Home > मॅक्स ब्लॉग्ज > या फोटोच्या आत आहे आज्जी आणि तिनं एका कुशीत घट्ट पकडलेलं पिल्लू

या फोटोच्या आत आहे आज्जी आणि तिनं एका कुशीत घट्ट पकडलेलं पिल्लू

या फोटोच्या आत आहे आज्जी आणि तिनं एका कुशीत घट्ट पकडलेलं पिल्लू
X

तुमच्या समोर एक फोटो आहे. काळाकुट्ट दिसतोय...? या फोटोच्या आत आहे आज्जी आणि तिनं एका कुशीत घट्ट पकडलेलं पिल्लू. महापुरात जीव वाचवण्यासाठी इवल्याश्या नातवाला कडेवर घेऊन कुठल्याश्या बोटीत चढलेली आज्जी नातवासह बुडून मरण पावलीय. कृष्णेच्या महापुरात गटांगळ्या खातानाही आज्जीनं पिल्लाला घट्ट कुशीत पकडलंय. सोडलं नाही. इवलंसं पिल्लू तिच्याच कुशीत विसावलंय. कायमचं... आज्जी-नातवांचं घट्ट नातं महापुरालाही तोडता आलं नाहीय.

सांगलीतल्या ब्रम्हनाळची ही दुर्घटना. सांगली, कोल्हापुरात सुरू असलेल्या महापुराचं थैमान सांगणारी. इथं फोटो पोस्ट केला असता, तर वाचता वाचता डोळ्यात महापूर दाटला असता. आई वाचलीय. कशी काढेल ती उरलेलं आयुष्य?

महापुराचा तिसरा दिवस संपत आलाय. पाणी उतरंतय असं म्हणता म्हणता काही ठिकाणी चढलं तेव्हा आधीच हबकलेली लोकं सैरभैर झाली. हा पूर नेहमीसारखा नाहीय, हे लक्षात येऊ लागलंय, तसंतसं लोकं मिळेल त्या बोटीतून, कायलीतून बाहेर पडायला लागलीयत. ब्रम्हनाळमध्येही असंच झालेलं. या गावाच्या वेशीवर कृष्णा. जन्मापासून मृत्यूपर्यंत रोज सोबत. खोल आहे इथं नदी. कृष्णा अशी जीवावर उठेल असं स्वप्नातंही कधी त्या आज्जीनं पाहिलं नसेल...

आत्ताची माहिती आहे, सांगलीतल्या आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या महापुराची उंची साडे 57 फुट आहे. कृष्णेची उंची आयर्विनजवळ 45 फुट झाली, की धोक्याची असते. कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱयाजवळ पंचगंगेच्या महापुराचं पाणी आहे 53 फूट 7 इंचांवर. पंचगंगा 43 फुटांवर आली, की कोल्हापुरात पूर येतो.

घरं उद्ध्वस्त व्हायला धोक्याच्या पातळीवर तीन फुटांचा पूर पुरेसा असतो. पुराचं सैरावैरा पसरलेलं, गढुळलेलं पाणी डोक्याच्या उंचीवर इंचभर गेलं, तरी गुदमरून मृत्यू ठरलेला. कल्पना करून पाहा, घरात चार फुट पाणी आहे किंवा पुराच्या पाण्यात उभं असताना जमीनीवर पाय टेकत नाहीयत.

दोन्ही शहरांमधला पूर ओसरायला वेळ लागतोय. अजून 24 तास लागतील, असं दिसतंय. आडवंतिडवं गाव-शहरं-शिवारांत फुटांनी वाढलेलं आणि पसरलेलं पाणी इंचांनी कमी होतंय. महापूर फक्त ओसरत नसतो; जगण्याचं सार घेऊन जात असतो. सकाळी कोल्हापूरच्या एकाचा रडवेला आवाज ऐकला. घरात पाचेक फुट पाणी आहे. त्याला म्हटलं, ओसरेल पूर... तो म्हणाला, घर गेलं रे...काय राहिलं असेल आत...

आवाज ऐकवेना. तत्काळ काही करताही येत नाहीय. महापूर जाताना बरंच काही घेऊन जातोय. मदतीचाही पूर येतोय. यायलाच हवाय. पाऊण लाख हेक्टरवरची फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली शेती महापुरात आहे. ऊससुद्धा इतक्या महापुरात टिकत नसतो..

महापूर गेल्यानंतर समोर येणारी आव्हानं मोठी असणार आहेत. आलमट्टीपासून जबाबदारीपर्यंत बरंच काही बोलावं लागणार आहे. पण, नंतर. आधी या शहरांना, महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या गावांना उभं करायला लागू.

- सम्राट फडणीस

(साभार : सम्राट फडणीस यांच्या फेसबुकवरुन)

Updated : 9 Aug 2019 5:41 AM GMT
Next Story
Share it
Top