Home > मॅक्स ब्लॉग्ज > शरद पवारांच्या यशाचं रहस्य - राजदीप सरदेसाई

शरद पवारांच्या यशाचं रहस्य - राजदीप सरदेसाई

शरद पवारांच्या यशाचं रहस्य - राजदीप सरदेसाई
X

शरद पवारांसारखे गूढ आणि अगम्य असे काही थोडेच राजकारणी भारतात आहेत. मुंबईत असं म्हटलं जातं की,

"पवारांच्या मनात काय असतं, ते काय बोलतात आणि ते जी कृती करतात; या तीन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात".

महाराष्ट्रातील घडलेल्या अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडीत पवार यांची नेमकी काय भूमिका होती? याचा पत्ता अजून कोणालाही का लागला नाही? याचं स्पष्टीकरण वरच्या विधानातून होऊ शकतं. त्यांचा पुतण्या अजितदादा आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या सर्वोच्च नेत्याला खरोखरच माहिती नव्हती का? की हा कसलेला राजकारणी, अधिक फायद्याचा व्यवहार कुठला होईल हे आजमावत, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सारीपाटावर दोन्ही बाजूच्या सोंगट्या खेळवत होता?

यातलं संपूर्ण सत्य कधीच बाहेर येणार नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली ती अशी की ८० वर्षांचा हा मुरलेला गडी महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा ‘शतरंज का खिलाडी’ आहे.

गंमतीची बाब म्हणजे, अगदी काही महिन्यांपूर्वीच पवार जवळजवळ नेस्तनाबूत झाले आहेत, असं मानलं जात होतं. त्यांच्या पक्षात फाटाफूट सुरू होती. डझनभरहून अधिक वजनदार नेते आणि एक खासदार यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून पक्ष बदललला होता. आणि त्यांच्या कुटुंबातही दुहीची लक्षणं दिसू लागली होती.

हे ही वाचा

मतदारांनी भाजपला इशारा दिला आहे – राजदीप सरदेसाई

RTI: बहुमताचा गैरवापर नको – राजदीप सरदेसाई

महाराष्ट्रात पण आमदारांचा बाजार भरेल.. – राजदीप सरदेसाई

अंमलबजावणी संचालनालयाच्या एफआयआर मध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं होतं; नेमकी हीच चूक देवेंद्र फडणवीस यांना सर्वात महागात पडली. एक एकाकी पडलेला म्हातारा सुभेदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला उगवता तारा यांच्यात पेटलेल्या युद्धाचे ते उघड संकेत होते.

खरंतर राष्ट्रीय माध्यमं त्यांना जसं दाखवतात तसे पवार राज्यभरातल्या जनतेचे नेते कधीच नव्हते. त्यांचा खरा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्रच होता. तिथल्या शेतकरी मराठा जातीवर त्याचं वर्चस्व होतं. परंतु, ते कधीही कॉंग्रेसला किंवा त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळवून देऊ शकले नाहीत. बहुतेक वेळा फोडाफोडीचं डावपेच किंवा निवडणुकीनंतर केलेल्या आघाडीच्या राजकारणातून आपले स्थान बळकट केलं आणि टिकवलं.

महाराष्ट्राच्या पलीकडेही त्यांना आपला प्रभाव दाखवता आला नाही. पंतप्रधान होण्याचे त्यांचे अनेक प्रयत्न दिल्लीच्या प्राचीन दरबारी तटबंदीने उलथून टाकले. मग पवार कोण होते? तर ते एक सतत कार्यरत, भरपूर साधनसंपत्तीचे पाठबळ असलेले, आणि ‘राजकारणामध्ये कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, असतात ते कायमस्वरुपी हितसंबंध’ या म्हणी बरहुकूम राजकीय वाटाघाटी करण्यात वाकबगार असलेले नेते होते. यामुळे त्यांचे सर्व पक्षात मित्र आणि सहकारी यांचे एक विशाल जाळं आहे. २०१५ मध्ये ते ७५ वर्षांचे झाले तेव्हा नरेंद्र मोदी ते सोनिया गांधी असे झाडून सर्वजण हजर होते. ज्या सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर त्यांना १९९९ मध्ये कॉंग्रेस सोडणे भाग पडले होते, त्यांच्याशीच पवारांनी महाराष्ट्रात आणि केंद्रात बेधडकपणे युती केली.

वैयक्तिक आणि वैचारिक गटा-तटांच्या पार जाण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळेच वर्षानुवर्षे त्यांची ‘पवार पॉवर’ शाबूत राहिली आहे. ते एका अर्थाने आघाड्यांच्या राजकारणाच्या मूळ काळातले राजकारणी आहेत. १९७८ मध्ये त्यांच्या महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी तत्कालीन जनसंघ आणि समाजवाद्यांची मोट बांधली होती.

शिवसेना हा प्रबळ राजकीय विरोधी पक्ष असूनही, सेनेच्या सुप्रीमो बाळ ठाकरे यांना पवारांनी कधीही टीकेचे लक्ष्य केले नाही. परस्पर आदराचा भाग असो वा परस्पर सोयीचा, पवार-ठाकरे हे समीकरण, ही महाराष्ट्राच्या नकाशावरची राजकीय आघाडीची निशाणी होती. पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडूमध्ये जसं राजकीय वैर तीव्र वैयक्तिक सूडनाट्या सारखं लढवलं जातं, आणि राजकीय विरोधकांना ठार मारलं किंवा तुरुंगात टाकलं जातं, त्याच्या अगदी उलट महाराष्ट्राचं राजकारण हे परस्पर सहमती आणि सोयीसवलतीवर बेतलेलं आहे.

काही प्रमाणात, फडणवीस-शहा-मोदी यांच्या विरोधकांना समूळ नष्ट करण्याच्या, ‘चुकीला माफी नाही’ अशा ब्रीदवाक्याच्या, अत्यंत स्पर्धात्मक राजकारणाने महाराष्ट्राचं तुलनेने स्थिर राजकारण ढवळून निघालं. राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागून त्यांच्यावर थेट एफआयआर दाखल झाल्यानं नेतेमंडळी भयभीत झाली. ज्यांनी निमूटपणे भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना “संरक्षणाचे” आश्वासन देण्यात आले. असं असुरक्षित, आणि अघोरी वातावरण निर्माण झालं की, भाजपाचा दीर्घकाळ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला खात्री झाली की त्यांचा सत्तेतला मित्रपक्ष सेनेला संपवायला टपून बसला आहे. कॉंग्रेसही शहा यांच्या “कॉंग्रेस-मुक्त भारत” च्या बढाईने हादरली होती.

या भयगंडाचा अत्यंत कल्पक वापर पवार यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच करून घेतला. अशक्य वाटणारं राजकीय समीकरण जुळवण्यात पवार यशस्वी झाले. मोदीविरोधापेक्षा मोदी-शहा-फडणवीस या त्रिकुटाच्या “भीती”ने टिकून राहण्याची सामाईक गरज असेल्या पूर्णतः भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांना पवारांनी एकत्र आणले. महाराष्ट्रात आघाडी टिकेल की ते सांगता येणार नाही. पण प्रादेशिक पक्षांना प्रबळ भाजपाची कल्पना भीतीदायक वाटते. हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान कितीही “सहकारी संघराज्य” च्या वल्गना करत असले तरी वास्तवात भाजप प्रादेशिक शक्ती खालसा करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्नशील असतो. त्यामुळे प्रादेशिक पक्षांशी त्यांचे संबंध तुटले आहेत. ते मोदी -१ मधील तेलगू देसम पक्षाबाबत जे झालं झाले, ते आता मोदी -२ मधील शिवसेनेबरोबर झालं आहे.

भाजपाच्या दोन मोठ्या नेत्यांना राजकीय चाणक्य म्हणून पाहिले जातं, परंतु "चाणक्य-नीती" लहान पक्षांना धमक्या देऊन आणि अरेरावी करून राबवता येणार नाही. त्यासाठी लोकांचे दुखावलेल्या अहंकारांची कौशल्याने गोंजारावे लागतील आणि धमकावण्याऐवजी थोडे दया थोडे घ्या. अशा धोरणांचा वापर करावा लागेल. फायलींच्या जोरावर सत्तेचा वापर करून राजकीय विरोधकांना चिरडून टाकण्याऐवजी, आणि संशय तसेच वैरभाव जोपासण्याऐवजी शहा-मोदी यांनी पवारांच्या राजकारणाच्या पुस्तकाचं एखादं पान वाचण्याची गरज आहे. खऱ्या राजकारणात फक्त दंडा असून चालत नाही, बहुदा आमिषाचंच धोरण राबवावं लागतं.

ताजा कलम:

महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या प्रचारात असताना मी पवारांना विचारले की त्यांनी निवृत्त होण्याचा विचार केला आहे का? त्याचं उत्तर नकारार्थी होतं: ते म्हणाले, ”अभी तो मै जवान हूं” तात्पर्य: राजकारणातल्या तारुण्यासाठी सत्तेचा सुगंध अमृतासमान असतो.

भाषांतर: रविंद्र झेंडे, पत्रकार, लेखक आणि अभ्यासक

Updated : 10 Dec 2019 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top