Home > मॅक्स ब्लॉग्ज > मृत्यू विषयी चिंतनातून करोना विषाणू सोबत जगण्याची उमेद - अ‍ॅड. असीम सरोदे

मृत्यू विषयी चिंतनातून करोना विषाणू सोबत जगण्याची उमेद - अ‍ॅड. असीम सरोदे

मृत्यू विषयी चिंतनातून करोना विषाणू सोबत जगण्याची उमेद - अ‍ॅड. असीम सरोदे
X

करोना विषाणूमुळे आपण सगळेच जण विचलित झालो आहोत. लॉकडाऊननंतर 'अनलॉक' होण्याच्या प्रक्रियेकडे जातांना एकमेकांकडे अनेक जण शंकेने बघण्याचा काळ सुद्धा सुरू झाल्याचे दिसते. लॉकडाऊन काळात अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि आता 'पोटाच्या प्रश्नांपेक्षा कोरोना मोठा नाही' असा मनाचा हिय्या करून लोक बाहेर पडणार असे दिसते आहे. रस्त्यावर होणाऱ्या हजारोंच्या गर्दीत एक करोना ग्रस्त असला तरीही विषाणूचा स्कोअर विस्फोट झाल्याप्रमाणे वाढणार.

समाजाच्या भल्यासाठी आपली व्यक्तिगत स्वच्छता असा व्यापक विचार आपल्या वागणुकीचा भाग बनण्याची गरज आहे. कुठेही थुंकणारे, कुठेही सिगारेटचा धूर सोडणारे आणि कुणी हटकले की, 'तुमच्या बापाची जागा आहे का?' असा प्रश्न विचारणाऱ्यांना एकत्रितपणाने आता जाब विचारला पाहिजे.

मृत्यू कुणासाठी कुठे दबा धरून बसला असेल माहिती नाही. पण म्हणून घाबरून वावरायचे आणि भीतभित जगायचे का? विषाणू कुठून हमला करेल याची कल्पना कुणालाच नाही.

हे ही वाचा..

आचार्य !

बापरे बाप!

टाळेबंदीचा अतिरेक नको!

मी तर मृत्यूला जवळून बघितले. फ्रान्सच्या ग्रेनोबाल शहरात जे काही मी अनुभवले तो 'मृत्यूच' होता असे मला अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. एखादा अचानक होणारा अपघात सोडला तर मृत्यू अचानक येत नाही हे वास्तव तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावे म्हणून मी हे लिहितो आहे.

प्रत्यक्ष मृत्युपूर्वी व तश्या गंभीर आजारापूर्वी आपले शरीर आपल्याला सूचना देत असते. त्यालाच आपण लक्षणे म्हणतो. अशी लक्षणे वेळीच ओळखता आली तर मृत्यू टाळता येतो. स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा शहरातील वास्तव्याच्या दरम्यान मला जो त्रास व्हायला लागला त्याचा थेट संबंध माझ्या हृदयाशी आहे याची जाणीव मला झाली होती. त्यामुळे मी हृदयाकडे लक्ष ठेऊन होतो. एकाएकी हृदयविकाराच्या झटक्यामने अनेक जण मरतांना मी बघतो तेव्हा मला आता हे नक्की कळते की, हृदयविकाराच्या झटक्याहचे संकेत काही काळ आधीच, काही महिने आधी शरीराला मिळतात. त्यामुळे अचानक मृत्यू आलेला नसतो त्याच्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केलेलं असते. हेच शरीराच्या प्रत्येक घडामोडीच्या बाबतीत आहे. शरीराचे सिग्नल समजून घेतले तर आपण नक्कीच मृत्यूला थांबवू शकतो. करोना विषाणू सोबत जगतांना काळजी घेणे आवश्यकच आहे पण अवास्तव अती काळजी करणारे व मनात भीती ठेऊन जगणारे बघितले की मला वाईट वाटते.

मला अनेकांनी मारण्याच्या धमक्या दिल्या व देतात. विशेष संरक्षण युनिटचा गनमॅन व पोलीस संरक्षणात समाजात, जाहीर कार्यक्रमात वावरतांना काय वाटते याचा अनुभव सतत मृत्यूची जाणीव करून देणारा असतो हे सुद्धा मी अनुभवले.

मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे. निष्काळजीपणामुळे मरू नये हे जसे मला वाटते तसेच मृत्यूचे भय घेऊन जगू नये याबाबत सुद्धा माझे विचार ठाम आहेत.

आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर मानवी शरीरातून आत्मा निघून जाणे म्हणजे मृत्यू होणे असे अनेकजण मानतात; मात्र याला विज्ञानाची मान्यता नाही. विज्ञानात मृत्यूची व्याख्या वेगळी व स्पष्ट आहे की, साधारणतः कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूचे, हृदयाचे काम थांबले किंवा मेंदू व हृदय बंद पडले तर मृत्यू झाला असे समजावे. त्यामुळे मेंदूचे कार्य पूर्णतः ठप्प होणे, हृदय क्रिया पूर्ण थांबणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. असो. तर मला हे म्हणायचे आहे की, करोना विषाणूमुळे का असेना पण आपण सगळ्यांनी मृत्यू या वास्तवाचा 'अढळ सत्य' म्हणून विचार करावा.

जन्म – मृत्यू म्हणजे एकामागून एक पडणारी पावले आहेत इतक्या सहजतेने आपण मृत्यूकडे बघावे असे विचारवंत विद्या बाळ नेहमी म्हणायच्या. त्यांच्यासोबत आम्ही 'दर्जेदार मृत्यूचा हक्क' आणि 'सुखाचा मृत्यू' याविषयावर काम करतांना खूप शिकलो.

मृत्यूचा विचार नेहमी दुःखद पद्धतीने करणे आपण बंद केले पाहिजे. जीवन जगायचे सोडून आपण मरणार याचीच चिंता घेऊन जागणाऱ्यांनी यवतमाळचे आद्य मराठी शायर ऍड भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीच्या काही ओळी जरूर लक्षात घ्याव्या. मस्त मनापासून, आनंदी जगावे आणि मृत्यूने सुखांत व्हावा यासंदर्भात भाऊसाहेब पाटणकर म्हणतात-

"आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे

मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे"

इतकेच नाही तर मृत्यूला सुनावण्याची संधी भाऊसाहेब सोडत नाहीत मृत्यूची कानउघाडणी करण्यासाठी ते म्हणतात :

”मृत्यो ! येतास का थोडा,

असा आधी तरी,

ऐकून जातास तू ही

एखादा शेर तरी !

एकही नाही कला तू

या मानवाची पहिली

जेथे जेथे गेलास

त्यांची मातीच नुसती पाहिली !”

माणूस कसा मेला त्यावरून तो कसा जगला हे लक्षात येते असे म्हणतात. 'वीर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी' या ओळीसुद्धा प्रसिद्ध आहेत. माझ्या बाबांचे निधन 16 जानेवारी 2020 रोजी झाले, त्यानंतर काही दिवसांनी 30 जानेवारीला विद्या बाळ यांचे निधन आणि साधूंचे मरणे कसे असते हे बघितले. कसे जगावे आणि असे मरावे असे वाटणारे प्रसंग आयुष्याला वळण देणारे असतात.

आज करोना विषाणूचा मानवी जीवनावर झालेला हमला त्या विषाणूसोबत जगण्याचे कौशल्य प्राप्त करून परतवून लावण्याशिवाय सध्या दुसरा उत्तम पर्याय नाही. हा विषाणू जाईल आणि दुसरा एखादा येईल कारण एकांगी विकास व फुगलेल्या शहरांसोबत विविध आजार, कचरा, सांडपाणी, विषाणू हे एकत्र 'पॅकेज' आहे. उपाययोजना करीत जगणे शिकावे लागेल.

करोना विषाणू निमित्ततरी या जगात सर्वात निःपक्षपाती असलेल्या मृत्यूबद्दल सकारात्मक विचार करू या.

Updated : 13 Jun 2020 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top