Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना नंतरचे जग: सावधान व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं?

कोरोना नंतरचे जग: सावधान व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं?

कोरोना नंतरचे जग: सावधान व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं?
X

प्रत्येक मानवी व्यक्तीला एक मूलभूत मूल्य आहे. अशा व्यक्तिवादाच्या संकल्पनेने शतकानुशतके सामाजिक संस्था, अर्थव्यवस्था आणि न्याय याबद्दलचे विचारविश्व व्यापले आहे. पण सध्या जगावर घोंघावणाऱ्या कोरोनाच्या संकटाच्या काळात व्यक्तींच्या मुलभूत हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली आहे.

व्यक्तीच्या नैतिक मूल्य आणि अस्तित्वावर भर देणा-या आणि राज्य किंवा सामाजिक गटापेक्षा व्यक्तीचे हितसंबंध जास्त महत्त्वाचे आहेत. असं मानणाऱ्या व्यक्तीवादाचा उदय पाश्चिमात्य ज्ञानदोयाच्या चळवळीतून झाला. व्यक्ती हा एक स्वतंत्र घटक आहे. असं मानणाऱ्या मुक्त भांडवलशाहीच्या उगमाची मुळेही व्यक्तीवादातच आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चात्य व्यक्तीवादाला मोठे अवकाश मिळाले. आज बराचसा युरोप पोलादी पडद्यामागे आहे, चीन बाजारपेठ-पूर्व अवस्थेत आहे. तरीही अमेरिकेच्या एकहाती वर्चस्वामुळे व्यक्तीस्वातंत्र्याच्या मूल्यावर आधारित व्यक्तिवादाच्या संकल्पनेला आघाडी मिळाली आहे.

याच काळात महात्मा गांधी आणि त्यांच्या पूर्वसुरींच्या विचारप्रणालीवर आधारित व्यक्तिवादाचे आणखी एक रूपही विकसित झाले. त्यांच्या व्यक्तिवादाची मुळे अध्यात्मात होती. पाश्चात्य शैलीतील व्यक्तीवाद केवळ भौतिकवादापुरता मर्यादित होऊ शकतो. हे गांधींनी ओळखले. त्यांनी व्यक्तीकडे एक स्वतंत्र नैतिक कर्ता म्हणून पाहिले, हा व्यक्तीवाद वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्याचे साधन नव्हता. व्यक्तीचे अक्षत मानवी हक्क सामाजिक प्रगतीच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत; समाजातील सर्वात खालच्या स्तरावरील वंचित माणसाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला केंद्रबिंदू मानून, त्याच्या वतीने राज्य आणि समाज त्यांच्या धर्माचे पालन करेल. असा हा विचार होता.

यातल्या पहिल्या प्रकारच्या व्यक्तीवादाच्या आगमनाने तीन शतकभर कल्पकतेला मुक्त वाव मिळाला. उद्योजक, सर्जनशील कलाकार, सामाजिक विचारवंतांनी नव्या कल्पना, उत्पादने आणि सेवांसाठी जागतिक बाजारपेठ तयार केली. यामुळेच आधीपेक्षा जास्त लोकांपर्यंत वाढलेल्या भौतिक समृद्धीची फळे पोहोचली.

गांधींच्या व्यक्तिवादाच्या संकल्पनेने व्यक्तींच्या विविध असुरक्षित गटांचे कल्याण आणि त्यांचे संरक्षण या विषयात प्रशासनिक आणि सामाजिक व्यवस्थांवर लक्षणीय प्रभाव पाडला आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा जपून, जोखीम घेण्याची संधी देताना, त्याला सामाजिक सुरक्षिततेचे कवच मिळाले पाहिजे, असे जरी पूर्णतः वास्तवात उतरले नसले तरी हा एक उत्तम प्रयोग आहे.

असे असूनही गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळात व्यक्तीवाद आणि त्या व्यक्तीस्वातंत्र्यासमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.

याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे दहशतवादा सोबत झालेली आर्थिक पडझड. जेव्हा ९/११ घडले तेव्हा गोष्टी रातोरात बदलल्या, त्यामुळे वैयक्तिक स्वायत्त अस्तित्वाला सर्वात मोठा धक्का बसला. स्वातंत्र्य आणि उदारमतवादाचा अभेद्य किल्ला असलेल्या अमेरिकेतील लोकांना सार्वजनिक सुरक्षिततेच्या अभिवचनाच्या बदल्यात, त्यांनी प्रेमाने जोपासलेल्या अनेक स्वातंत्र्य आणि खाजगीपणाच्या अधिकारांचा त्याग करावा लागला. त्यानंतर २००८ ची आर्थिक मंदी आली. त्यानंतर, आपण जागतिकीकरणानंतरच्या जगात प्रवेश केला. या जगात सत्ता एककेंद्रीत करणार्‍या हुकूमशाही सरकारांचा उदय झाला.

देशावर केलेली प्रामाणिक टीका हे एखाद्या व्यक्तीचे देशाबद्दलचे प्रेम असू शकते, अशी देशभक्तीची कल्पना; ‘देश म्हणेल ते खरे!’ मग ते चूक असो की बरोबर अशा कट्टर राष्ट्रवादात रुपांतरीत झाली आहे. मतभेदाच्या स्वातंत्र्याचा संकोच केला गेला असून स्वतंत्र व्यक्तीला राजकीय उलाढालींतून हाकलून दिले गेले आहे.

दुसरे कारण म्हणजे, इंटरनेट दिग्गजांची आणि त्यांच्या विशाल सोशल प्लॅटफॉर्म्सची प्रचंड वाढ. सुरुवातीला, असं वाटलं की हया इंटरनेटने स्वतंत्र व्यक्तीला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. कधीही, कुठेही, कोणत्याही संदर्भात ग्राहक हा राजा होता. मजूरी करणारा कामगार आता एक स्वयंरोजगार करणारा उद्योजक होता; जगभरात आपले मत व्यक्त करणारा नागरिक आता नेटिझन होता.

दुर्दैवाने, वैयक्तिक निवड हा एक भ्रम, एक भुलवणारे मृगजळ असल्याचे लवकरच लक्षात आले. आणि आता भयावह मानल्या जाणाऱ्या पाळत ठेवणा-या भांडवलशाहीचे युग आले. या युगात स्वतंत्र काम करणाऱ्या कामगाराला वाढलेल्या कामाचं अत्यल्प वेतन मिळतं; ग्राहक हा केवळ माहितीचं गाठोडं असून त्याची स्वतंत्र इच्छा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे वाकली जाऊ शकते. हेच तंत्रज्ञान पाळत ठेवण्यासाठी वापरून राजसत्ता वैयक्तिक अधिकार आणि खाजगीपणावर चिंताजनक आक्रमण करत आहेत. निवडणूकीच्या लोकशाहीमधील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे त्या व्यक्तीचे मत. त्यातही आता हेराफेरी करता येते.

तिसरे कारण म्हणजे, जग अधिकाधिक परस्परावलंबी होत आहे. हवामान बदल आणि वायू प्रदूषणाला सीमा नसते आणि प्रतिजैविक संसर्गाला कोणत्याही सीमारेषा रोखू शकत नाहीत. आफ्रिकेतील बॅक्टेरिया अमेरिकेतील लोकांना आजारी पाडू शकतात. इंडोनेशियातली जंगले जाळल्यामुळे आशिया खंडाचा श्वास कोंडला जाऊ शकतो.

अशा काळात, आपण डोळ्यात तेल घालून नजर ठेवली नाही तर कोरोनाची साथ व्यक्तिवाद नेस्तनाबूत करेल. या साथीमुळे आपल्याला आपल्या व्यक्तिगत विशेषाधिकारांवर पाणी सोडून, राज्यशासन किंवा आपल्याशी संबंधित संस्थांचे उदाहरणार्थ अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, गाव आणि शहर यांच्या निर्णयांसमोर मान तुकवणे भाग पडले आहे. अशा काळात स्वातंत्र्याचा बेछुट उपयोग केल्याचा धोका आपल्याला कळतो म्हणून आपण स्वेच्छेने आपले स्वातंत्र्य स्थगित केले आहे. आपल्या कृतींचा इतरांवर प्रभाव पडतो या जाणीवेने व्यक्तिवाद आणि सामाजिक भान यांमध्ये नीरक्षीर विवेक करणाऱ्या व्यक्तिवादाच्या अनेक संकल्पना आज पोरक्या झाल्या आहेत.

असे असले तरी, व्यक्तिवादातल्या सकारात्मक बाबी आपण गमावता कामा नये. कायद्याला न जुमानणाऱ्या झुंडशाहीसमोर आपण मान तुकवता कामा नये. सरकारचे आदेश पाळणे वेगळे आणि विशेषत: ‘इतरांच्या’ तर्कशून्य भयगंडाला बळी पडणे वेगळे. या काळात स्वयंघोषित सतर्कतारक्षकांची अरेरावी आणि झुंडशाही यात वाढ झाल्याचे आपण पाहतोच आहोत. घाबरलेले ग्रामस्थ सर्व बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घालतात; डॉक्टरांना त्यांच्या आपल्या गावच्या घरी परत जाण्यापासून रोखले गेले आहे; आणि पोलीस लाठीचा बेछूट वापर करत आहेत.

या साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या अशा प्रकारच्या परिस्थितीवर उमटलेल्या या विचित्र प्रतिक्रियांमुळे लवकरच सकारात्मक व्यक्तिवादाला घरघर लागू शकते. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाचे भले यांमधला ढळलेला तोल सावरण्यासाठी ‘समाजाने’ त्वरित कल्पक पाउले उचलली पाहिजेत. प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेट नसतो, तरीही प्रत्येक मनुष्याच्या अनमोल स्वत्वाचे अवमूल्यन होऊ देऊ नये. हे स्वत्वच सर्व चांगल्या समाजांचा पाया आहे.

Updated : 5 April 2020 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top