विकास दुबे तुम्हारा तो चुक्याच !

6504
Subhash shirke political blog on gangster vikas Dubey

विकास दुबे तू आठ पोलिसांची हत्या केलीस ते उत्तर प्रदेशात. प्रती मोदी मानल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात. एवढं करून तू पळून गेलास ! काय मिळालं तुला? काही दिवसाची प्रसिध्दी? बास !!

हेच तू महाराष्ट्रात केलं असतंस तर?

थेट (मनातून आजी आणि प्रत्यक्षात पर्मनंट) माजी मुख्यमंत्री दे फ यांनी पत्रकार परिषद घेतली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला असता. त्यानंतर (रेडियोवर फरमाईश सांगताना बोलतात तसं) नागपूर हून बावनकुळे, जळगाव हून महाजन, सिंधुदुर्ग इथून नारायण राणे, आणि त्यांचे चिंटू पिंटू, मुंबई हून कदम, दरेकर, सोमैय्या आणि साथी. याशिवाय विक्रम गोखले सारखे फक्त काँग्रेस च्याच विरोधात बोलणारे देशप्रेमी, बीजेपी सत्तेत असताना कायम कोमात असलेले फक्त विरोधकांची सत्ता असताना बाणेदार सवाल करणारे साहित्यिक, कवी, लेखक, वृत्तपत्रे लेखक, दे फ सत्तेत असताना माना मुरगाळलेले पण आता सात महिन्यात मीडिया सेलचं प्लास्टर लावून आवाज आलेल्या संपादकांची लेखणी आणि अँकरचे घसे दणदणीत वाजले असते.

त्याचवेळी शेठच्या ब्लॅकमेल मुळे एरवी निपचित असलेले आणि गृहमंत्रालयाने निरोप दिल्यानंतर जागे होणारे राष्ट्रीय नेते, प्रवक्ते यांनी उद्धव ठाकरे कसे नापास आहेत, का व सु (कायदा व सुव्यवस्था) याचा कसा बट्ट्या बोळ झालाय याची टेप वेगवेगळया राज्यांतून वाजवली असती. योगी आदित्यनाथ यांनी तर मारले गेलेले पोलीस हिंदू होते त्यामुळे हिंदूंवर अत्याचार होताहेत अशी कडक टीका केली असती. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, १९८४ नंतर गावोगावी पसरलेले आणि एक्स्प्रेस मार्गाने संत झालेले बाबा, बुवा, गुरुजी, मां, – हे सगळे हिंदू मारले गेले यासाठी गळे काढून संतापले असते. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला असता. नागपूर हून रा स्व संघाचे सरसंघचालक यांनी शेलक्या शब्दांत निषेध व्यक्त केला असता.

त्यानंतर आंदोलन, निषेध सभा, पुतळे जाळ मोहीम, टक्कल करो आंदोलन (खास करून विदर्भात) सुरू झालं असतं. पुन्हा वर उल्लेख केलेले सगळे एकाच सुरात रागावले असते. राजभवन वरून आदेश आला असता – राज्य पोलीस प्रमुख भेटायला या. कडक कानउघाडणी झाली असती. लगेच दे फ राजभवनात गेले असते. बाहेर येऊन पत्रकार परिषद. दुसऱ्या दिवशी प्रवीण दरेकर राजभवन वर गेले असते. बाहेर आल्यावर पत्रकार परिषद. नंतर किरीट सोमय्या… मोहीम सुरू राहिली असती.

हे ही वाचा..

त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या आय टी सेलद्वारे त्या आठ पोलिसांच्या नातेवाईकांच्या कहाण्या जारी झाल्या असत्या. त्याच बरोबर मारणारा तू म्हणजे विकास दुबे हा हिंदू ब्राम्हण नसून कसा मुस्लिम समाजातील आहे याच्या फेकाड्या पोस्ट जारी झाल्या असत्या. अशा पोस्ट हमखास फॉरवर्ड करणारे म्हातारे, अर्धवट शिक्षित आणि चाळीस पैसे पर मेसेज प्रमाणे आय टी सेलचा भत्ता मिळवणारे भक्त यांनी दणकून फिरवल्या असत्या.

विकास दुबे तू किती नेत्यांच्या सोबत फोटो काढले होतेस हे तुला माहित नसेल पण फोटो शॉप करून आय टी सेल ने सोनिया गांधी पासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे याच्या सोबतचे तुझे नसलेले फोटो सोशल मीडियावर फिरवले असते. मग त्याचा उल्लेख करून अनुपम खेर, अशोक पंडित, कंगना रनौ त ट्विटर वर टिवटीवले असते. पिएमो तून निरोप आला तर बिग बी ने सुद्धा आपल्या बारा हजार चार्शेव्या ट्विट मधून नाराजी व्यक्त केली असती. विकास दुबे !!! बाबौ !! किती प्रसिद्धी झाली असती तुझी.

त्यानंतर प्रती सरदार आणि अति सरदार अशा दोन्ही नेत्यांनी तुझा उल्लेख करून महाराष्ट्र सरकार वर टीका केली असती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या देशाला लाभलेला सर्वात कर्तृत्ववान, प्रचंड पराक्रमी जो फक्त सीमेवर गेला की शत्रू सैनिकांना जुलाब होतात अशा एकमेव नरेंद्र बाहुबली मोदी यांनी सुद्धा तुझ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली असती. तुला तब्बल सहा दिवस अटक झाली नाही म्हणून राहुल गांधी यांना जबाबदार धरले असतं. काँग्रेस अजून सत्तेत का आहे म्हणोन सवाल केला असता.

इतकं सगळं झालं असतं बांवा!!!

तू एकदम चीर्कुट निघालास ! बी जे पी ची सत्ता असलेल्या राज्यात कांड केलेस ते ही योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात? जिथं सगळं सुजलाम सुफलाम आहे. तिथं कध्धी कध्धी चुकीचं होत नाही. गोरखपूर ला नाही का शंभर बाळं ऑक्सीजन विना मेली. ज्यानं उघड केलं तो डॉक्टरच जेलमध्ये टाकला गेला. असा एकदम मनुस्मृती प्रमाणे इन्स्टंट न्याय.

आता मेलास ना! कुणी मागणी करणार नाही एन्काऊंटर च्या चौकशीची. तथाकथित मानवाधिकार संघटना योगीच्या राज्यात निपचित पडल्यात.

विकास दुबे तुम्हारा तो चुक्याच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here