूचना दुसरे तिसरे कोणी नाही तर त्या शाळेच्या दस्तुरखुद्द मुख्याध्यापकानीच केली होती. एव्हढेच नव्हे तर मांत्रिक घरी नाही आहे ही माहिती मिळाल्यावर मुख्याध्यापकांनी मांत्रिकाला फोन केला. त्यानंतर मांत्रिकाने मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरुन पीडित विद्यार्थ्याच्या कानात मंत्रपठन केले, अश्या गोष्टी देखील समोर आल्या आहेत. स्वाभाविकच आहे की या मंत्रतंत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. उलट बराच काळ उपचार मिळू न शकल्याने विद्यार्थ्याची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अगदी शेवटी त्या मुलाची प्रकृती बिघडल्या नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांना उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

एका बाजूला चंद्रावर यान सोडणारा आणि जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ह्या देशाचे हे दुसरे दर्शन भयावह आणि चिंतीत करणारे आहे. ‘’आपल्या देशाने विज्ञानाची कारणी घेतली पण विचार सरणी घेतली नाही’’ ह्या डॉ नरेद्र दाभोलकरांच्या वाक्याची आठवण व्हावी असा हा सगळा प्रकार आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे असे सांगितलेले आहे. आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाच्या गाभा घटकाच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन हा भाग प्रामुख्याने नमूद केलेला आहे. असे असताना देखील शालेय जीवनाशी संबंधित गोष्टींच्या मध्ये त्याला इतकी बगल कशी दिली जाते हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडू शकतो.

त्याच्या मुळाशी जायचे ठरवले तर आपल्या समाजातील ‘शब्द प्रामाण्य’ आणि ‘ग्रंथ प्रामाण्य’ ह्या दोन गोष्टी आणि कुठलेही प्रश्न विचारण्याला मनाई करणारी ‘गप्प बसा’ संस्कृती ही अगदी मुलभूत कारणे दिसून येतात. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे, हे आपल्या समाजात उद्धटपणाचे लक्षण समजले जाते. हाताची घडी आणि तोंडावर बोट हे आदर्श विद्यार्थ्याचे मापदंड असलेल्या समाजात, चिकित्से शिवाय गोष्टी स्वीकारणारी प्रजा निपजणे ह्या मध्ये काहीही नवल नाही. विंचवाच्या दंशाच्या वर उपचार असलेले संशोधन आपल्या भारतात झालेले आहे हे एक वेळ त्या मुख्याध्यापकाला माहित नसणे हे आपण समजून घेवू शकतो. पण मात्रिक घरी नसेल तर त्याला फोन करून बोलावावे की कळणाऱ्या व्यक्तीला विंचू चावल्याने विष उतरवण्या साठी आधुनिक वैद्यकीय उपचार हवेत मंत्राने ते कसे उतरतील ? असा प्रश्न त्या शाळेतील कोणालाही पडू नये हे जसे त्या मुख्याध्यापकाच्या आणि त्या शाळेतील शिक्षकांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. केवळ तेव्हडेच नाही ते इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या ढळढळीत अपयशाचे देखील लक्षण आहे.

सध्या आपल्या कडे विज्ञानाचा काडीचा आधार नसलेले अतिरंजित दावे करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे .अशा स्वरूपाचे दावे हे सकृत दर्शनी फारसे अपयशकारक वाटत नसले तर त्या मधून समाजाची जी मानसिक गुलामगिरी जन्माला येते त्या मधून ‘झाशी’ सारख्या घटना घडतात असे वाटते.

आपल्या कडे शाळेत विज्ञान शिकवले जाते ते केवळ प्रयोग शाळेतील प्रयोगांच्या पुरते मर्यादित राहते. विज्ञानाचा गाभा असलेला वैद्यानिक दृष्टीकोन म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव तपासून पाहणे हे मात्र आपल्याकडे शालेय जीवनात अजिबात शिकवले जात नाही . ज्या शाळेचा मुख्याध्यापकच अशा स्वरुपाची कृती करतो त्या शाळेत मुलांना काय स्वरूपाचा वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवला जात असेल? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडे वारी नुसार भरतात दर वर्षी चाळीस हजार पेक्षा अधिक साप आणि विंचूद्न्शाचे मृत्यू होतात. या मधील बऱ्याच घटनाच्या मध्ये जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्याच्या आधी मांत्रिकाच्या कडे नेलेले असते .झाशीच्या घटने प्रमाणे त्या मध्ये उपचाराचा बहुमूल्य वेळ गेल्या मुळती व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी होते.

डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानाच्या नंतर महाराष्ट्रात पारित झालेल्या जादूटोना विरोधी कायद्या नुसार अशा स्वरूपाचा उपचाराचा दावा करणे हा गुन्हा आहे. त्या मुळे ह्या घटने मध्ये जशी त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या वर कारवाई होणे आवश्यक आहे तसेच मंत्राने विंचवाचे विष उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंत्रीकाच्यावर देखील गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.ह्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याच्या सारखा कायदा देश पातळीवर करण्याची गरज अधोरेखित होते.

केवळ तेव्हडेच नाही तर शालेय जीवनात मुलांनी चिकित्सक व्हावे ह्या साठी अनिस सारख्या संघटने कडून घेतली जाणारी शिक्षक आणि विद्यार्थी प्रशिक्षणे किती महत्वाची आहेत हे देखील या मधून समोर येते.

डॉ हमीद दाभोलकर

कार्यकर्ता महाराष्ट्र अनिस

Updated : 9 July 2019 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top