Home > News Update > Time आणि मरणासन्न भारतीय पत्रकारिता!

Time आणि मरणासन्न भारतीय पत्रकारिता!

Time आणि मरणासन्न भारतीय पत्रकारिता!
X

मोदींवर Time मॅगझीनने "Divider in Chief" असा शिक्का मारून त्यांचं कव्हर आज छापलं. याच टाईम मॅगझीनने 2012 जुलैला मनमोहनसिंग यांचा फोटो छापून "The Underachiever" असं लिहिलं होतं. जेव्हा टाईमने डॉ. सिंग यांना तसे संबोधले होते. तेव्हा भाजपने प्रतिक्रिया दिली होती "जे सगळा देश कित्येक वर्षे सांगतोय, तेच आज Time ने सांगितले!" आज मोदींना जेव्हा टाईमने या नावाने संबोधलेय तेव्हा काँग्रेसची आणि तमाम विरोधी पक्षांची प्रतिक्रिया काहीही वेगळी नसणार आहे.

मोदी हे फूट पाडणारे नेतृत्व आहे हे सांगायला टाईमची गरज नाहीये, त्यांचा इतिहास आणि वर्तमान सर्व भारताला माहीत आहे. मला विशेष याचं वाटतं की भारतातले NDTV वगळता एकही टीव्ही चॅनेल किंवा इंटरनेट पत्रकारिता करणारी Wire, Quint वगैरे काही माध्यमे सोडली तर एकाही मीडिया हाऊसने मोदींना कधी या नावाने ओळखले नाही किंवा त्यांना आरसा दाखवला नाही. मोदी सत्तेत आल्यापासून या देशात जात, धर्म, भाषा, राज्य, राजकीय विचारधारा यावरून ज्यापद्धतीने फूट पडत गेली ते लक्षणीय आहे.

भारताला सांस्कृतिक, धार्मिक सौहार्दाची एक परंपरा आहे. या परंपरेला काही अपवादाने तडे जाणाऱ्या घटना घडायच्याही, पण कुठल्याही राजकीय पक्षाने अशा घटनांचे समर्थन केले नाही. पण मोदींच्या काळात जे घडत होते. ते अभूतपूर्व होते. ट्विटरवर जे लोक इतरांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करतील, पंतप्रधान त्यांना स्वत : फॉलो करणार आणि समारंभपूर्वक सत्कार करणार हे या देशाने पहिल्यांदा पाहिलं. अखलाकच्या मारेकऱ्यांचा केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते सत्कार होताना दिसला. उत्तर प्रदेश दंगलीला समर्थन देणारा संगीत सोम नामक आमदार भाजपसाठी पोस्टरबॉय ठरला. बंगाली मजुराला मारून जिवंत जाळणारा माथेफिरू शंभुलाल रेगर हा धर्मवीर ठरला.

पद्मावती सिनेमाला विरोध म्हणून किल्ल्यावर माणूस लटकवला गेला. सगळ्यात वरची कडी म्हणजे मालेगाव स्फोटांचे आरोप असणारी प्रज्ञा ठाकूर भाजपच्या तिकिटावर उभा राहिली आणि दस्तुरखुद्द मोदींनी तिच्या उमेदवारीचे समर्थन केले. आणि याच प्रज्ञा ठाकुरने शहीद करकरेंना धर्मद्रोही, देशद्रोही म्हणण्याचे समर्थन खुद्द लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. उत्तर प्रदेशात विधानसभेचा प्रचार करताना तर मोदींनी "स्मशान की कब्रस्तान" असा प्रश्न करून अगदी मरणातसुद्धा धार्मिक विद्वेष शोधला होता. पण या सगळ्यात इथला मीडिया जो काही मूग गिळून बसला होता त्याला तोड नाही.

गेल्या महिन्याभरात मोदींच्या पेड मुलाखती पाहिल्या की शिसारी येते. अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत कुणी स्पॉन्सर केली हे चॅनेलना सांगायला सुद्धा तोंड नव्हतं. रजत शर्मा इंडिया TV वर भाजपच्या संमेलनात मोदींच्या गुणगौरवाचे व्हाट्सएप मेसेज वाचून दाखवतो, मोदींनी जगभरात वाजवलेले ढोल आणि उगीच गळ्यात पडण्याचे व्हिडीओ दाखवून त्याला इंटरनॅशनल डिप्लोमसी म्हणतो. टीव्ही टूडेचे तीन वरिष्ठ पत्रकार भक्तिभावाने मोदींची आरती गात गंगेत सैरसपाटा करतात. झी न्यूजचा सुधीर चौधरी, रिपब्लिकचा अर्णब आणि Times Now चक्क भाजपचे हॅशटॅग वापरून बातम्या देतात. हे संसदीय लोकशाहीत अनुभवणं हे सर्वार्थाने भयानक आहे!

भारतातील पत्रकारिता आणि तिची विश्वासार्हता आज जवळपास संपलेली आहे. टीव्ही आणि प्रिंट मीडियात एकतर पैसे घेऊन लिहिणारे, बोलणारे भाट आहेत किंवा काहीच न बोलणारे भेकड आहेत. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे वर्णन केला गेलेला पेशा आज लाचार आहे आणि जमीनदोस्त झालेला आहे. गेल्या 5 वर्षात मोदींनी जी मनमानी केली आणि आजही जी मनमानी ते करतायत, त्याला पाठबळ द्यायला या देशातला भिकारडा आणि भित्रा मीडिया कारणीभूत आहे. 23 मेला मोदींचं सरकार येईल का नाही हा सध्या प्रश्न आहे. ज्या निष्पक्षपणे निवडणूक आयोग मोदींना एकामागून एक क्लीनचिट देतोय ते पाहून निकाल किती विश्वासार्ह असतील यावर संशय येतो. आणि तरीही मोदी सरकार लोकांनी मतदानाने घालवले तर मात्र या देशातील मीडिया लोकांच्या निशाण्यावर असेल!

जर मोदी हरले तर नंतर त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक पत्रकारावर लोक आधी हसून घेतील, तू आधी का गप्प होतास म्हणून! ज्यांनी मोदींच्या जाहीर आरत्या गायला त्या अर्णब, रजत, सुधीर, अंजना सारख्या पत्रकारांना लोक कदाचित टीव्हीवर पाहणारसुद्धा नाहीत! तसंही या लोकांनी गेल्या 5 वर्षात आयुष्याची कमाई मोदींकडून वसूल केलेली असणारच आहे. त्याशिवाय ते स्वतःला इतक्या सहजपणे विकणार नाहीयेत. त्यामुळे या निवडक लोकांचे काही मोठे नुकसान होणार नाहीये. पण अशा काही विकाऊ पत्रकारांनी या देशातील मीडिया भेकड आणि विकाऊ आहे हे दाखवून भारतीय पत्रकारितेची कबर खोदलेली आहे. पत्रकारिता येती किमान 10-20 वर्षे तरी बदनामीच्या आणि विकाऊपणाच्या अंधकारात चाचपडणार आहे!

- डॉ. विनय काटे

Updated : 12 May 2019 3:08 AM GMT
Next Story
Share it
Top