Home > मॅक्स ब्लॉग्ज > तुमची मुंबई!!

तुमची मुंबई!!

तुमची मुंबई!!
X

होय लेकरांनो, मीच आहे तुमची मुबंई. तुमचं सांत्वन करायला, विचारपूस करायला आली आहे. ओळखलतं का मला? कारण आज माझी अवस्था असहाय्य आहे. मी दु:खी आहे कारण तुम्ही माझी लेकरं संकटात आहात. विंवचनेत आहात. कष्टात आहात. तरीसुद्धा लेकरांनो न डगमगता माझं अस्तित्व जपता आहात.

तुमच्या अनेक पिढ्यांना मी वाढवलं, सांभाळलं, मोठं केलं त्याची जाण तुमच्या पिढीने ठेवली आहे. कृतज्ञता म्हणून की काय माझं अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्या जीवाचं रान करता आहात. अगदी निडरपणे कुठेही पळकुटेपणा नाही. माझी भयाण शांतता बघून तुमच्या डोळ्यातून नकळतच आसवं टपकतात तेव्हा माझ्या काळजात धस्स होतं. माझ्याही डोळ्यात पाणी उभं राहते आणि नकळतच तुमच्या गेल्या अनेक पिढ्यांच्या आठवणींचे तरंग नजरेसमोरून तरळू लागले.

तशी माझी जडणघडणच सात बेटातून झाली. इथल्या भूमिपुत्रांनी आपली उपजीविका सांभाळत माझं नैसर्गिक सौंदर्य जपलं होतं. एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक करणाने खऱ्या अर्थाने माझा विकास सुरू झाला. अनेक उद्योग आले प्रामुख्याने सूतगिरण्या आल्या व त्याच्याशी निगडीत कच्च्या मालाचे अनेक कारखाने आले. त्याला आवश्यक असणारे मनुष्यबळ स्थानिक पातळीवर कमी पडू लागले मग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातून कामगार येऊ लागले. हळूहळू उत्तर प्रदेश, दिल्लीवरून कामगार येऊ लागले. मी या सर्वांना सामावून घेतले.

आता माझी लगबग वाढली होती. मी माझी पूर्वीची ओळख विसरून या सर्वांना माझ्या पंखाखाली घेतलं आणि जशी कोंबडीची पिल्ले स्वतःला कोंबडीच्या पंखांखाली सुरक्षित समजतात तसे ते देखिल स्वतःला सुरक्षित समजू लागले. त्यांचे वेगळ्या तऱ्हेचे वावरणे त्यांचे हसणे-रडणे, त्यांची सुख दु:खे मी जवळून न्याहळू लागले. त्यात सामील होऊ लागले. मी कुठेही माझ्या लेकरांमध्ये व यांच्यामध्ये दुजाभाव किंवा उपरेपणा ठेवला नाही. आता माझी लेकरं मला सणासुदीला, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सजवू लागली, नटवू लागली, रंगवूही लागली. मीही यासर्वांनी सुखावत होते. मी माझे सौंदर्य स्वतःच न्याहाळत होते.

स्वतःला भाग्यशाली समजू लागले. तुमच्या अनेक पिढ्यांना मी अंगाखांद्यावर वाढवलं त्यांनीही माझा गौरव वाढवला. अनेक रथीमहारथींनी माझं नाव अगदी सातासमुद्रापार नेऊन पोहोचवलं. मध्यंतरीच्या काळात माझ्या मूळ अस्तित्वावर अनेक संकटे आली पण माझ्या या लेकरांनी एकजूटीने ती परतवून लावली आणि माझं अस्तित्व कायम टिकवून ठेवलं. माझं वैभव दिवसागणिक वाढू लागले.

आज प्रसिद्धीच्या शिखरावर मी असतानाच माझ्या या वैभवाला कुणाचीतरी नजर लागली आणि माझ्यावर भयावह संकट ओढवलं, त्यातून माझी सुटका करण्यासाठी तुम्ही लेकरं प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहात. एकंदरीत परिस्थितीने माझं मन विषण्ण झाले आहे. तुम्ही काही लेकरं डाॅक्टर आहात आणि माझं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहात. काही पोलिस बनून माझ्यासाठी आपला देह ठेवत आहात. परिचारिका घेतलेला वसा या कठिण परिस्थितीत माझ्यासाठी सोडायला तयार नाहीत, सफाई कामगार, महानगरपालिकेचे कर्मचारी, विद्युत पुरवठा करणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, आणि शासनकर्ते आपण सारे माझे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झटत आहात, आपले प्राण गमावत आहात. लेकरांनो अजून किती सोसणार आहात माझ्यासाठी? थांबवा हे आता सर्व, नाही सहन होत.

आज मी असहाय्य आहे माझे पंख जखमी झाले आहेत त्यामुळे मी तुम्हाला माझ्या पंखांखालीही घेऊ शकत नाही आणि दुसरीकडे आणखीन एक गोष्ट वेदना देऊन गेली ती म्हणजे अशा या जखमी अवस्थेत, या कठिण परिस्थितीत मला अनेक जण लोंढ्यांनी सोडून निघून चालले आहेत. ज्यांचेवर मी तुमच्याइतकेच प्रेम केले आणि आज अचानक जणूकाही इतक्या वर्षांचं माझ्यावरचं त्यांच प्रेम आटून गेलं!

फक्त तुम्हीच तेवढे वेडे माझ्यासाठी आजूबाजूला करोनाने हाहाकार माजविला असतानाही आपल्या प्राणांची बाजी लावत टिकून आहात. तुम्ही खरे "मुंबईकर" आहात मला तुमचा अभिमान वाटतो पण लेकरांनो आता आवरा स्वतःला, मला कल्पना आहे याही परिस्थितीमध्ये तुम्ही मला नाही सोडून जाणार. तुम्ही दमला आहात, थकला आहात तरी नाउमेद होणार नाहीत, तुम्ही या परिस्थितीबरोबर झगडताना केवळ माझाच विचार करत असणार. माझ्या रक्षणकर्त्यांनो, माझ्या या लेकरांची रक्षा करा! मायेनी ती आंधळी झाली आहेत. माझ्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला निघालीत. त्यांना आवरा. ती आपलीही लेकरं आहेत त्यांची या संकटातून लवकरात लवकर मुक्तता करा.

लेकरांनो तुमचे आभार मानायला आज मी निशब्द आहे. आज माझ्या डोळ्यामधे केवळ अश्रू आहेत. मला तुमची फार फार काळजी वाटते. स्वतःला जपा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही या संकटावर मात करून पुन्हा एकदा मला वैभवशाली बनविणारच!

आपलीच मुंबई!

प्रशांत राजाराम साळगावकर

Updated : 25 May 2020 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top