Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना व्हायरस आणि ऊसतोड कामगारांचा संघर्ष

कोरोना व्हायरस आणि ऊसतोड कामगारांचा संघर्ष

कोरोना व्हायरस आणि ऊसतोड कामगारांचा संघर्ष
X

फेब्रुवारी अखेर पासून कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातलं. चीनसारख्या देशातून याचा झपाट्याने प्रसार होत गेला. या विषाणूची लागण झालेले रुग्ण मार्च महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात आढळून आले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रामधील सर्व शाळा दिनांक १७ मार्च ते ३१ मार्च अखेर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून हा शासनाचा निर्णय अगदी योग्यच आहे. मुलांना ही सुट्टी पर्वणीच ठरलेली आहे. परंतु या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका ६ ते ७ महिन्यासाठी आई वडिलांसोबत सोमेश्वर साखर कारखान्यांवर आलेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना बसलेला दिसून येत आहे.

आपल्या मूळ गावाहून स्थलांतर होऊन आलेल्या ऊसतोडणी मजुरांना ऊसतोडणीसाठी आलेल्या ठिकाणी पक्की घरे नाहीत. जागा मिळेल त्या ठिकाणी यांची पाले आपल्याला दिसत असतात. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शाळेत दाखल करण्याचं काम करणाऱ्या degc – आशा प्रकल्पाच्या अनुभवानुसार, शाळा बंद असल्यामुळे ऊसतोडणी मजुरांच्या ६० ते ७० % शाळेत येणाऱ्या सध्या मुलांना कोप्यांवर थांबावे अपरिहार्य आहे.

पालक मुलांच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे कोप्यांवर ठेवायला तयार नाहीयेत. ते मुलांना आपल्यासोबत मुलांना ऊसतोडणीसाठी फडात घेऊन जात आहेत. शाळा बंद असल्याच्या कारणामुळे भर मार्च महिन्याच्या उन्हाच्या तडाख्यात मुलांच्या हातात कोयता आलेला दिसत आहे. जेव्हा शाळा चालू होत्या तेव्हा या मुलांच्या पालकांना मुले शाळेत असल्यामुळे काळजी नसायची. मुलांना शाळेमध्ये सुरक्षिततेसोबत पुरेसा पोषण आहार, त्याचबरोबर शिक्षण ही मिळत होते. आता मुलांना पालकांसोबत पहाटे फडामध्ये जाऊन उपाशीपोटी फडामध्ये फिरावे लागत आहे. शाळांना सुट्ट्या असल्यामुळे बहुतेक मूळ गावी असलेली मुले सुद्धा पालकांसोबत साखर कारखान्यावर आलेली दिसत आहेत.

माहुर येथील एका तळावर मुलांना व पालकांना कोरोना व्हायरसबददल माहीती देण्यासाठी आशा प्रकल्पाचा कार्यकर्ता गेला असता नियमीत शाळेत येणाऱ्या रूपाली केदार या मुलीची आई म्हणाली,

“शाळा कधी सुरू होणार आहे ? मुल शाळेत गेलेली बरी ! दिवसभर आम्हाला वेळ नसतो. आम्ही आमच्या कामात असल्यावर यांच्याकडे कोण लक्ष देणार ? ही मुलं आमच ऐकत नाहीत. दिवसभर अडचणीत फिरतात खूप त्रास देतात. लवकरच शाळा चालू व्हावी अस वाटतंय.”

पालकांच्या अश्या प्रतिक्रिया मुलांना शाळेची किती गरज आहे? हे दाखवून देत आहेत. शाळा चालू असताना नियमित शाळेत येणारे सोमेश्वर कारखाना तळावरील योगेश अशोक घुमरे इयत्ता सातवी व युवराज खेंगरे इयत्ता ८ वी ही दोन मुले शाळांना सुट्ट्या मिळाल्यामुळे फडामध्ये ऊस तोडायचं काम करत आहेत.

“शाळा कधी चालू व्हणार ? आमाला शाळा नसल्यामुळं ऊस तोडायला लागतोय. अंग लय दुखत.”

अश्या भावना मुलांनी शरद ननावरे या कार्यकर्त्याजवळ व्यक्त केल्या. पाडेगाव येथील नर्मदा दादाभाऊ शिंदे इयत्ता तिसरी, आरती रोहिदास मोरे इयत्ता पहिली या मुलींना तळावर एकटी कशी सोडायचे ? काय झाले तर कोण जबाबदार ? या भीती पोटी पालक आपल्यासोबत फडात घेऊन जात आहेत. आशा प्रकल्पाच्या या वर्षीच्या सर्वेनुसार सोमेश्वर कारखाना परिसरात ऊसतोडणी मजुरांची ६ ते १४ वयाची एकूण ८२७ मुले आढळली आहेत. यापैकी नियमित शाळेत येणाऱ्या किमान ३५० ते ४०० मुलांच्या शिक्षणावर आणि एकंदरीत जगण्यावर या रोगाचा अप्रत्यक्ष परिणाम झालेला दिसून येत आहे. सोमेश्वर कारखाना परिसरामध्ये शाळांमध्ये जे काही वातावरण मुलांना मिळत होते त्यामुळे पालकही समाधानी असलेले दिसून येत होते.

योगिता म्हस्के यांना याबाबत विचारले असता,

“ह्यो रोग आलाय कळल्यापासून अन्न गोड लागनाय, काळजात नुसती धडकी भरल्यासारखं होतंय, गावाकडं माझी पोर हाईत त्यांची बी लय काळजी वाटतेय.”

अशी प्रतिक्रिया दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांच्या मनात मुलांच्या असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. एकतर कोण्याच पद्धतीचे माध्यमं ऊसतोडणी मजुरांच्यापर्यंत ऊस तोडी दरम्यान पोहचत नसल्यामुळे कानावर येणाऱ्या गोष्टींना ऐकत त्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

नक्की कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान काय ? त्यावर नेमके उपाय काय आहे ? त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावे लागेल ? याची कसलीच माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीये. त्यामुळे ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याशिवाय कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नाहीये. त्यात शाळा बंद झाल्यामुळे मुले ज्या पद्धतीने उन्हाताणात उपाशी फिरत आहेत. तळांवर होऊ शकणाऱ्या अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही. अश्यात मुले शिक्षणापासून लांब गेलेली आहेत. त्यामुळे पालकांची अस्वस्थता वाढत आहे. ३१ मार्च नंतर शाळा चालू होतील. त्यावेळी ऐन परीक्षेच्या कालावधीत ही मुले शाळेत कितपत येतील ? याबाबत शंकाच आहे.

-अजहर नदाफ

Updated : 20 March 2020 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top