Home > मॅक्स ब्लॉग्ज > अनंत दिक्षीत सरांचे शेवटचे पत्र...

अनंत दिक्षीत सरांचे शेवटचे पत्र...

अनंत दिक्षीत सरांचे शेवटचे पत्र...
X

मला IBN लोकमत च्या डिबेट शो मध्ये स्पष्टपणे,अगदी लिहिल्यासारखं एकटाकी विश्लेषण करणारे सर आठवले....

निखिल वागळे सरांच्या ‘आजचा सवाल’ मध्ये दीक्षित सर यायचे.आम्ही सरांच्या तालमीत तयार झालेले नवे अँकर्स चर्चेचे कार्यक्रम करायचो.तेव्हाही दीक्षित सरांच्या पाठशाळेत बसायचो.

राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती या सगळ्यामध्येही, ग्रामीण भागातलं लोकजीवन हा दीक्षित सरांच्या जिव्हाळ्याचा विषय. चर्चेच्या आधी सरांशी बोललं की, आम्ही स्टुडिओतून थेट पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात तर कधी मराठवाड्यात, अगदी सोलापूरपर्यंत जात असू.

चर्चा करताना तो विषय सर मोठ्या मनाने समजून सांगत आणि कधी शो आवडला तर फोन करून कौतुकही करत. दीक्षित सरांचा असा फोन आला की खूप बरं वाटायचं. ते पुण्याहून मुंबईला आले की आमची न्यूज़रूम संपादकाच्या नजरेतून अगदी बारकाईने न्याहाळत असत.

संपादक,विश्लेषकाच्या भूमिकेत असूनही त्यांच्यामधला बातमीदार सतत जागा असायचा. त्यामुळेच सर खूप जवळचे वाटायचे. ते काही दिवस दिसले नाहीत. तर माझे बाबा फोन करून विचारायचे... काय रे दीक्षित सरांना बरं नाही का ? दिसले नाहीत...विश्लेषकाचं प्रेक्षकांशी असं नातं दुर्मिळच.

दीक्षित सरांचे शेवटचे पत्र, कोल्हापूरसाठी

ता. 22-11-2019

कोल्हापूरकरांना पत्र

सर्व मित्रांना

स.न.

आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. सतत कोल्हापूरची आठवण येते. लोकही मनापासून प्रकृतीची चौकशी करतात. अलीकडे माझ्या मनाने हळवेपणाचा सूर पकडलेला दिसतो. प्रकृती आणि त्यामुळे येणारे क्षण फार विचित्र असतात. एक दिवसाआड डायलिसिस सुरू आहे. अलोपॅथी आणि होमिओपॅथी असा कार्यक्रम सुरू आहे.

ज्यादिवशी डायलिसिस सुरू असते. त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो. त्रासाचा अटळ भाग म्हणून अंथरुणावर पडून राहावे लागते. प्रकृतीची क्षीणता एवढ्या टोकाला गेली आहे की, नव्याने किंवा पूर्वीप्रमाणे वाचन अशक्य झाले आहे. मेंदूला कोणतेही ओझे अजिबात चालत नाही. त्यामुळे जो जीवनक्रम आहे, त्यात दुःखसंपन्नता आहे. म्हणजे मी हतबल झालो आहे असे नव्हे. कुटुंबाची म्हणजे माझी पत्नी सौ. अंजलीची साथ देण्याची धमक अपूर्व आहे.

जीवनाच्या गाभ्याविषयी तिला असलेली समज माझ्यापेक्षा कितीतरी पुढची आहे. सतत कोणता ना कोणता तरी विचार करण्याची सवय मला अडचणीची ठरली आहे. विचार करण्याने मनाच्या गरजा हा पैलू माझ्या कधी लक्षातच आला नाही. मन मारणे चांगले नाही, मनाला विवेकाची साथ आवश्यक आहे. हे खरे असले तरी आत्मनियंत्रण सैल झाल्यास कठीण स्थिती येते. कळते पण वळत नाही. ही ती स्थिती होय.

माझ्या मुलीच्या म्हणजे अस्मिताच्या मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी अंतःकरणात प्रचंड अस्वस्थतता असते. कित्येकांना मी आधार दिला पण माझे दुःख मला झेपत नाही. अशावेळी जुन्या आठवणी, मैत्री नजरेसमोर उभी राहिली की, मी अनावर होतो. शारिरिक त्रास असा असतो की, जेव्हा शरीर कासावीस असते. तेव्हा तो त्रास सांगायला आवश्यक असलेली पूर्णता हरवून जातो. मानसिक त्रासाचे स्वरूप असे असते की,पोटात कालवाकालव होते. तरीही माझ्या पत्नीच्या जिद्दीवर वाटचाल सुरू आहे. तिलाही गुडघेदुखीचा त्रास आहे. माझी थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असते. ती दररोज मला फोन करत असते. तिची घनव्याकुळता आपण सर्वजण समजू शकता. या सगळया वातावरणात वाचनात पडलेला खंड आणि लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.

आपला,

अनंत दीक्षित

Updated : 10 March 2020 3:32 AM GMT
Next Story
Share it
Top