Home > मॅक्स ब्लॉग्ज > गावाकडची आठवणीतली होळी...

गावाकडची आठवणीतली होळी...

गावाकडची आठवणीतली होळी...
X

आता होळी आली म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहत. लहानपणी केलेल्या गमती- जमती, करामती सारं काही आठवत राहतं. काळ बदलत गेला. तसं होळीचंही स्वरूप बदलून गेलंय. त्यावेळी सारं गाव एकत्र यायचं. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचं. आमच्या गावची होळी असा एक अभिमानही त्यात होता. आता गावागावातील राजकारणाचं सावट होळीवर पडलय. तरही होळी अजून टिकून आहे.

शिमगा आठ दहा दिवसावर आला की आम्ही सगळी लहान पोरं संध्याकाळी गावच्या चार पिढ्या पाहिलेल्या वडासमोरच्या दगडी पारावर जमायचो. चढणाऱ्या अंधारासोबत पारावर शिमग्याच्या गप्पा रंगत जायच्या. मग नदीत उगवलेल्या खडकावर थापलेल्या शेणाच्या गोवऱ्या पहिल्यांदा कुणाच्या उचलायच्या त्याचा ठराव व्हायचा.

गावातल्या ज्या बायका जास्त उर्मट असायच्या त्यांच्या गोवऱ्यापासून पहिली सुरवात व्हायची. कारण होळीच्या चार दिवस आधी सगळेजण आपापले नदीत लावलेले गोवऱ्याचे ढीग उचलून आपल्या घरासमोर रचून राखण करत बसत. मग उशीर झाला की हाताला काहीच लागत नसे. म्हणून दहा दिवस आधीच रात्रीच्या अंधारात नदीत उतरून आम्ही खड़कावरचे गोवऱ्याचे ढिग पोत्यात भरून पारासमोरच्या वडाच्या झाडाखाली आणून ठेवायचो.

परत होळीचा दिवस उगवला की सकाळपासूनच सगळेजण प्रत्येकाच्या घरी पाच - पाच गोवऱ्या मागायला जात असू. ज्याच्या गोवऱ्या आधीच चोरलेल्या असायच्या त्या घरातल्या म्हाताऱ्या बायका लई शिव्या घालायच्या. मग पोरं ठु ठु करुन दारातच मोठ्यानं बोंबलायची. "होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या पाठीत बंदुकीची गोळी". मध्ये त्या घरमालकाचं नाव घालून पोरं गाव जागं करायची. अखेर पाच शेणकुटं घेऊनच पोरं पुढच्या दाराकडे सरकायची. दिवसभर जमवलेल्या गोवऱ्या मग अंधार पडू लागला की देवळा पुढच्या भल्या मोठ्या रिकाम्या पटांगणात ढीग करून ठेवल्या जायच्या.

अंधार पडायला लागला की देवळासमोरच्या पाराच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडी मशालीवर गावाचा गुरव चढायचा. चांगलं डबाभर घाण्याचं गोडेतेल ओतून मशाल पेटवली जायची. सगळ्या देवळासमोर मोठा उजेड पडायचा. काही पोक्त मंडळी शास्त्रोक्त पद्धतीने होळी रचायची. पहिल्यांदा ढिगाच्या मध्ये ऊस रोवला जायचा. मग बाजूने लाकडे अन गोवऱ्या रचल्या जायच्या. आकाशात पूर्वेच्या बाजूने पुनवेचा चंद्र उगवून वर आलेला असायचा. गुरवीन बाई होळी समोर चिमटीतून रांगोळीचे पांढरे ठिपके सोडत गोल गोल फिरायची. परंपरेनुसार होळी पेटवण्याचा मान गावच्या पाटलाला असायचा.

पाटील हातात पोळ्याच्या निवदाचं ताट घेवून वाजत गाजत देवळपुढं यायचा. त्याच्या पुढं पांडू शाहीर मोठ्यानं हलगी वाजवित असायचा. सदा गुरव मोठ्यानं शिंग वाजवायचा. त्याच्या नादमधुर आवाजानं सारा गाव जागा व्हायचा. दुपारपासून पेटलेल्या घराघरातल्या चुली आता विझत आलेल्या असायच्या. घरातल्या बायकांची नैवद्याची ताटं भरण्याची लगबग सुरु व्हायची. पहिली पोळी होळीला मग घरच्यांना. ही गावाची रीत. परंपरा. आणि संस्कृती...

सगळी गडी माणसं एका हातात नैवद्य आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या धरून देवळाकडं सरकायची. मग गावचा पाटील होळीची पूजा करून नारळ फोडायचा. लहान पोरं पुढं पुढं करायची. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. पाटील कडब्याची ताटं पेटवून होळीच्या बाजुनी गोल गोल फिरत होळी पेटवायचा. जसजसा मोठा अग्नी होत जायचा तशी समदी पोरं मोठ्याने होळीभोवती ठो ठो बोंबलत डबडी वाजवायची.

सगळं गाव होळीला पुरण पोळीचा नैवद्य दाखवायचं. वश्या सुतार होळीच्या बाजूला टॉवेल टाकून बसायचा. नैवैद्य दाखवणाऱ्या बाया माणसांना म्हणायचा. "तिकडं नुस्ता निवद दाखवा अन पोळ्या हिकडं माझ्याकडं टाका." त्याच्यावर काही जाणते लोक ओरडायचे. "सुकाळीच्या तसं देवाला रुजू होत नस्तय " म्हणायचे. काहीजण पोळ्या होळीत टाकायचे पण बरेच जण हा मान गरीब वश्याचाच आहे म्हणून त्याच्या टॉवेलात पोळ्या टाकायचे. त्याच्यापुढं मोठा पोळ्यांचा ढिग जमायचा. मला नेहमी प्रश्न पडायचा.

हा माणूस इतक्या पोळ्याचं काय करत असावा? घरात तर हा आणि याची म्हातारी दोघच. पण नंतर समजत गेलं. याची म्हातारी जमलेल्या पोळ्या घराच्या पत्र्यावर वाळवायची. अन पुढं मागं चांगलं पंधरा दिवस याचं पोट यावरच भरायचं. उगवलेल्या चंद्राच्या अन मशालीच्या उजेडात रात्री उशिरा पर्यंत गावतली पोक्त मंडळी होळीच्या बाजूला शेकत बसायची. होळीला थंडी संपते. हा गावकऱ्यांचा समज. होळीभोवती रात्रभर गप्पांचा फड रंगायचा. गंमती जमती व्हायच्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेली माणसं होळीत गावाला आलेली असायची. सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गडीमाणसे नदीतून घागरी भरून पाणी आणायचे. होळीवर घागरी ओतल्या जायच्या. होळीची जळकी राख अंगारा म्हणून काहीजण कपाळाला लावायचे. कुणी अंगाला लावायचा....

... आता हे सगळं गावासोबत मागं पड़त चाललय. शहरात सिमेंटच्या जंगलात चिंचोळ्या जागेत पेटणाऱ्या होळ्या आता आपलं मन रिझवू शकत नाहीत. रंगाची चार बोटे गालावर लावून आभासी जगात सेल्फी सोडून त्यावरच्या कमेंट वाचण्यापुरंतच आता काय ते इथलं होळीच अस्तित्व. पण होळी आली म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहतं. मन आतून पोखरत जातं. सगळी केलेली धमाल आठवते. लहानपणी केलेल्या गंमती - जमती, करामती सगळं काही आठवतं. काळ बदलत गेला.

आपणही काळासोबत बदलत जातोय. यांत्रिक बनतोय. पूर्वी सगळे लोक गावात एकत्र यायचे. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचे. आमच्या गावची होळी असा एक अभिमान त्यात असायचा. आताही गावाकडच्या होळ्या पेटतात. पण गावागावातील राजकारणाचं सावट होळीवर पडलय. तरीही होळी अजून टिकून आहे. नवीन पिढी या प्रथा मानायला तयार नाही. नदीतल्या खडकावर आता पूर्वीसारखे गोवऱ्याचे ढीग दिसत नाहीत. गावच्या नवीन सुना आता शेणात हात घालत नसतात. त्यांची बोटे फक्त शुभेच्छा देण्यापूरती मोबाईलच्या स्क्रीनवर फिरत राहतात. एकेकाळी होळीचा मान असलेला पाटील आता अंथरुणाला लपेटून बसलाय. आता होळीला देवळापुढची दगडी दीपमाल पेटत नाही.

सगळीकडे एल.ई. डी दिव्यांचा झगमगाट असतो. गावची दीपमाल आता पेटलेल्या होळीकडे पाहत डोळ्यातून टीपे गाळत रात्रभर स्तब्ध उभी असते. गरिबीमुळे वर्षातून एखादाच होळीच्या सणाला पोळ्या करणारी आणि साऱ्या गावाला सुखी ठेव म्हणून हात जोडून होळीतली जळती राख कपाळावर अंगारा म्हणून लावणारी तारू म्हातारी आता स्वताच स्मशानात राख बनून गेलेलीय. प्रत्येक वर्षी होळीच्या अग्निपुढे पोळ्या मिळाव्यात म्हणून टॉवेल टाकून बसणारा वश्या सुतारही काळाने कधीच उचललाय. आता त्यांचं उरलेलं गावाकडचं पडकं घर प्रत्येक होळीला डोळ्यासमोर येवून स्मरणकेंद्रातील जिवंत जाणिवांना फक्त आणि फक्त छळतच राहतं...

ज्ञानदेव पोळ

[email protected]

Updated : 1 March 2018 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top