Home > मॅक्स ब्लॉग्ज > COVID19 : कोट्यवधी लोकांची भूक भागवणारी ‘लंगर’ प्रथा

COVID19 : कोट्यवधी लोकांची भूक भागवणारी ‘लंगर’ प्रथा

COVID19 : कोट्यवधी लोकांची भूक भागवणारी ‘लंगर’ प्रथा
X

परवा एनडीटीव्हीवर शिखांच्या लंगरबद्दलचा कार्यक्रम पाहिला. आणि, अगोदर माहीत असलं तरी लंगरच्या या परंपरेबद्दल मी नव्याने विचार करू लागले. आज २०२० साली लंगरमुळे जगभरात कोट्यवधी लोकांची भूक भागलीये. कारण, शिख जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी लंगर नेलं. १५ व्या शतकाच्या सुमारास गुरुद्वारांत सुरु झालेली ही धार्मिक परंपरा सामाजिक समता जोपासण्यात खंड पडू न देता, आज कोविडकाळातल्या गरजेनुसार लंगर ऑन व्हील्सपर्यंत उत्क्रांत होत जाते, हे थक्क करणारं वाटलं. युके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अनेक देशांतल्या शहरांतून परवाच्या कार्यक्रमात तरूण शिख मुलं लंगर ही परंपरा त्यांनी का टिकवली, ती का टिकली पाहिजे ते सांगत होती. कोविडकाळात जगभरात गरिबांची, स्थलांतरितांची उपासमार व्ह्यायला नको म्हणून जागोजागी लंगर कामाला लागली. आजही हा भोजनसत्संग सुरूच आहे. तो सुरू राहाण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या या मंडळीनी जमा केल्यात.

लंगरसारखी परंपरा अन्य धर्मात सापडत नाही. म्हणजे, समानतेचा, बंधुभावाचा विचार अन्यत्र जरूर मांडला गेलाय. पण तो इतक्या ठोकपणे व्यवहारात उतरवला गेलाय फक्त लंगरमध्ये. आपल्या वारीत चालणारे सगळे वैष्णवधर्मी भेदाभेद अमंगळ असं मानतात जरूर. संतांची शिकवणच आहे तशी. तरीही वारीत जातपंगत असते. पंगत हा शब्द पंजाबी भाषेतही मराठी अर्थानेच वापरला जातो. जैन धर्मात पर्यूषण पर्वात क्षमायाचना करतात. संक्रांतीला आपण तिळगूळाची देवाणघेवाण करून भांडणं संपवूया, असं म्हणतो. अमेरिकेत thanks giving day असतो. या सर्व प्रथांमागचा विचार उदात्त. पण, ही सगळी फक्त शब्दसेवा असते. लंगर हा उदात्त विचाराचा सुमधुर असा भौतिक आविष्कार वाटतो.

लंगर म्हणजे रसोई. शाकाहारी भोजन. कांदामुळाभाजीत विठ्ठ्ल बघणार्याय आपल्या संतपरंपेरेशी या लंगरचं नातं आहे. कारण लंगर देऊ करायचं ती व्यक्ती देवासमानच मानली जाते. गुरू नानकांचा काळ तो. सामाजिक व्यवहारांवर जातीभेदाची मजबूत पकड. त्या काळात लंगरमध्ये सगळ्यांनी जमिनीवर एकमेकांच्या शेजारी बसून जेवणं, ही सामाजिक क्रांतीच होती. एकत्र बसून फक्त खाणंच नाही, भोजनासाठी शिधा जमा करणं, तो शिजवणं, पाककृती तयार करणं हेही एकत्रच. हे त्या काळी स्त्रिया करत असत. तिथेही जातपात पाळली जायची नाही. किरत करो - नेक काम करा, नाम जपो – ईश्वराचं नाव घ्या आणि वंड छको – मिळून-मिसळून खा, जेवा. ही नानकांची त्रिसूत्री.

शिखांचे तिसरे गुरू अमरदास यांनी तर लंगरमागच्या मूळ समताभावात जराही उणं राहू नये म्हणून ‘पहले पंगत पीछे संगत’ हा नियम सुरू केला. म्हणजे, लंगरमध्ये जातीभेद न पाळता पंगतीत बसतील तरच आणि त्यांनाच गुरूसंगत, सत्संग मिळेल, देवाची प्रार्थना करता येईल. या अमरदासांनी खुद्द अकबर राजालादेखील हे नियमपालन करायला लावलं होतं. आणि अकबराने ते खुशीखुशीने केलंही होतं. हे गुरू अमरदास जातीभेदांप्रमाणेच स्त्री-पुरूष विषमतेविरोधीही हिते.

स्त्रियांनी पडद्यात राहाणं, सती जाणं याला त्यांचा विरोध होता. माझ्या पंजाबी मित्राची आई अशा खूप कथा सांगत असे. त्या रेकॉर्ड करून ठेवायला हव्या होत्या. असो.

त्या लंगरविषयीच्या कार्यक्रमात गुलजारही होते. गुरुद्वारात माथा टेकवतच मी लहानाचा मोठा झालोय आणि लंगरसारख्या परंपरेवर पोसला गेलोय़ असं सांगितलं त्यांनी. या भीतीच्या, ताणाच्या काळातदेखील लंगर हा एक गोडवा आहे, माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा.

- मेधा कुळकर्णी

Updated : 12 July 2020 12:24 PM GMT
Next Story
Share it
Top