Home > News Update > मृत्यूचं भय मनातून काढायला हवं !

मृत्यूचं भय मनातून काढायला हवं !

मृत्यूचं भय मनातून काढायला हवं !
X

ज्या कोरोना विषाणूंचा संसर्ग झालाय, त्याला भारतीयांनी सुरुवातीच्या काळात गमतीत घेतलं होतं. त्या आजाराबाबत भारतीय नागरिक आता जागरूक झालेले दिसत आहेत. पण ही जागरूकता अतिरेकामुळे भयात रुपांतरित झालेली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर हा आजार फैलावू नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. लोकांचा एकमेकांशी संपर्क जास्तीत जास्त कमी कसा करता येईल ही शासनाची धडपड आहे. असा संपर्क कमी करण्यासाठी करायला लागणाऱ्या उपाययोजना दैनंदिन जनजीवन जवळजवळ ठप्प करणाऱ्या आहेत.

या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांची अडवणूक करणारे घटकही समाजात असतात. मात्र आता संयमाने आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा काळ आहे. शासन घोषित करीत असलेले प्रतिबंधात्मक उपाय सध्यातरी दीर्घ काळाचे नसून काही ठराविक मुदतीपर्यंतचे आहेत. या काळात आपण परिस्थितीशी जितकी तडजोड करता येईल, तितकी करून सरकारी यंत्रणांना सहकार्य करणं हाच सर्वाधिक चांगला पर्याय आहे.

आपली धडपड जीव वाचवण्यासाठी सुरू असल्यामुळे आलेल्या आपत्तीच इतकंही भयगंड बाळगण्याची गरज नाही की या आजाराचा संसर्ग झाल्याशिवायच आपला मृत्यू ओढवेल. या आजारावर ठोस उपाय नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा त्यावरचा तात्पुरता उपाय आहे आणि मानसिक धैर्य हा रोगप्रतिकारकशक्तीचाच एक भाग आहे.

समाजात एक मोठा वर्ग असा आहे, जो शासन आणि इतर लोक जाहिरातीतून सांगत असलेले उपाय करण्याची क्षमता ठेवत नाही. त्या वर्गाकडे बघण्याचा शासनयंत्रणेचा आणि खाऊन पिऊन सुखी समाजाचा दृष्टिकोनही फारसा सहानुभूतीचा नसतो. अजून कोरोनाची वक्रदृष्टी तिकडे वळलेली नाही. पण खबरदारी म्हणून त्या वर्गाची जबाबदारी घेणं हे खात्यापित्या लोकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडलं पाहिजे, जर आपल्या कुटुंबियांचे जीव सांभाळायचे असतील तर...!

जातीपातीधर्मभाषाप्रांतापलिकडे विचार करून आपण एकमेकांचा हात हातात घेणार आहोत का, यावर कोरोनाचं भारतावरचं संकट अवलंबून आहे.

आपण कोरोनाने नाही मेलो तर अन्य कोणत्याच आजाराने कधीच मरणार नाही, याची शाश्वती नाहीये. पण पूर्वकाळजीने आपण आपलं आयुर्मान वाढवू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या वैद्यकीय संकटाला युद्ध म्हटलंय आणि युद्ध लढताना मृत्यूचं भय बाळगून चालत नाही. जे मरणाला भीक घालत नाहीत, तेच दीर्घकाळ जगतात, हे एक अलिखित सत्य आहे. पण इतर खपले तरी चालेल, आपण जगलो पाहिजे, ही स्वार्थी भावना अराजकाला आमंत्रण देऊ शकते.

मन हे सगळ्या भावभावनांचे स्त्रोत आहे, असं बुद्धाने म्हटलेलं आहे; त्यामुळे आपल्या मनात येणाऱ्या किंवा आपल्याला सतावणाऱ्या अनेक भावना बहुतांशी वेळा मानसिक स्वरूपाच्या असतात. त्यांचा अनावश्यक बोभाटा झाल्यास आपल्या मनातली भीती समस्यांची गुंतागुंत वाढवून आपल्यावरच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत समोर येणाऱ्या नव्या समस्येवर उपाययोजना करण्याची धडपड सरकार करीत आहे. सध्या आहे त्या परिस्थितीत समाधान मानून, आहे त्या जागेवरच स्वतःला लोकसंपर्कात न येता जास्तीत जास्त सुरक्षित ठेवणं यावर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे.

Updated : 20 March 2020 4:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top