Top
Home > Max Political > दिल्लीत काँग्रेसला घरघर...

दिल्लीत काँग्रेसला घरघर...

दिल्लीत काँग्रेसला घरघर...
X

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला एकशे एकोणचाळीस वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. या पक्षाने देशावर ६० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता उपभोगली. देशात सर्वदूरवर पसरलेला राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस ओळखली जाते. सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा हा पक्ष आहे. दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्य, उपेक्षितांना काँग्रेस पक्ष नेहमीच आपला वाटत होता. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यापासून काँग्रेस पक्षाची देश पातळीवर वेगाने घसरण सुरू झाली.

वेगवेगऴ्या राज्यांत प्रादेशिक पक्षांनी आपला पाया रोवला आणि स्थानिक जनतेनेही प्रादेशिक पक्षांना अधिक प्रतिसाद दिला. सर्वत्र काँग्रेसची लोकप्रियता कमी कमी होत असताना दिल्लीतील श्रेष्ठी म्हणविणारे नेते आपल्याच कोषात राहिले. पक्षाचे प्रादेशिक नेते हे श्रेष्ठींचे गुणगान करण्यातच धन्यता मानत राहिल्याने देशात व राज्यातील राजकारणात व समाजकारणात कसे वेगाने बदल होत आहेत, याचे वास्तव काँग्रेस मुख्यालयापासून दूर राहिले. काँग्रेसची परंपरागत व्होट बँक प्रादेशिक पक्षांनी पळवली आणि काँग्रेसही आपणच तीनही लोकी श्रेष्ठ अशा भावनेने प्रादेशिक पक्षांना दुय्यम मोजत राहिली.

दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय आहे. दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा राहतात. पक्षाचे बहुतेक राष्ट्रीय पदाधिकारी, दिग्गज नेते, वर्षानुवर्षे सत्तेवर राहीलेले नेते यांचे वास्तव्य दिल्लीतच असते. मग काँग्रेसचा दिल्लीत सारखा का पराभव होतो? मोदी पर्व सुरू झाल्यापासून लोकसभेत काँग्रेसला सर्वात कमी यश मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचे एवढे कमी खासदार कधीच दिसले नाहीत.

२०१४ व २०१९ अशा दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला संपूर्ण देशातून पन्नास खासदारही निवडून आणता आले नाहीत. आणि आता २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवाने काँग्रेस किती दुर्बल झाली आहे हे देशाला दिसून आले. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून काँग्रेस पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. २०१५ आणि २०२० अशा अशा दिल्ली विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही आमदार दिल्लीकरांनी निवडून दिला नाही. आपल्या घराच्या आसपास काय घडत आहे, हे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना कळालेही नाही. आणि कळाले असले तर पक्षाला संजीवनी देण्यासाठी कोणी प्रभावी हालचाल केली नाही.

दिल्ली विधानसभेच्या २०१३, २०१५, आणि २०२० अशा ३ निवडणुका आणि लोकसभेच्या २०१४ व २०१९ निवडणुकीत काँग्रेसला सतत व सलग पराभव पत्करावा लागला आहे. २०१७ मध्ये झालेल्या दिल्ली महानगर परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने काँग्रेसला धूळ चारलीच आहे. मग देशाच्या राजधानीत काँग्रेस आहे कुठे? या सततच्या पराभवाला जबाबदार कोण, पराभवाचे उत्तरदायित्व कोणावर...

२०१३ पूर्वी सलग १५ वर्षे काँग्रेसचे दिल्लीत सरकार होते. शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. शीला दीक्षित यांच्या कारकिर्दीत दिल्लीचा वेगाने विकास झाला. मेट्रो धावू लागली. अनेक मोठे उड्डाण पूल झाले. अनेक मोठे रूंद रस्ते झाले. त्याच शीला दीक्षित यांचा २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघात पराभव केला आणि काँग्रेसने सत्ता गमावली. तेव्हापासून काँग्रेसला दिल्लीत घरघर लागली.

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला २०१७ च्या दिल्ली महानगर परिषद निवडणुकीत २१.९ टक्के व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसच्या मतांमध्ये सुधारणा होत असल्याचे ते चिन्ह होते. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कुठे दिसलीच नाही. राहुल गांधींच्या दोनच सभा झाल्या. पक्षाच्या अन्य नेत्यांनी फारसा रसही दाखवला नाही. काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभा मतदारांना आकर्षित करू शकल्या नाहीत.

भाजप विरूध्द आप अशी निवडणूक झाली. अमित शहा विरूध्द अरविंद केजरीवाल असा थेट संघर्ष झाला. काँग्रेस या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर जाईल हे उघड होते. पण काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही, यापेक्षा या पक्षाचे दुर्दैव कोणते असू शकते?

काँग्रेस पक्षाला संपूर्ण ओव्हर ऑईलिंग करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पक्षातूनच उमटत आहे. गेल्या वर्षी २० जुलैला शीला दीक्षित यांचे निधन झाले. त्यानंतर चार- सहा महिने दिल्ली प्रदेश काँग्रेस अक्षरशः नेतृत्वहीन होती. नंतर सुभाष चोपडा यांच्यावर पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. निवडणूक प्रचार काळात आप आणि भाजपचे कार्यकर्ते दिल्लीतील प्रत्येक घरात पोचले. पण काँग्रेसकडे तशी केडर नाही आणि पक्षाने घरोघरी प्रचार करण्याची व्यवस्थाही केली नाही.

गेल्या ५ वर्षांत दिल्लीतील मतदारसंघात पक्षाने संघटना बांधणीसाठी काहीही केले नाही. निवडणुकीसाठी कार्यकर्ते व उमेदवार तयार करणे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. शीला दीक्षितांच्या काळात दिल्लीचा विकास झाला, या मुद्या पलिकडे काँग्रेसला प्रचारात सांगण्यासारखे काहीच नव्हते. पण त्याच शीला दीक्षित यांचा केजरीवाल यांनी पराभव केला, तो का झाला, याची कारणे काँग्रेसने कधी शोधलीच नाहीत.

दिल्लीत पाठोपाठ झालेल्या पराभवामुळे काँग्रेसमधेही एकमेकांवर दोषारोप करण्यासाठी जुंपली आहे. भाजपचा पराभव झाला म्हणून काँग्रेसने खूश होण्याचे कारण नाही, आप ने भाजपला धडा शिकवला म्हणून काँग्रेसने आनंद वाटून घेण्याचा संबंधच नाही. काँग्रेसने भाजपचा पराभव करायला प्रादेशिक पक्षांना कंत्राट दिले आहे काय, अशी जळजळीत प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. आपच्या विजयावर गर्व करायचा असेल तर आपले दुकान बंद करायचे का, असा सवाल दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांनी विचारला आहे.

२०१३ मध्ये आपने काँग्रेसची व्होट बँक हिसकावून घेतली, ती ७ वर्षांत आपण परत मिळवू शकलो नाही, अशी नाराजी व्यक्त करीत काँग्रेसचे दिल्लीचे निवडणूक प्रभारी पी. सी. चाको यांनी राजीनामा दिला आहे. दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांनीही पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्यांची स्वतःची कन्याही निवडून आली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६६ उमेदवारांपैकी ६२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले, यापेक्षा आणखी नामुष्की कोणती असू शकते?

२०१५ मधे काँग्रेसला ९.६५ टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीत २२.४३ टक्के मते मिळाली. ७ पैकी ५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिली. त्या निवडणुकीत आपचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर होते. मग सात महिन्यात काँग्रेसचे मतदान अवघ्या ४.२६ टक्के इतके घसरावे याला काय म्हणावे?

आपच्या विरोधात भाजपने सारी सत्ता, पत आणि प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक लढवली. मोदी, शहा, नड्डा, राजनाथ, योगी आदित्यनाथ, पक्षाचे अकरा मुख्यमंत्री, दोनशे खासदार, दोन डझन केंद्रीय मंत्री देशातील सर्व राज्यातून आजीमाजी मंत्री, पदाधिकारी एवढी ताकद लावूनही भाजपचे दोन अंकी आमदारही निवडून आले नाहीत. काँग्रेस या निवडणुकीत उदास राहिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका आणि पंतप्रधानाना बेरोजगार युवक काठीने चोपतील अशी वादग्रस्त विधाने करून राहूल गांधी यांनी काय साधले हे त्यांना ठाऊक. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदम पक्षाला दिल्लीत १८.८ टक्के मते मिळाली होती, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपला ५४ टक्केपेक्षा जास्त मते मिळाली. काँग्रेसने डझनभर मतदार संघावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले होते, पण भाजपने लावलेली प्रचंड ताकद बघून काँग्रेसचे अवसान गळाले.

काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या शाहीन बाग व मुस्लिम वस्त्यांमध्ये असूनही आपने मुसंडी मारली. काँग्रेसची तिथेही अनामत रक्कम जप्त झाली. दिल्लीत काँग्रेस आयसीयूमधे आहे.

Updated : 18 Feb 2020 3:39 AM GMT
Next Story
Share it
Top