Home > मॅक्स ब्लॉग्ज > अंधारातले दिवे.... !!

अंधारातले दिवे.... !!

अंधारातले दिवे.... !!
X

दिवस मावळला गुरढोरं दावणीला बांधली.... गावात मारुतीच्या पारावर बायकांची दिवे लावण्याची गडबड, पुरुष मंडळीही दर्शन करून मंदिराच्या ओट्यावर विसावा घेतं.. रात्रीच्या जेवणाला थोडी उसंत म्हणून बुड टेकवलेली मंडळीच्या गप्पाचा ओघ, "मिरुग चांगला गेला, मुगाने शेंगा धरल्यात, गंगमोहरच्या शिवारात जरा पाणी जास्त झालंय... राकीसमोहरं थोडं मुरमाड असल्यानं पिकात पाणी चांगलं मुरलंय.." अशा पीक पाण्याच्या गप्पा करून.. गाव जेवणाची वेळ झाली म्हणून घराकडं वळायचं, जेवण उरकली कि पुन्हा गाव.

मारुतीच्या पारावर रात्रीच्या भजनासाठी... तबल्यावर आज हात साफ करायचे कुंभाराचे नागू.. पिटीवर सुग्रीव सरवदे, विणेकरी मोहन शेख... भजनाला सुरुवात व्हायची... गावातले सगळे बलुते.. आलुते भजनाला हजर असायचे... अभंगाची चढाओढ असायची... भजन रंगात यायचे. मग गौळणी व्हायच्या, भारूड व्हायचं.. सगळे तल्लीन व्हायचे आजची तल्लीनता उद्याच्या कामाचे टॉनिक असायचे....

रात्री बारा एकला एक एक करून भजनकरी अंधरूणावर पाट टेकायला घरी जायचा... दोन तीन लोकं मात्र पहाटेची काकड आरती करून... गावाला उजवून भजन संपवायचे... ह्यात खंड नसायचा. बारा महिने सुरु असायचे... गाव म्हणजे एक कुटुंब असायचं... कोणी अडला नडला तर गाव धावून जायचं... सण कोणाचाही असो तो सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करायचा... मोहरम आले तर डोले उभा करण्यापासून ते धुल्ले खेळण्या पर्यंतचं नव्हे तर सवारी अंगात येई पर्यंत सगळे बिगर मुस्लिम असायचे...

हा सण सगळ्यांचा असायचा मोहरमाचा निवद घरोघरी व्हायचा... पंचीम, दसरा, पाडवा, दिवाळी हा कोण्या एकाचा सण नव्हता. तो गावाचा असायचा... दिवाळीची बुंदी घरोघरी गाळली जायची... नांदत्या लेकी घरोघरी माहेरवाशीण म्हणून यायच्या... बैल पोळा गावं शिवारभर पसरायचा... गावं अशी आनंदानी नांदायची, एकमेकांच्या गरजा एकमेकांवर अवलंबून होत्या...

मारुती, महादेव, मरियाई, पांडव, खन्डोबा, पीर हे सगळ्यांचे देव होते... सगळ्यांचे निवद आणि सगळ्यांचे माथे टेकले जायचे... हे गावं होतं... भांडण झाली तर पंच परमेश्वर म्हणून पंच कितीही मोठं भांडण असेल मिटवायचे... गावं लिहतं वाचतं नव्हतं. मात्र, जीवन व्यवहारात माणूस अन माणुसकी हे केंद्र होतं... स्वार्था बरोबर परमार्थ करावा हे त्यांच्या पिढ्यानं पिढ्या संस्कार होते... त्यामुळे सगळ्यांच्या चुली पेटायच्या... कोणाचीही लेक असू दे ती गावची बायलेक असायची... असे नांदणारी गावं लौकिक अर्थाने निरक्षर होती... पण त्यांच्या अंधारातले तेच दिवे होते...

त्यांच्या जगण्याचा सार आनंद होता... तिथे असूया नव्हती तिथे सत्ता संघर्ष नव्हता... कारण त्यांचे जग त्यांच्या गावात सुरु व्हायचे आणि शिवेवर संपायचे... हे जगणे कोणत्याही मोजपट्टीत मोजता येणारे नव्हते... आणि त्या मोज पट्टीचे त्यांना काही देणेघेणे नव्हते... !!

युवराज पाटील

(फेसबुक साभार)

Updated : 10 Aug 2020 3:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top