Home > मॅक्स ब्लॉग्ज > वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचे 'The Unfinished Memoirs'

वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचे 'The Unfinished Memoirs'

वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचे The Unfinished Memoirs
X

'The Unfinished Memoirs' हे पुस्तक म्हणजे वंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांचे आत्मचरित्र नव्हे तर त्यांच्या १९५८ पर्यंतच्या काही आठवणींचे कथन आहे. मुळ लेखन बंगाली भाषेत असून याचे संपादन शेख हसीना यांनी तर डॉ. फक्रुल आलम यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे.

मुजीब यांना स्वतंत्र बांग्लादेश निर्मितीसाठी अनेक वेळा कारावास घडला मात्र सन १९५४-५५ आणि १९५८-१९६२ या काळातील कारावास दीर्घ मुदतीचा होता आणि तसा तो अत्यंत धोकादायक काळातील होता. पाकिस्तानी राज्यकर्त्यांची आणि लष्करशहा यांची वृती पाहता, राजकीय विरोधकांना संपवणे तसे नवे नव्हते. याच काळात मुजीब यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली मात्र त्यांचे हस्तलिखित गहाळ झाले. कारण बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर अवघ्या पाच वर्षात १५ ऑगस्ट १९७५ त्यांच्या कुटूंबाची हत्या झाली. त्यात वाचल्या केवळ हसीना आणि रेहाना ज्या त्यावेळी विदेशात होत्या! शेख हसीना १९८१ ला मायदेशी परतल्या आणि १९८६ ला अवामी लीगच्या अध्यक्षा होवून १९९७ ला पंतप्रधान बनल्या!

मुजीब यांचे कारागृहातील लेखन हरवले होते, ते हसीना यांना २००७ मध्ये मिळाले ! त्यावेळी ते अतिशय जीर्ण झाले होते, अनेक अक्षरे ओळखू येत नव्हती. मात्र त्यावर संशोधन करून हा आठवणींचा ठेवा २०१२ साली शेख मुजीब यांच्या नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत प्रकाशित केले गेले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा वंगबंधू यांचे वय २७ वर्षाचे होते.त्यावेळी ते पूर्व पाकिस्तानातील लीगचे नेते शहीद सु-हावर्दी या त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम लीगच्या युवा आणि विद्यार्थी गटाचे कार्यकर्ते म्हणून ते कार्य करत होते. ढाका विद्यापीठात त्यांनी कायद्याची पदवी शिकत असताना पाकिस्तानी पंतप्रधान ख्वाजा निजामुद्दीन यांनी उर्दू ही पाकिस्तानची अधिकृत भाषा असणार हे जाहीर करताच मुजीब यांनी बंगाली भाषेचा आग्रह धरून आंदोलन छेडले !

मुजीब यांच्या राजकीय कारकिर्दीची आणि बांग्लादेश या नव्या देशाच्या निर्मितीची पायाभरणी पाकिस्तान निर्मितीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजे २३ फेब्रुवारी १९४८ रोजी सुरु झाली होती ! पाकिस्तानच्या मागणी साठी मुस्लीम लीगचे कार्यकर्ते म्हणून ज्या मुजीब यांनी कार्य केले होते त्या मुजीब यांना त्यांच्याच देशात १९४८ आणि १९४९ या दोन वर्षातच दोन वेळा कारावास घडला. त्याच वर्षी २३ जून १९४९ रोजी पूर्व पाकिस्तान मुस्लीम अवामी लीगची स्थापना झाली आणि कारावासात असलेल्या मुजीब यांची सहसचिव म्हणून निवड झाली. पंतप्रधान लियाकत अली यांनी ढाक्याला भेट दिली तेंव्हा उर्दू हीच एकमेव राजभाषा असेल हे जाहीर होताच आंदोलन पुन्हा पेटले. मुजीब यांना प्रथम ढाका नंतर फरीदपुर जेलमध्ये बंदी केले गेले. आम्ही मुस्लिम आहोत पण त्याच बरोबर बंगाली आहोत आणि त्याचा आम्हांस अभिमान आहे ही भूमिका लोकप्रिय होऊ लागली!

मुजीब यांची वंगबंधू ही ओळख याच काळात निर्माण होऊ लागली. पुढे ९ जुलै १९५३ रोजी मुजीब यांची अवामी मुस्लीम लीगचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. मौलाना भसानी, फाज्लुल हक आणि सुर्वावार्दी यांच्या पुढाकाराने मुस्लीम लीगच्या विरोधात युनायटेड फ्रंटची स्थापन करण्यात आली. पुढच्या वर्षी १० मार्च १९५४ ला पाकिस्तानातील घटना निर्मिती साठी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ज्यामध्ये २३७ पैकी फ्रंटने २२३ जागा जिंकल्या.

गोपालगंज मतदार संघातून मुजीब १३००० मतांनी विजयी झाले ! पण पाकिस्तानातील केंद्रीय सरकारने हा जनादेश डावलत मुजीब यांना कारागृहात पाठवले. मुजीब यांची निवड १९५५ साली नॅशनल असेम्ब्ली वरती झाली तेव्हा मुजीब यांनी घटनेत पूर्व पाकिस्तानच्या प्रादेशिक स्वायततेची मागणी केली. राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि लष्कर प्रमुख अयुब खान यांनी देशाच्या सार्वभौमत्वास धोका असल्याचे कारण सांगत मार्शल लॉ लागू केला आणि मुजीब यांची रवानगी पुन्हा कारागृहात झाली. तेव्हापासून मुजीब १९६२ पर्यंत कारागृहात होते. पण 'स्वाधिन बांगला विप्लोबी परिषद' या नावाने भूमिगत स्वातंत्र्य आंदोलन चालू राहिले. सु-हावर्दी १९६३ ला वारले आणि मुजीब अवामी मुस्लीम लीगचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी 'धर्मनिरपेक्षता' हे मूल्य स्विकारून 'अवामी मुस्लीम लीगचे नाव 'अवामी लीग' असे केले.

विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्या प्रमाणे भारतात 'All India Muslim League ' हा पक्ष अस्तित्वात राहिला अगदी त्याचप्रमाणे पाकिस्तानात देखील 'Pakistan National Congress' हा पक्ष अस्तित्वात होता. विशेष म्हणजे नेहरू नि गांधींना आदर्श मानणा-या या पक्षाने १९४६ च्या निवडणुकीत ‘कलश’ या चिन्हावर निवडणूक लढून ६९ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या तर १९५४ च्या निवडणुकीत युनायटेड फ्रंट मधील पक्ष या स्वरुपात ३०९ पैकी २८ जागा पूर्व पाकिस्तानात जिंकल्या होत्या. या पक्षाचे नेते बसंत कुमार दास आणि दीपेंद्र कुमार दत्त यांनी पक्षाचे नामकरण पुढे Bangladesh National Congress असे केले आणि हा पक्ष पुढे अवामी लिग मधे सामील झाला!

The Unfinished Memoirs' हा मुजीब यांच्या लेखनाचा पहिला भाग आहे.‘कारागारेर रोजनामा’(कारागृहातील रोजनिशी) हा दुसरा भाग देखील प्रकाशित झाला आहे. हे लेखन १९५८ ते १९६२ या काळातील असून पहिला भाग १९५५ पर्यंतचा तर दुसरा भाग १९५५ ते १९५८ या काळातील अनुभव कथन आहे !

मुजीब यांचे हे लेखन भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासचे विविधांगी आकलन करण्यासाठी जरूर वाचावे असे आहे. जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली तेंव्हा त्यांना "पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करायचे होते. जिना यांच्या निधनानंतर लियाकत अली आणि इतर राज्यकर्ते जीनांच्या ध्येयापासून पतित झाले आणि म्हणून आम्ही मुस्लीम लीगच्या विरोधात आंदोलन केले" अशी मांडणी मुजीब यांची आहे. ती कितपत खरी वा खोटी हा स्वतंत्र विषय आहे! मात्र

ज्या पॅन इस्लामिझमचे तत्वज्ञान जिना यांना इक्बाल यांनी पाकिस्तान निर्मितीची प्रेरणा म्हणून सांगितले त्या पाकिस्तानी इस्लामी राष्ट्राचे पहिले विभाजन सिया वा सुन्नी न होता संस्कृत उदभव बंगाली भाषिक अस्मितेवर झाले हे विशेष ! मुस्लिमांचे म्हणून निर्माण झालेले पाकिस्तान, मुळात निव्वळ पंजाबी मुस्लिमांच्या राजकीय अट्टहासाचे फलित होते याची चुणूक १९४९ सालातच उर्दू एकमेव राष्ट्रभाषा जाहीर करून दिसली होती. एकसाचीपणाच्या आग्रहातून एकच भाषा वा एकच संस्कृती सर्व जनतेवर थोपवणे ही चूक पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी केली. हल्ली हे भारतातही होत आहे हे चिंतनीय आहे. पण हे वाचणार कोण आणि यावर विचार करणार तरी कोण?

स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी (१९२१च्या खानेसुमारी नुसार) ५६ % नागरीक बंगाली, १८ % पंजाबी, १७% सिंधी तर उर्वरित लोक पुश्तु, बलुची आदी भाषा बोलत असत! उर्दू बोलणारे असे कोणीच नव्हते परंतु ज्या पंजाबी राज्यकर्त्यांचा आणि लष्करशहांचा प्रशासनावर पगडा होता त्यांना उर्दू भाषा राष्ट्रभाषा निव्वळ उर्दू ही मुस्लिमांची भाषा या अंधश्रद्धेमुळे हवी होती !

राजकारण बहुआयामी असते! एकाच्या मध्ये अनेक असे कितीतरी पदर असतात.पाकिस्तानच्या निर्मितीत मोठे योगदान असणा-या मुस्लीम लीग मध्ये पश्चिम पाकिस्तानी लीग कार्यकर्ते आणि पूर्व पाकिस्तानी लीगचे कार्यकर्ते यात प्रचंड फरक होता. "आंदोलन करणे, कारावास भोगणे, पक्ष कार्य करणे, जनसेवा कार्य करणे, यात बंगाली कार्यकर्त्यांना तोड नव्हती ! पंजाबी लीगचे कार्यकर्ते म्हणजे सुटबुटवाले म्हणजे जणू ऐतदेशिय इंग्रजच!" अशी टीका मुजीब यांनी केली आहे.

'भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी १९४६ मध्ये निवडणुका झाल्या त्यातील निकालानुसार मालदा, मुर्शिदाबाद हा भाग पाकिस्तानला मिळायला हवा होता कारण तो मुस्लीम बहुल होता. मात्र हा भाग माऊंटबॅटन यांच्या मदतीने नेहरू-पटेलांनी भारताकडे घेतला! याचे प्रमुख कारण कलकत्ता हे शहर होते. नेहरू नि पटेल कलकत्ता हे शहर पाकिस्तानला मिळू नये म्हणून प्रयत्न करत असताना पाकिस्तानी राज्यकर्ते मात्र कलकत्ता पाकिस्तानात येवू नये या साठी प्रयत्न करत होते ! कारण कलकत्ता हे शहर पाकिस्तानात आले की ते पाकिस्तानची राजधानी बनले असते आणि परिणामी पाकिस्तानच्या सत्तेचा केंद्रबिंदू आताच्या पाकिस्तानमध्ये न राहता तो कलकत्त्यात राहीला असता ! या मुळे पंजाबी मुस्लिमांची पाकिस्तानी लष्कर आणि सत्ता यावरील पकड कमजोर झाली असती म्हणून कलकत्ता मिळविण्यासाठी नव्हेतर कलकत्ता पाकिस्तानात नको यासाठीच प्रयत्न केले गेले!' असा आरोप मुजीब करतात!

दार्जीलिंग सुद्धा मुळ रॅडक्लिफ अवार्डमध्ये पाकिस्तानकडे होते, पण ते भारतास देण्यात आले. कलकत्ता, मुर्शिदाबाद, दिनाजपुर पश्चिम, २४ परगणा, मालदा आणि पश्चिम सीमेवरील गुरूदासपुर यासाठी खुलना आणि चितगांव हिल्स पाकला दिले गेले. यामुळे भारताला पूर्व सीमेवर आजच्या नागलँड, मणिपूर, सिक्कीमला जाण्याचा तर पश्चिम सीमेवर गुरूदासपुरहून पठाणकोट मार्गे काश्मिरला जाण्याचा सलग मार्ग मिळाला. भारताला काश्मिर मिळाले ते यामुळेच!

बंगालची फाळणी १९०५ ला होवून ती १९११ ला रद्द झाली. मात्र आसाम, ओरिसा, बिहार हा त्यात पुन्हा समाविष्ट केला गेला नाही. बंगालची फाळणी होणार म्हटल्यावर बंगाल एक ठेवण्यासाठी कलकत्ता राजधानी करून 'United Sovereign Bengal' निर्माण करण्याची योजना सुभाष बाबूंचे बंधू सरतचंद्र बोस आणि किरण शंकर रॉय यांनी सु-हावर्दी सोबत सुरु केली होती. पण ही योजना नेहरू आणि पटेलांनी अक्षरश: धुडकावून लावली आणि कलकत्ता भारतात आले!

भारताची फाळणी ही एक अपरीहार्य घटना होती. ती भारतासाठी अधिकाधिक फायदेशीर कशी स्विकारता येईल याचा प्रयत्न गांधी, पटेल आणि नेहरूंनी त्यावेळी साम,दाम,दंड,भेद या हरेक प्रयत्नातून केला हेच यातून स्पष्ट होते. म्हणून हे पुस्तक आपण भारतीयांनी जरूर वाचायला हवे!

राज कुलकर्णी

Shaikh Mujibur Rahman -'The Unfinished Memoirs'

https://www.facebook.com/1725500957733945/videos/659771027832576/

Updated : 19 July 2019 11:20 AM GMT
Next Story
Share it
Top